मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चिअर्स

इंग्रजी शीर्षक
Cheers
सारांश

‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. माणूसवेड्या माणसाने जमवलेली रंगतदार मैफल चिअर्स... चिअर्स म्हणून मैफलीला आरंभ केला की तिचा रंग मदहोश होता जातो. विख्यात कथाकथनकार व. पु. काळे अशा मैफली रंगवण्यात मातबर आहेत. मैफल रंगवायला माणसेही जबरदस्त लागतात. वैचित्र्यपूर्ण आयुष्य जगलेली, जीवनातल नाट्यपूर्ण चढ-उतार बघितलेली, खूप काही भोगलेली. सोसलेली. एरवीही माणसे आपल्या अनुभवाचे भांडार आपल्या मनाच्या गाभाऱ्यात ठेवून त्याची हळुवारपणे जपणूक करीत असतात. परंतु एखाद्या मैफलीत, दोन-चार पेग अंगांगात रिचल्यावर, थोडी फार बंधनमुक्त होतात आणि आपल्या त्या अद्भूतरम्य जंगी खजिन्यातल्या काही चित्रांची चुणूक दाखवण्याएवढी मोकळी होतात. असे मोकळे झाल्यावर मग मैफलीला बहार येते. अज्ञातावरचे आवरण दूर होते आणि मानवी मनाच्या गहन गूढतेचे अलौकिक दर्शन घडते. व.पु. काळे अशा या लौकिकातील अलौकिकाचे दर्शन घेण्यात रमतात आणि असे काहीतरी दिव्य भव्य समोर आल्यावर नतमस्तक होतात. आपल्या त्या अनुभवात ते मग आपल्या वाचकांनाही कधी कधी सामील करून घेतात. चिअर्स असे म्हणून, अनुभवाचा चषक उंचावून ते आपल्याला अशाच एका मैफलीत मनःपूर्वक सामील करून घेत आहेत. रसिकराज रामभूय्या दाते, जिंदादिल शायर– भाऊसाहेब पाटणकर, जाज्ज्वल्य हिंदुत्व निष्ठा जपणारे पु.भा.भावे अण्णा, शोधून न सापडणाऱ्या आणि मागून न मिळणाऱ्या आयुष्याचा जमेल तसा डाव मांडणारे गीतकार सुधीर मोघे, झोपेचा वेळ सोडला तर अखंड पुस्तक विक्रीचे व्रत चालवणारे आयडियलचे कांताशेठ नेरूरकर, तुम्हाला गाफील ठेवून तुमचा नेमका मूड कुशलतेने टिपणारे छायाचित्रकार राजदत्त, संगीतकारांच्या हुबेहुब नकला करणारे नकलाकार वि.र. गोडे, कुटुंबाच्या गरजा संपल्या की कर्तापुरुष कुटुंबाचं देणं लागत नाही; त्यानं चार भिंतीच्या बाहेर पडायला हवं तरच तो मोठा होईल, असे सांगणारे आणि त्याप्रमाणे वागणारे डॉ. श्रीखंडे, आपल्या हातचलाखीने बघता बघता हातातला रुपाया गायब करून चकित करणारे जादूगार अशोक अशा माणसांना चिअ र्स म्हणून मैफलीत आणून वपुंनी या मैफलीचा थाट खुलविला आहे. इतरही माणसांना वपुंनी या मैफलीत सामील करून घेतले आहे. त्यात इंदूरचे ज्योतिषी अण्णा पुराणिक आहेत. या पुराणिकांनी बॅ. महमद अली जीना यांनाही आपल्या ज्योतिषशास्त्राच्या बळावर काबीज केले. मोरारजीभार्इंनी मुख्यमंत्री असताना सचिवालयातील कार्यालयात बोलावले तेव्हा ``माफ करा. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत देशाच्या भवितव्याचा विचार करायचा, स्वतःचा नव्हे.`` असे त्यांना सुनावण्याएवढा परखडपणाही अण्णा दाखवतात आणि अपॉइंटमेंट शिवाय मला कुठल्याही दिवशी सकाळी चहाच्या वेळी भेटू शकता असा कायमचा पास मिळवून ठेवतात. हे अण्णा मैफलीच्या बादशहांचे बादशहा असतात. वेळ, काळ, रात्र, दिवस, वय, वर्ष कशाचाही हिशेब नसतो. वपुंच्या इंदौरच्या ट्रिपा अण्णांमुळे संस्मरणीय होतात आणि इंदौरच्या स्वागताच्या एकूणच खानदानीपणाच्या गोष्टी सांगण्यात मशगुल होतात. वपुंची कुंडली ते मागतात. वपु त्यांना सांगतात, अण्णा, तसा खूप गोष्टींचा कंटाळा आलाय. नोकरी, दौरे, लेखन, कथाकथन सगळी पळापळ फुकट आहे. सगळं चांगलं असून वैयर्थाची भावना छळत राहते. केव्हातरी हे सगळं थांबायला हवं. एकदम वेगळा, चिरंतन प्रवासाचा ट्रॅक हवाय.` त्यावर अण्णा सांगतात– ``तुमचा कर्केचा गुरू आहे. रास तूळ आहे. वैराग्याचा सूर कायमच राहणार. काहीही करायचं नाही. काहीही सोडायचं नाही. जुनं सगळं करता करताच नवं सापडेल. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी आपण प्रथमच श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच की नाही?`` चित्रलेखा नाट्यसंस्थेचे अध्वर्यू मोहन वाघ हे उत्तम छायाचित्रकारही आहेत. वपुंनी मोहन वाघ आणि पंजा नामक मासिक चालवणारा खराखुरा वाघ यांच्यातील सामना घडवून आणला आहे. या खऱ्याखुऱ्या वाघाला वाघीण नावाच्या नव्या मासिकासाठी मुखपृष्ठावर टाकण्याकरिता चित्र हवे आहे. संपूर्ण विवस्त्र अवस्थेतील चित्र वाटायला हवे आणि ते काढायला आपले सोज्ज्वळ मोहन वाघ तयार होत नाहीत. वाघांच्या रानटी दुनियेत वाघ मादीने कपडे घालणे हीच अश्लीलता समजली जाते. त्यामुळे डोक्यावरून पदर घेतलेला, हातात तबक असलेला नटीचा फोटो बघून हा पंजा मासिकाचा संपादक गर्जना करीत ओरडतो, ``तुम्ही सभ्य आहात असं समजत होतो. पण तुमच्याजवळ एवढा घाणेरडा फोटो?`` आणि तो सरळ मोहन वाघांवर उडी घेतो. अर्थात दोन वाघांची ही सगळी मुलाखत स्वप्नात होते असे दाखवून व.पु. काळे वाचकांना (आणि मोहन वाघांनाही) वाचवतात– हे अलाहिदा! नाहीतर मोहन वाघांना ऑल दि बेस्ट किंवा रणांगण सादर करण्याची संधी कशी लाभली असती? जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरचा या पुस्तकातला लेख सर्वात जास्त लांबीचा आहे. त्यात अनेक शेरही उद्धृत केले आहेत.

फ्रॅंक तसा कांहीसा पुराणमतवादीच असतो.मुलींनी पारदर्शक अंतर्वस्त्र घालणं, पातळ पायमोजे घालणं, केस कापणं, रंगभूषा करणं,उंच टाचांचे बूट घालणं, नखरंग लावणं,जाझ संगीत ऐकणं,मुलांशी मैत्री करणं,अशा बऱ्याच गोष्टी त्याला आवडत नसत.पण हे सारं मुलांच्या काळजीपोटी होतं.या माणसानं आयुष्यभर अनावश्यक हालचाली टाळून कामातली गती कशी वाढवावी याचाच ध्यास घेऊन काम केलं होतं.एकदा कुणीतरी त्याला विचारलं, प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वेळाचं करायचं तरी काय ? त्यावर फ्रँकनं मिश्कीलपणे सांगितलं होतं, त्या वेळात आणखी काम करायचं ,शिक्षण घ्यायचं,कलानिर्मिती करायची,मौज करायची आणि तुमचं मन त्यातच गुंतलं असेल तर एक पेग घ्यायचा. अनुवादातून परभाषेतली जी अप्रतिम पुस्तकं मराठीत आली त्यातलं हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. आजच्या एखाद दुसऱ्या मुलाला वाढवताना मेटाकुटीला येणाऱ्या जमान्यात हे पुस्तक जादूचा दिवा वाटावं असं आहे.संस्कार होण्याची प्रक्रिया ही देणारा आणि घेणारा या दोघांच्या क्षमतेवर निर्भर असते,हे खरं.पण देणाराला तो किती वैविध्यानं आणि छानपणे देता येतो याचं हे पुस्तक म्हणजे साक्षात दीपस्तंभ आहे असं मला वाटतं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
134
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788177663631
समुदायाने जोडले
बंद