मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आपल्या पूर्वजांचे विज्ञान

इंग्रजी शीर्षक
Aaplya Purvajanche Vidnyan
सारांश

आपल्या पूर्वजांचे विज्ञान हा एक वादग्रस्त विषय आहे. कधीकधी त्याचं अकारण उदात्तीकरण केलं जातं, तर कधीकधी ते सरसकट मोडीत काढलं जातं. पण निरंजन घाटे यांनी ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ या लेखसंग्रहात या विषयाकडे अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिलं आहे आणि हे या पुस्तकाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. इथे आपले पूर्वज याचा अर्थ केवळ भारतीय पूर्वज असा न घेता, मानवजातीचे पूर्वज असा घ्यायचा आहे. लालसर तपकिरी रंगातलं सुरेख मुखपृष्ठ आणि मलपृष्ठदेखील वेगवेगळ्या प्राचीन संस्कृती अधोरेखित करतात. ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पूर्वजांच्या ज्ञानर्जानाचं फलित आणि कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना यात आहे. प्राचीन वैदयकशास्त्र, त्याकाळच्या शस्त्रक्रिया, विशेषत: मेंदूच्या शस्त्रक्रिया, भूल देण्याच्या पद्धती अशी सुरुवातींच्या लेखांमध्ये या खजिन्याची मस्त झलक मिळते आणि पुस्तक वाचून पूर्ण होईपर्यन्त ते खाली ठेवता येतच नाही. दुर्बीणीचा शोध, रेडिओचा शोध अशा गेल्या काही शतकांमधल्या संशोधनाचे भरपूर दस्तावेज उपलब्ध आहेत. पण खेळांचे प्रकार, चश्मा, छत्री, शिवणकाम, गोंदवणे, आरसे असे शोध एकट्यादुकट्याचे नसतात. ते समूहाने कसे लावले असतील, ही कल्पना कोणी मांडली असेल, त्याला इतरजणांनी कशी प्रतिक्रिया दिली असेल, चुकतमाकत त्यांनी ते शोध कसे परिपूर्ण करत नेले असतील, हे मला खूप मोहित करतं. त्यामुळे ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ हा लेखसंग्रह माझ्या दृष्टीने खरोखरीच खूप अमूल्य आहे. त्याकाळचं एखादं शास्त्र वा तंत्र टप्प्याटप्प्याने कसं विकसित होत गेलं याच्या खात्रीशीर लिखित नोंदी उपलब्ध नसतात. त्यामुळे आधार असतो तो उत्खननातून मिळालेले पुरावे, गुहामधली भित्तीचित्रं, पुराजीवशास्त्रातल्या तज्ञांची निरीक्षणं, अर्धेमुर्धे शिलालेख, किंवा नंतर लोकसाहित्यातले उल्लेख यांचा. या सगळ्याचा मेळ घालत तज्ञ मंडळी त्याकाळच्या समाजजीवनाचं एक एकसंध चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात. ते खूप तपशीलात या लेखांमध्ये येतं. हळूहळू त्याकाळच्या माणसाची जीवनशैली आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांची रहाणी, त्यांच्या अडचणी, त्यावरचे त्यांनी काढलेले तोडगे – बघता बघता आपण त्या काळात जाऊन पोचतो. हा अनुभव फार अप्रतिम! तुर्कस्तान, पेरू, इजिप्त, सिंधू संस्कृती, चीन, ग्रीक आणि रोमन संस्कृती, फ्रान्स, स्पेन असा आरशांचा विलक्षण इतिहास आहे,भारतात ते कुठून आले ते नक्की सांगता येत नाही. आरशावरच्या नक्षीचं कोडं देखील मस्त. सौंदर्याची लक्षणं म्हणून अवयवांचे आकार बदलणे, दागिने, किंवा केसांचे टोप हे प्रकार फार गमतीशीर आहेत. पाश्चात्य देशांच्या तमोयुगातल्या वैयक्तिक स्वच्छतेच्या कल्पना तितक्याच भयंकर. भारतीयांमध्ये मात्र साबण वापरणे, दात आणि शरीर स्वच्छ ठेवणे महत्वाचे होते. सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग जगभर रंगतदार होता आणि त्यात विविध धातू आणि रसायनांचा वापर होता. दागिन्यांचा प्रवासही असा थक्क करणारा. इ.स.पू. 20,000 एवढया पुरातनकाळचं हस्तिदंती कडं असो, की पुढे इ.स.पू. 3,000 मधली नकली रत्नं असोत, माणसाची दागिन्यांची आवड कालातीत खरी! डागाचे दागिने बनवण्याची कला इटलीत इ.स.पू. 1500 मध्ये पूर्णत्वाला गेली होती, ती ग्रीकोरोमन संस्कृतीत हळूहळू लयाला गेली, आणि मग अगदी अलीकडे 1933 मध्ये तिचं पुनरूज्जीवन झालं हा आलेख स्तिमित करून जातो. मुळात साप्ताहिकासाठी लिहिले असल्याने प्रत्येक लेख छोटा आहे. मात्र काही वेळा ते एकत्र वाचले पाहिजेत. प्राचीन काळात बागबगीचे आणि त्यांचं शास्त्र हे खूप गंभीरपणे घेतलं जायचं. या संग्रहातले त्याविषयीचे चारही लेख उत्कृष्ट आहेत. इजिप्तमधल्या फराहोंची वनस्पतींची आवड, असिरियन बागा, चंद्रगुप्त मौर्यांची राजेशाही बाग, एकंदरीत राजांचा बागांचा आणि बागकामांचा छंद छान मांडला आहे. आपल्याकडले ऋषींचे आश्रम आणि बृहत्संहितेतल्या शास्त्रशुद्ध निगराणीच्या सविस्तर सूचना यांचाही उल्लेख आहे. मेक्सिको किंवा बॅबिलॉनमधल्या तरंगत्या बागा, चिनी बगीचे, झेन बगीचे अशी वळणं घेत ही गाथा सुरेख उलगडत जाते. पुढे ग्रीक खेळांविषयीचे चार सलग लेखही असेच अप्रतिम आहेत. त्यामध्ये ग्रीक संस्कृतीचं वास्तव दर्शन घडतं. आपले पूर्वज आकाशात विहार करत, त्यांच्याकडे अण्वस्त्र बनविण्याचं ज्ञान होतं, अशा दंतकथांबद्दल लेखक निरंजन घाटे यांनी सुरूवातीला आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे, “जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं ही आत्मवंचना ठरेल.” मुळात अभ्यासक पिंड असल्याने त्यांनी या गोष्टींबाबत संशोधन करत, माहिती मिळवत, शास्त्रीय पडताळणी करत लेखनाची मांडणी केलेली आहे. त्यामुळे पुस्तकाला माहिती, मनोरंजन, आणि एक संदर्भग्रंथ असे अनेकविध पैलू लाभले आहेत. घाटे यांच्या लेखनात नेहमीच एक सहजपणा असतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
212
भाषा
मराठी
किंमत
180.00
ISBN
9788190734431
समुदायाने जोडले
बंद