मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आपण माणसात जमा नाही

इंग्रजी शीर्षक
Apan Mansat Jama Nahi
सारांश

ग्रामीण भागातून पोटासाठी शहराकडे वळणाऱ्या लोकांच्या वर्तनात होणारा स्वार्थी बदल आणि गावकुसातील विविध जातीधर्मातील लोकांनी एकमेकांबद्दल जपलेली आत्मीयता, बेरकी राजकारण,कुरघोडी व्यक्त करणारा कथासंग्रह " पाझर"या कथेत टीव्ही बघून काही तरुणामध्ये जैतूनबी, बाबुलबद्दल निर्माण झालेला द्वेष,परंतु त्याला जुन्या पिढीच्या पाटील व जाणत्या मंडळींनी अजिबात थारा न दिल्याने गावात एकी राहिल्याचे दिसून आलं आहे. तुटल्या प्रदेशाचा प्रवास या कथेत मुलांना पोटाला चिमटा देऊन शिकवल्यानंतर, अप्पलपोटा विचार करून रक्ताच्या नात्यांना ती कसे विसरून जातात हे लेखकाने मार्मिकपणे दर्शवले आहे. पण यात त्या घरच्या म्हातारीची कुटुंब एकत्र राहावं ही तळमळ मात्र मनाला चटका लावून जाते. बहुलकरांच्या मुलाची गोष्ट या कथेत मास्तर आपल्या दिपूला, त्यांना परिस्थितीमुळे जे शिकता आले नाही ते दिपूने शिकावं यासाठी केलेली जोर-जबरदस्ती त्यांच्याच अंगलट येते अन दिपू घर सोडून निघून जातो. गुरुजींनी आपल्या गरीब भावंडांना अंतर दिलेलं असूनही अशा कठीण प्रसंगी भावाच्या मदतीला ती धावून येतात.शिकल्याने माणूस स्वार्थीच विचार करू लागतो त्यापेक्षा मायेचा पाझर असलेली अडाणी लोक बरी .कथेने आपल्या मुलावर अपेक्षांचे ओझं लादणाऱ्या पालकांच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे. ठराव या ग्रामीण कथेत दूधसंघाच्या निवडणुकीतील गाव पातळीवरचे बेरकी आबा, तात्यांचे राजकारण, एकमेकांची जिरवाजिरवी समोर आणली आहे.गरज पडल्यावर एकमेकांच्या जीवावर उठणारं राजकारण मनात घृणा निर्माण करते. वळसंगे काकाया कथेत नायकाने आपल्या घराची परिस्थिती सुधारण्यासाठी, आपल्या स्वतःचा बळी देऊन घरच्यासाठी केलेली धडपड दर्शवली आहे. या त्यागाची भावंडांना जाण नसल्याने शेवटी काकालाही स्वतःचा विचार करण्यास परिस्थिती भाग पाडते. लेखकराव या कथेत लेखनकलेस धनिकांच्या दावणीस बांधण्याचा प्रकार नायकाने समोर आणला आहे. पिढी जात गर्भ श्रीमंत दादासाहेब आपल्या खानदानाचे अपेक्षित चरित्र लेखकास हवा तो मोबदला देऊन, लिहिण्यास सांगत आहेत. छळणारी गोष्ट ही एक गुढकथा तात्या ह्या गावकुसातील पुढाऱ्याची. पण कथेने एवढी वळणे घेतली आहेत की, शेवटपर्यंत तात्या नावाचं गुढ वाचकाला उकलतच नाही. आपण माणसात जमा नाही या कथेत नायक व त्याच्या आई-वडिलांस, त्यांचे आजोबा नेसत्या कपड्यांनीशी घरातून बाहेर काढतात. त्यानंतर त्यांचा सुरू होतो जगण्याचा संघर्ष.या काळात त्याच्या आईचे वडीलांकडे नायकास शिकवायला ठेवून घेतात.पण मामी व इतर नातलगांचा त्याला विरोध. आजोबांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होतं. तो सरकारी नोकरी पदरात पाडून घेतो.उपकाराची परतफेड म्हणून आपल्या भाच्यास पुढे शिकवायचे असते.पण त्यावेळेस पत्नीने केलेला आकांडतांडव बघून नायकाला स्वतःचीच लाज वाटते अन तो ठरवतो आता गावाची शीव नाही बघायची, कारण आपण माणसात जमा नाही हा प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्यालाही नायक आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहे असं नक्कीच वाटतं. तळ या कथेत कल्लवा ही कथेची नायिका असून, ती एकहाती हातभट्टीचा व्यवसाय कुठल्याच पुरुषाला दाद न देता सांभाळते. तिला बाहेरख्यालीपणा खपत नसल्याने, आपल्या नवऱ्याशी फारकत घेऊनही त्याच्याशी प्रामाणिक राहणारी स्त्री कल्लवा. तिच्यावर हात टाकल्याचे कळल्यावर सत्यवाचे तिच्या पाठीशी उभ रहाणं मनात घर करून जाते. एकंदरीत या कथा मानवी स्वभावाचे विविध पैलू, अन त्याचे परिस्थिती अनुरूप बदलणारे वर्तन आपल्यासमोर उघडून दाखवतात.कोल्हापूर परिसरातील वर्णन वाचून आपल्या आसपास कथा घडत असल्याचा भास होतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788184980226
समुदायाने जोडले
बंद