माझे शेल्फ
बंधारा
शंकर पाटील सरांचा 11 कथा असलेला हा ग्रामीण कथासंग्रह आहे.वाचनीय आणि सुटसुटीत अशा या पुस्तकातील कथांमधून ग्रामीण जीवन,त्यात उमटणारे सुखदुःखाचे तरंग,त्याप्रसंगी पात्रांची मनःस्थिती, विविध मानवी स्वभावाचे उलगडलेले पैलू याची सुरेख गुंफण केलेली आहे. कथा वाचताना आपण पात्रांशी समरस होऊन जातो जणू काही हे सर्व आपल्या सभोवती घडत असल्याचा भास होतो.ओघवती भाषाशैली,ग्रामीण शब्दांचा परिणामकारक वापर यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कृत्रिमपणा वाटत नाही.त्यांच्या कथांमधून कधी रंगेल, कधी स्वार्थी तर कधी बेरकी राजकारणी, कधी प्रेमळ तर कधी राग अनावर झालेले आई-वडील,लालची पोलिस, पैशाचा माज असणारे खुनशी आणि पाशवी व्यक्ती,भित्रे तसेच जीवाला घाबरणारे मध्यमवर्गीय कुटुंब , एकाच वेळी आनंद ओसंडुन वाहणारी आणि दुःखा वेग दाबुन ठेवलेल्या व्यक्तींचा होणारा संवाद अशी विविध मानवी स्वभाव विशेष वाचनाची उत्सुकता वाढवतात. प्रत्येक कथा वाचकाला काहीतरी संदेश देऊन अंतर्मुख व्हायला भाग पाडते हिच खरी लेखकाच्या लेखणीची ताकद.