माझे शेल्फ
आवरण
आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला.आपला धर्म, आपली संस्कृती विसरल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होतात याचे भयचकित करणारे वर्णन भैरप्पा यांनी कले आहे. आवरण साठी भैरप्पा यांनी जवळ जवळ 200 ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे, 200 ग्रंथांचा अभ्यास करून सत्याचे अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. भैरप्पा यांच्या सारखे अभ्यासू लेखक आज समाजात आहेत आणि आपल्या धर्माचा, आपल्या अभिमानास्पद संस्कृतीचा परिचय त्यांच्या अफाट लेखणीतून आपल्याला करून देत आहेत याचा खरंच खूप अभिमान वाटतो,भैरप्पा यांचे प्रत्येक पुस्तक वाचून काढण्याचे ठरवलेच आहे. अनेक वेगवेगळ्या इस्लामी राजवटींनी हिंदू संस्कृती, हिंदू मंदिरं विनाश करून संपूर्णपणे नष्ट करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला आणि तथाकथित पुरोगाम्यांनी याच टीपूला, बाबर ला, औरंगजेब ला भव्य दिव्य दाखवण्याचा सततचा खोटा इतिहास लिहून प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी पण त्यांचीच तळी उचलली कारण त्यांच्या अल्पसंख्य votebank ची त्यांना नेहमीच काळजी वाटत आली आहे. हिंदू votebank ची काळजी करण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही कारण त्यांनी हिंदूना आधीच जातीपातीत विभागून टाकले आहे.त्यामुळे अशा वातावरणात खोट्या इतिहासा बद्दल, इस्लामी उदात्तीकरणा बद्दल इतक्या परखडपणे लिहायला धैर्य लागते आणि भैरप्पांनी ते उदाहरणां सहीत, इतिहासातील अनेक सत्य दाखल्यांसहीत दाखवून दिले आहे. आवरण सुरू होते ते लक्ष्मीच्या कहाणी पासून, बंगलोर पासून जवळच असलेल्या गावातून आलेली मुलगी पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्ये शिकता शिकता अमीर नावाच्या मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि पुढे जाऊन इस्लाम स्वीकारून रझिया बनते. आधुनिक विचारसरणी आणि चित्रपट क्षेत्रात असल्याने पुढे जाऊन अमीरचे इस्लामिक चालीरीतींना अनुसरून वागणे आणि पुढे जाऊन एकूणच इस्लाम धर्मातील अनेक गोष्टींचा फोलपणा तिला लक्षात येतो. तिचे आप्पा हिंदू धर्माचे अभ्यासक असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मी गावी येते आणि आप्पांची ग्रंथसंपदा चाळत असताना अप्पांचा प्रचंड अभ्यास त्यांची टिपणं पाहून लक्ष्मी स्तब्ध होऊन जाते. इस्लामिक अत्याचारांची मालिका मग ती बाबरी मस्जिद असो, औरंगजेबने काशी विश्वेश्वराचा विध्वंस करून उभी केलेली ज्ञानव्यापी मस्जिद असो किंवा टिपूने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार असोत या सर्वच गोष्टींनी लक्ष्मी अस्वस्थ होते याच अनुषंगाने खरा इतिहास उजागर करण्यासाठी एक कादंबरी लिहिते, परंतु अशा स्फोटक सत्य लिखाणाला ना साहित्य वर्तुळातून, ना मीडिया कडून कुठूनच तिला सपोर्ट मिळत नाही, उलट अल्पसंख्य votebank दुखावण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्याचा प्रयत्न होतो आणि हर प्रकारे त्रास दिला जातो हा संपूर्ण कथाक्रम वाचणे खूपच वेदनादायी आहे. विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणार्या मायेला आवरण म्हणतात आणि असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात. इतिहास आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, अनेक संदर्भ दाखवतो पण विदृप इतिहासाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसेल तर आपला वर्तमान नक्कीच बदलला पाहिजे, इतिहासातील चुका सुधारल्या पाहिजेत तरच त्या इतिहासाचा काहीतरी उपयोग आहे. आवरण च्या पार्श्वभुमीवर आज काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार बनारस ला गेलो असताना स्वतः डोळ्याने पाहिला त्यामुळे पुस्तक वाचताना खूप भरून येत होते जे इतक्या शेकडो वर्षात होऊ शकले नाही ते आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहून ऊर भरून येतो, आता पुढे राममंदिराची घटना देखील तितकीच ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि सुखावणारी असेल. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आवरण, स्वतःला आतून बदलून टाकणारे आवरण नक्की वाचा.