माझे शेल्फ
चौंडकं
दोन दोन आठवडे आंघोळ न करणाऱ्या सुलीच्या डोक्यात एक जट दिसते म्हणून आई व आजी तिला गावातल्या जोगतीणीकडे घेऊन जातात. यल्लूमाई तुमच्या घरी आली! जोगतीण डोंगरावरच्या देवीला घरात आणायला आणि घरातल्या निष्पाप पोरीला देवीला वाहायला सांगते. सुलीच बाप विरोध करतो म्हणून म्हातारी व सुलीची आई महिनाभर त्याच्याशी भांडतात आणि शेवटी सुलीला डोंगरावरच्या देवीला वाहतात. देवीची जोगतीण म्हणजे गावातल्या सगळ्या पुरूषांची भोगवस्तू! त्यात वयात आलेली देखणी सुली पाहून सगळ्यांच्या नजरा चळतात. साऱ्या गावाखाली झोपण्यापेक्षा एक बाप्या बरा म्हणून सुली बबन्याला पकडते. पहिल्यांदा त्या दोघांत प्रेम फुलतं मग सुलीचं पोट फुगतं आणि शेवटी सुली गर्भ वाढवायचा धाडसी निर्णय घेते. सुलीच्या आयुष्याचं वाटोळं करून म्हातारी अगोदरच उलथलेली असते. कालपर्यंत सुलीला देवी समजणारी तिचीच आई आता तिला वेश्या म्हणू लागते. सुली मात्र गर्भ ठेवायच्या निर्णयावर ठाम असते. आई सुलीच्या मामांना बोलावून घेते व हिने घराची आब्रू घालवली. हिला एखाद्या डोंगरात नेऊन पुरा म्हणून भावांचं पाय धरते. घरात परंपरेने पुजला जाणारा देव्हारा आणि देव असतानाही घरात अशी नवी देवी आणून बसवणारे, केसांच्या गुंत्याल्या देवीची जट समजून जपणारे, हातात परडी घेऊन गावात पाच घरं मागणारे; घराजवळ कुणीतरी लिंबू-मिरची टाकून करणी केली म्हणून देवरूषाकडे जाणारे... श्रद्धा व अंधश्रद्धा यातला फरक न समजणाऱ्या अशिक्षित समाजाची केविलवाणी कहानी. राजन गवस यांची कादंबरी - चौंडकं.