मुखपृष्ठ
भूमिकन्या

माझे शेल्फ

भूमिकन्या

इंग्रजी शीर्षक
Bhumikanya
सारांश

लेखकाने ‘भूमिकन्या’ हा कथासंग्रह वाचकांसमोर आणून गावात लपलेल्या वेदना सांगितल्या आहेत. किंबहुना ही त्यांनी शोषित स्त्रियांची त्यांच्या वतीने मांडलेली कैफियतही म्हणता येईल. कैफियत मांडताना सहसा तक्रारीचा सूर जास्त असतो; परंतु यादव यांनी या कथांमधून तक्रारी केलेल्या नाहीत. केवळ एक ग्रामीण सत्य परखडपणे मांडलं आहे. तेही ग्रामीण बोलीभाषेचा आधार घेत.वेदनांच्या शोधात... आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती स्वावलंबी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन तिच्या कर्तृत्वाचं आभाळ ती कितीतरी मोठ्ठं करु शकते. ती पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर त्याच्याही पुढं चार पावलं गेली आहे. केवळ शहरातच नव्हे गावाकडेही अलीकडे हे ित्र दिसतं. ती आता फक्त गृहिणी राहिलेली नाही. कर्तृत्वशालिनी झालेली आहे. तिचं व्यक्तिमत्व उत्तुंग होत चाललं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर चमकणाऱ्या स्त्रियांना पाहिलं की आपली खात्रीच होते की, स्त्री आता सोशिकतेपासून खूप दूर गेली आहे. तिचा ‘सासुरवास’ संपलाच आहे. मात्र हा आपला केवळ भ्रम आहे हे आनंद यादव यांचं ‘भूमिकन्या’ वाचल्यावर कळून येतं. खरं तर यादव यांचा ‘भूमिकन्या’ हा इथल्या भूमीवर स्वत:चं आयुष्य खडतरपणे जगणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांच्या भावनांचा हृदयस्पर्शी आलेख मांडणारा कथासंग्रह आहे. त्यांनी उभ्या केलेल्या स्त्रिया, त्यांचं जगणं, त्यांचा प्रत्येक श्वास वाचताना वाचकाला अस्वस्थ करून जातो. दारिद्र्यात पिचलेली स्त्री, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जगू पाहणारी स्त्री, नवरा अकाली गेल्यावर कष्ट उपसणारी स्त्री, घराच्या बाहेर पतीच्या मनासारखं काही घडत नाही म्हणून घरात फुकटचा मार सहन करणारी स्त्री, मुलीचं लग्न नीट व्हावं म्हणून कष्ट करत राहणारी स्त्री, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणारी स्त्री आणि पोटाची भूक शमविण्यासाठी पती देईल ते खाणारी स्त्री अशा कित्येक स्त्रियांनी यादवांना प्रचंड अस्वस्थ केले आहे. त्यांच्या जगण्याचा इतिहास समाजापुढे यावा हाच ध्यास जणू त्यांनी घेतलेला दिसतो. या कथासंग्रहात आदिजन्मातली माणसं, टक्के उडालेला मोर, लेक लग्नाची, जल्माचं सोनं झालं, पोटुसंपण, वाकळ, बायकांचा जल्म, पांद, भूक, नरमेध या कथा स्त्रीच्या सोशिकतेची परिसीमा अधोरेखित करतात. केवळ सोशिकपणाच नाही तर वर्षातून एकदा एक तसाचा का होईना पण मिळणारा नात्याचा सहवास त्यांना किती सुखावून जातो याचाही प्रत्यय वाचताना येतो. म्हणूनच ‘आदिजन्मातली माणसं’ मधली शांता भाऊबीजेच्या तासाभरानं मोहोरुन गेलेली दिसते, परंतु कित्येक वर्ष त्याच चाकोरीतनं जाणाऱ्या तिचं ते सुखही मनाला बोचत राहतं. माळरानावरच्या शिळेनं कित्येक वर्ष जशाचं तसं राहावं तसं. ‘टक्के’ उडालेला मोर मधली मुमताज मात्र वेगळ्या कारणानं आपल्याशी संवाद साधते. एक अनामिक नातं जोडल्यावर ते जेव्हा अपघाती तुटतं तेव्हा तिचं मन टाहो फोडतं. फक्त ते कुणालाच कळत नाही. कळतं तिच्या मनाला कारण तिच्या डोळ्यातले अश्रू मनाला बजावून सांगतात - ‘कुणावर जास्त माया लावू नये.’ लेखक मुमताजचं मुकेपणच बोलकं करतो. दुसऱ्या एका ‘कळी फुलतानाचे दिवस’ मध्ये तर लेखक लग्नाची झालेल्या मुलीच्या मनाचा विचार न करता केवळ वयात लग्न झालं पाहिजे म्हणून कुणाही बरोबर (मुलीला न शोभणाऱ्या) लग्न लावून देतात अशा पालकांवर प्रहार करतात. त्यांच्याबद्दलचा रागही प्रकट करतात. ‘बायकांचा जल्म’ या कथेत आक्काच्या भावना चित्रित करताना लेखक आक्काच्या जीवनाची परवड जिवंत करतो. आनंद यादव यांच्या साऱ्या कथा ग्रामीण वातावरणातल्या तिथली परिस्थिती, तिथल्या व्यक्तिरेखा घेऊन लिहिल्या गेलेल्या. आज एकविसाव्या शतकात प्रवेश करताना ग्रामीण स्त्रियांची होणारी परवड विचार करायला लावणारीच नव्हे तर क्लेशकारक आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
108
भाषा
मराठी
किंमत
90.00
ISBN
9788177660456
समुदायाने जोडले
बंद