मुखपृष्ठ
चरित्ररंग

माझे शेल्फ

चरित्ररंग

इंग्रजी शीर्षक
Charitrarang
सारांश

व्यंकटेश माडगुळकर यांचे चरित्ररंग हे पुस्तक देश-विदेशातील लेखक, चित्रकार आणि कलावंत यांची ओळख करुन देणारी व्यक्तिचित्रे आहेत. स्वतः लेखक एक प्रतिभावान चित्रकार, कथा, पटकथा, कादंबरी लेखक.निसर्गलेखन हा सुध्दा व्यंकटेश उर्फ तात्या माडगूळकर यांच्या आवडचा विषय होता. मारुती चितमपल्ली यांच्याबरोबर नागझिरा, नवेगाव बांध या जंगलात तात्यांनी भटकंती करून अप्रतिम निसर्गलेखन केले आहे.या अनुभवावर त्यांनी ` नागझिरा हे पुस्तक लिहीले व काझिरंगा अभयारण्याला भेट दिल्यावर त्यांनी जंगलातले दिवस हे पुस्तक लिहीले.बनगरवाडी या पुस्तकात ग्रामीण जीवनाचे सर्व अंतरंग येतात.सत्तांतर या पुस्तकात जंगलातील वानरांच्या टोळीतील अल्फा मेल होण्यासाठीच्या लढाया आणि माणसांचे राजकारण यातील परस्परसंबंध दाखविला आहे.त्यांना शिकारीची सुध्दा आवड होती.गदीमांसारख्या शब्दप्रभू भावाच्या सावलीत राहून सुद्धा आपली स्वतःची वेगळी ओळख असलेले लेखक आहेत. त्यामुळे त्यांनी निवडलेली व्यक्तिचित्रे ही लौकिकार्थाने अश्या सामान्य वाचकांसाठी आहे की ज्यांना हे विदेशी लेखक, चित्रकार यांची फार ओळख नसते व त्यांच्या साहित्य व कलेशी ते अनभिज्ञ असतात, एकूणच सध्याच्या वाचनशत्रु संस्कृतीत हे पुस्तक नव्या वाचकांना जागतिक साहित्य आणि कला यांच्याकडे कसे पहावे याची दृष्टी देतो. “एखाद्या लेखकाचे लेखन मनःपूर्वक वाचने म्हणजे सावकाशीने त्याची घेतलेली गाठभेटच असते" असे जेव्हा माडगुळकर लिआम ओ फ्लहार्टी या लेखकाच्या "गळ" या seagull पक्ष्याच्या कथेविषयी सांगतात तेव्हा ती कथा आपल्याकडल्या एखाद्या कोळीवाडयातच घडते असे वाटते आणि कळते की आपल्या भावना ह्या वैश्विक असतात. लेखकाचे गाव लेखकाचे घर या लेखात जॉन स्टाइनबेक या नोबेल आणि पुलित्जर पारितोषिके मिळवलेल्या अमेरीकन लेखकाचे "सालिनास" हे मूळ गाव आणि "कॅनरी रो" ही त्याची कर्मभूमी असलेल्या गावांना भेटी देण्याचा योग प्रस्तूत लेखकाला आला, स्टाइनबेक च्या कथांमध्ये आढळणाऱ्या पात्रांचे संदर्भ आपल्याला या गावातल्या स्टाइनबेक चे घर आणि परिसरातून दाखवतात. चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या म्युझिअम च्या उद्घाटनानिमित्ताने "केनिथ विल्की" या पत्रकाराला व्हॅन गॉग वर एक लेख लिहायला सांगण्यात आले, त्या निमित्ताने कोणीही आजवर उजेडात न आणलेली माहिती केनिथला मिळाली आणि ती मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न यावर "दी व्हॅन गॉग असाइनमेन्ट"हे पुस्तक लिहिले. त्यातल्या काही सुरस व चमत्कारिक प्रसंग या लेखात माडगुळकर यांनी उधृत केले आहेत. त्या वाचून आपल्या मनात विचार येतो की उपलब्ध चरित्रा पलीकडे सुद्धा एक चरित्र असते, आणि ते लिहिणारे लेखक ही दुर्मिळ असतात. “चित्रकार देउसकर "या लेखात मोठ्या कलावंतांची शासकीय धोरणांमुळे कशी परवड होते हे सांगितले आहे. “चांगला मित्र, चांगला लेखक" आणि शेवटचा प्रवास या लेखांमधुन माडगुळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने कथाकथन या त्या वेळी नविनच असलेल्या उपक्रमाचा पायारंभ कोणत्या कारणामुळे झाला हे सांगितले आहे. माडगुळकरांचा चित्रपट सृष्टीतील पटकथाकार आणि संवादलेखक आपल्याला शंकर घाणेकरांवर लिहिलेल्या "भल्याची दुनिया" आणि "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" या लेखांमधुन दिसतात. एकूणच एका कलासक्त लेखकाने लिहिलेली ही व्यक्तीचित्रे मनाचा ठाव घेतात.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
90
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788184983579
समुदायाने जोडले
बंद