माझे शेल्फ
द रनअवे ज्युरी
प्रदीर्घ सूडकथा... ‘द रनअवे ज्युरी’ ही जॉन ग्रिशॅम यांची कादंबरी. जॉन ग्रिशॅम हा बांधकाम कामगाराचा मुलगा. ‘व्यावसायिक बेसबॉल खेळाडू’ व्हायची स्वप्ने बघत होता, परंतु त्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याकडे नाहीत हे लक्षात येताच त्यांनी कायद्याची पदवी घेऊन दा वर्ष वकिली केली. १९८३ ते १९९० या काळात विधनसभेवर निवडून येऊन त्यांनी कार्य केले. एक दिवस बारा वर्षांच्या बलात्कारित मुलीची कहाणी ऐकून त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली. काम करून लिखाण करायचं, पण प्रकाशक पटकन स्वीकारायचे नाहीत. नंतर ‘कायदेविषयक रोमांचक वाङ्मय लिहिणारा लेखक’ ही पदवी मिळण्याआधी ते मिसिसिपीमध्ये आठवड्याला साठ ते सत्तर तास काम करणारे वकील होते. त्यातून ते लेखन छंद जोपासत. लवकरच लेखन छंदाचे पूर्ण वेळ व्यवसायात रूपांतर होऊन त्यांनी लोकप्रिय आणि रोमांचक कादंबऱ्यांचा सिलसिला चालू केला. त्यांच्या नऊ कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यांच्या अनेक कादंबऱ्या बेस्ट सेलर ठरल्या. फक्त कायद्याशी संबंधित विषयांवरच कादंबऱ्या लिहिण्यात हातखंडा असलेला हा जगीर नावाजलेला अमेरिकन कादंबरी लेखक. या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे अनिल काळे यांनी. या अगोदरही काळे यांनी मराठी अनुवाद केलेला आहे.त्यांची साधीसोपी, रंजक भाषाशैली अभ्यासू वृत्तीची जाणीव करून देते. या कादंबरीमध्ये अमेरिकन न्यायपद्धतीप्रमाणे अगदी ज्युरींच्या निवडीपासून ते पार खटल्याच्या निकालापर्यंत जे काही भयंकर आणि भ्रष्ट प्रकार दाखवले आहेत, ते खरोखर सुज्ञ वाचकांचे मन सुन्न करणारे आहेत. (इथे हिंदुस्थानात तरी यापेक्षा वेगळी परिस्थिती कुठे आहे?) या प्रकारांबरोबरच ‘बिग बिझनेस’मधील सर्व तऱ्हेचे उच्च पातळीवरचे गैरप्रकारही असेच आहेत. मात्र खटल्यातील साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने ‘सिगारेट’, ‘तंबाखू’, ‘निकोटिन’ या विषयांवर झालेल्या आणि होत असलेल्या प्रचंड संशोधनाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती माहिती मात्र शहारे आणणारी आहे. सिगारेट ओढण्याच्या किंवा इतर प्रकारांनी तंबाखू सेवनाच्या ‘स्वत:पुरत्या निर्णयाचा अधिकार प्रत्येकाला आहे खरा, पण प्रचंड जाहिरातबाजी करून आणि निकोटिनसारखे तंबाखूची सवय लावणारे रसायन अजिबात कमी न करता सिगारेट व इतर तंबाखूची उत्पादने सर्रास प्रचंड प्रमाणावर उत्पादित करून ती विकली जातात. तेव्हा हा तथाकथित स्वयंनिर्णयाचा अधिकार केवळ कागदावरच उरत नाही का? हा या कादंबरीत विचारलेला प्रश्न मोठा विचार करायला लावणारा आहे. सिगारेट कंपन्या, न्यायव्यवस्था, राजकीय दबाव गट अशा प्रचंड व्यापक पार्श्वभूमीवर अत्यंत कल्पकपणे रंगवलेली, सत्य आणि कल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेली ही एक प्रदीर्घ सूडकथा आहे. या कादंबरीस योग्य न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या कौशल्यपूर्ण अनुवादाने अनिल काळे यांनी केला आहे.