माझे शेल्फ
अशी मने असे नमुने
तांबड्या मातीतली नमुनेदार माणसे... शिवाजी सावंत हे नाव उच्चारले की, ‘मृत्युंजय’कार हे शब्द आपोआपच आपल्या मनात येतात. महारथी कर्णावर ‘मृत्युंजय’, छत्रपती शंभूराजांवर ‘छावा’ आणि भगवान श्रीकृष्णावर ‘युगंधर’ अशा तीनच महाकादंबऱ्या शिवाजी रावांनी लिहिल्या पण त्या तीनही साहित्यकृतींनी त्यांना अमाप यश आणि वाचकांना भरभरून आनंद दिला. ‘मृत्युजंय’ची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. तर ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ यांवर स्वत: शिवाजीरावांनीच नाटकेही लिहिली. २००२ साली वयाच्या ६२व्या वर्षी शिवाजीराव मरण पावले. म्हणजे आता त्यांना जाऊनही सोळा वर्षे उलटली. पण त्यांच्यावरील तीनही साहित्यकृतींची लोकप्रियता जराही उणावलेली नाही. प्रस्तुत ‘अशी मने असे नमुने’ हे पुस्तक मात्र कादंबरी नसून ललित व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शिवाजीराव मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या गावचे. त्यांचा जन्म आणि सगळी घडण आजरा गावच्या लाल मातीत झाली. महारथी कर्ण आणि भगवान श्रीकृष्ण रंगवताना शिवाजीराव अत्यंत मधूर अशी संस्कृतप्रचुर मराठी भाषा वापरतात. छत्रपती शंभूराजे उभे करताना ते शिवकालीन मराठी वापरतात. अभिजात अशी शब्दसंपत्ती आणि ओघवती शैली ही तर त्यांची वैशिष्ट्ये. तेच शिवाजी सावंत ही व्यक्तिचित्रे रंगवताना अस्सल लाल मातीतली भाषा वापरतात. घाट आणि कोकण यांच्या ऐन कण्यावर वसलेल्या आजरा गावच्या लाल मातीतला जिव्हाळा लेखकाच्या अंगी पार मुरून गेला आहे. कांत्या, गणपा, संतू, तातू अशी नमुनेदार व्यक्तिचित्रे काढताना लेखकाच्या शब्दकळेतून तोच जिव्हाळा ओसंडून आलेला दिसतो आणि तो इतका अस्सल, उमाळ्याने आलेला असतो की, वाचक ती व्यक्ती, ते वातावरण, ती भाषा आणि ते गाव यात पार गुंतून, रंगून जातो. ही व्यक्तिचित्रे प्रथम फुटकळ स्वरूपात वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाली होती. प्रस्तावनेत लेखक आपल्याला सांगतो की, ‘खडकावरची म्हातारी’ हे व्यक्तिचित्र ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी दिल्यावर ते वाचून खुद्द आचार्य अत्र्यांचे डोळे पाणावले होते. एकंदरीत पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य. मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठ यांसह मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक.