माझे शेल्फ
असे घडले सहस्रक
मानवाच्या थक्क करणाऱ्या प्रगतीचा पट मानव हा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे, असे म्हटले जाते, ते उगाच नव्हे. मानवाच्या उत्क्रांतीचा नि संस्कृतीचा प्रवास पाहिला, तर या विधानात अतिशयोक्ती मुळीही नाही, याची खात्री पटते. एकेकाळी गुहेत राहणारा मानव आता अंतराात पोचतो, ही बाब वाटते तितकी साधी नाही. गेल्या काही हजार वर्षांमध्ये मानवाने सर्वच क्षेत्रात उन्नतीची नवनवीन क्षितिजे गाठली. मग ते अगदी स्वयंपाकाच्या साधनांचे क्षेत्र असो, की वैद्यकीय क्षेत्र. मानवाच्या प्रगतीच्या या पटाचा आढावा निरंजन घाटे आणि डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी,‘ असे घडले सहस्त्रक’ या पुस्तकात घेतला आहे. माणूस अग्नीचा वापर पूर्वापार करत आला आहे. पण, आता गॅसबर्नर सर्रास वापरला जातो. हे एका रात्रीत घडलेले नाही. डिश वॉशर, मायक्रोवेव्ह ओव्हनने स्वयंपाकघरात प्रवेश केला. आदिमानव चरबीचे दिवे जाळत असे. मग वायूवर चालणारे दिवे आले. नि नंतर विजेचे दिवे. स्वयंपाकघराचा, घरांचा, रस्त्यांचा चेहरा-मोहरा मानवाने लावलेल्या शोधांनी आमूलाग्र बदलला. जे स्वयंपाकघरात झाले, तेच शेतीत झाले. शेतीसाठीही नवनवीन यंत्रे विकसित झाली. कपड्यालत्त्यांतही वैविध्य आले. टोप्या आल्या, स्टॉकिंग्ज आले. वैद्यकशास्त्रातही मानवाने भरारी घेतली. शरीराच्या रचनेच्या अभ्यासापासून कितीतरी शोध घेतला, असे म्हटले पाहिजे. माणसापाशी हे जे कुतूहलाने शोध घेण्याची उर्मी असते,त्यामुळेच तो सतत प्रगती करत राहतो. रक्तगटांच्या अस्तित्वाचा शोध, डी.एन.ए च्या रचनेचा शोध, शस्त्रक्रियांच्या पद्धती, सार्वजनिक आरोग्यासाठीची सजगता हे सारे क्रमश: घडत गेले. या साऱ्यांमागचा मूळ उद्देश हा माणसाचे जीवन अधिकाधिक सुखी, निरामय करणे हाच असावा. या सगळयाचा वेध लेखकांनी पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात विविध भाग आहेत. मानवी खाद्यपदार्थ, पेये, स्वयंपाकाची साधने, गणित, वैद्यकशास्त्र आणि शल्यचिकित्सा, राजकारण आणि शासनप्रणाली, स्थापत्य आणि आभियांत्रिकी, वाहतुकीची साधने, युद्ध आणि संभाषण व माध्यम असे ते विभाग. त्या त्या विभागात, त्या त्या क्षेत्रातील प्रगतीचा पट लेखकांनी उलगडून दाखविला आहे, नि तो खरोखरच थक्क करणारा आहे. युद्ध हे एकेकाळी केवळ ताकदीच्या जोरावर होई. मग तलवारी आल्या, घोडेस्वार आले, पुढे तेही मागे पडले नि बंदुका, तोफा, रणगाडे, विमाने, क्षेपणास्त्रे आली. ही सारी प्रगती एका अर्थाने तंत्रज्ञानामुळे झाली. अर्थात, युद्धाची खुमखुमीही वाढती राहिली आहे, हा त्यातील वाईट भाग. संभाषण - संवाद माध्यमांतही क्रांती व्हावी नि दुसरीकडे युद्धाची खुमखुमीही वाढावी, हा एका अर्थाने विरोधाभास म्हणायला हवा. पण, एकूणच प्रत्येक क्षेत्रात सतत पुढे जात राहण्याचा मानवाचा जो प्रयत्न राहिला आहे, त्याचे फलित म्हणून, मानवाने गगनभरारी घेतली आहे. या साऱ्याचा आढावा लेखकांनी घेतला आहे. पुस्तकात लेखकांनी आढावा धावता घेतला असला, तरी त्यात प्रगतीचे टप्पे दुर्लक्षित राहणार नाहीत, याचीही काळजी घेतली आहे. त्यामुळेच, अगदी बारीकसारीक गोष्टींचादेखील उल्लेख ‘प्रगतीच्या प्रवासवर्णनात’ या पुस्तकात आढळतो. हे पुस्तक सिद्ध करताना संदर्भ एकत्र करण्याचे मोठे क्लिष्ट काम लेखकांना करावे लागले असणार. या मेहनतीची प्रचिती पुस्तकाच्या पानोपानी येते. अनेक ठिकाणी चित्रे, छायाचित्रे, तक्ते यांनी पुस्तकाची रंगत वाढते. प्रस्तावनेत लेखकांनी म्हटल्याप्रमाणे, ‘माणसानं अल्पकाळात घेतलेली झेप थक्क करणारी आहे. ती इथे एकत्रित बघायला मिळेल.’ पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी तयार केले आहे. तेही वेधक.