माझे शेल्फ
द हंग्री टाइड
बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे.