माझे शेल्फ
द पार्टनर
कायदेशीर सल्लागार कंपनीत भागीदार असलेला एक सरळमार्गी, बुद्धीमान वकील. त्याचे बाकी 3 भागीदार त्याला हाकलून देवून एका अशीलाकडून, एका खटल्यात तडजोड करून मिळणाऱ्या कमिशन पोटी मिळणारी 9 कोटी डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम परस्परात वाटून घेणार असतात. नायकाला ाचा सुगावा लागताच तो हा डाव उलटवायचा चंग बांधतो. चोरावर मोर बनण्यासाठी तो अनेक युक्त्या लढवतो. अगदी स्वतःच्या मरणाची सुद्धा ! वकील असलेल्या बुद्धीमान मैत्रिणीला विश्वासात घेवून तो ही रक्कम इतर बँकात रातोरात वळती करतो. पैसे हवेत गायब झाले हे त्याने मेल्याचे नाटक वठवल्यावर चार दिवसांनी बाकी भागीदार मित्रांना समजते पण तो पर्यंत नायक देशाबाहेर परागंदा झालेला असतो ! ते त्याला पकडून, आपले पैसे वसूल करण्यासाठी, प्रचंड पैसे मोजून एका निवृत्त फेडरल अधिकाऱ्याला नेमतात. एवढी मोठी रक्कम सरकारला फसवून आलेली असल्याने एफ बी आय सुद्धा त्याच्या मागावर लागते. 4 वर्षे या सर्व यंत्रणांना यशस्वी गुंगारा देणारा नायक मग स्वतःच प्रगट होण्याचा एक भन्नाट प्लान आखतो ! आपल्या कुशाग्र मैत्रिणीची मदत घेवून तो आपल्या मागावर असणाऱ्या खाजगी हेराला 10 लाख डॉलर्स च्या बदल्यात आपलाच गुप्त जागेचा पत्ता देतो ! पुढे अनेक नाट्यमय प्रसंग घडून एफ बी आय त्याचा ताबा घेते. आता नायकावर अनेक सरकारी व खाजगी यंत्रणा तुटून पडतात. आपल्या ऐवजी त्याने ज्याला मेला म्हणून दाखवले असते त्याच्या खुनाची केस, त्या मृदेहाची विटंबना केली अशी एक केस, त्याच्या अप्रामाणिक बायकोचा घटस्फोटाचा दावा, मरणाचे नाटक करून विम्याची रक्कम उकळली म्हणून विमा संस्था दाखल करतात ती अजून एक केस. पैसे वसूल करण्याची संधी गेल्याने बाकी भागीदार त्याच्या जीवावर उठलेले असतातच ! या सगळ्याचा शेवट कसा होतो हे प्रचंड रोमांचक आहे ! एकेक खटल्यातून, जीवाला असलेल्या धोक्यातून तो कसा सुटतो ? त्याला कोण मदत करत ? त्याची मैत्रीण त्याला कशी साथ देते ? मी नाही सांगणार .. पुस्तक वाचा ! तब्बल 375 पानांची ही रहस्य कथा एकदा वाचायला घेतली की खाली ठेवावी असे वाटतच नाही ! अनुवादक विभाकर शेंडे यांचा अनुवाद सुद्धा अगदी ओघवता आहे ! जरूर वाचावी अशी रहस्यकथा !