माझे शेल्फ
द टेस्टामेंट
‘टेस्टामेंट’चा अर्थ मृत्यूनंतर आपल्या मिळकतीची व्यवस्था काय असावी, यासंबंधी लिखित सूचनापत्र. कादंबरीची सुरवात अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातील एका आलिशान इमारतीत होते. ही इमारत ट्रॉय फेलन या मान्यवर, धनाढ्य पण विक्षिप्त उद्योगपतीच्या मालकीची असते. तो आपला वकील, तीन मानशास्त्रज्ञ ह्यांच्या उपस्थितीत आपले मृत्यूपत्र लिहितो, लगेच १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतो. आपल्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात मृत्युपत्र एक महिन्याने उघडण्याची सूचना देतो. त्याच्या तीन घटस्फोटीत पत्नी व त्यांची ६ मुले ही अकरा बिलीयन (११ अब्ज) डॉलर्सची संपत्ती आता आपल्यालाच मिळणार ह्या खुषीत वारेमाप खर्च सुरू करतात. मृत्यूपत्राचे वाचन फेलनच्या सूचनेप्रमाणे एक महिन्याने होते. याद्वारे मागील सर्व मृत्युपत्र रद्द होऊन सध्याचे मृत्युपत्र वैध ठरते. या मृत्युपत्राप्रमाणे त्याच्या संपूर्ण संपत्ती त्याची चौथ्या पत्नीची मुलगी रॅचेल लेनला मिळावी, पत्नी व ६ मुलांना मृत्यूच्या दिवशी जेवढे प्रत्यकाचे कर्ज असेल, ते फेडण्यापुरतीच रक्कम द्यावी अशी व्यवस्था असते. अर्थातच या नऊ व्यक्ती ते सहजासहजी मान्य करणार नाहीतच तर मृत्युपत्र लिहिताना फेलन हे मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हते, असा दावा करून मृत्युपत्राला आव्हान देतील, अशी फेलनच्या वकिलाला खात्री असतेच. पण मृत्युपत्र वैध असल्याचीही त्याला खात्री असतेच. रॅचेल लेनच्या ठावठिकाणाबद्दल फारशी माहिती नसते. ती एका जागतिक आदिवासी कल्याण संस्थेच्या तर्फे धर्मप्रचारक म्हणून ब्राझीलमधील पेंटॅनल येथे आल्याची माहिती उपलब्ध होते. पेंटॅनल हा पराग्वे नदीकाठी पसरलेला अत्यंत विस्तीर्ण, निबिड, घनदाट अरण्य, वन्य पशुपक्षी, सुसरी, विषारी साप, अजगर ह्यांनी भरलेला प्रदेश आहे. येथे फक्त काळे वाल, भात आणि फळे हेच आदिवासींचे अन्न असते. रोगराई, साथीचे रोग भरपूर, ह्या दुर्गम स्थळी जाऊन आदिवासींच्यातीलच एक बनून त्यांच्यात शिक्षण, आरोग्य, जागृती व धर्मप्रसार करणे ही कामे खिश्चन मिशनरी करतात. किंबहुना आपले आयुष्य त्याकरता समर्पित करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की रॅचेलला शोधणार कसे व कुठे? याकरता फेलनचा वकील आपल्याच एका जुन्या सहकाऱ्याला जो अतिदारूप्राशनामुळे एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असतो त्यालाच नियुक्त करतो. हाही एक निष्णात वकील असतो, ही काळजी प्रतिस्पर्ध्यांना माहिती मिळू नये याकरता घेण्यात आलेली असते. त्याचे नाव नेट रॉयले असते. नेट ब्राझीलमधील कोरूंबो गावी जाऊन योग्य व्यक्तीशी संपर्क साधतो. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने विमानातून जातो, खराब हवामानामुळे त्यांना योग्य जागी पोचताच येत नाही. उलट वादळामुळे विमान दुरूस्तीपलीकडच्या अवस्थेत जाते. परतीचा प्रवासही त्रासदायक असतो. तरीही हिंमत न हरता तो परत बोटीने, होडीने प्रवास करतो व दुर्गम जागी पोचतो. सुदैवाने रॅचेल त्याला तिथे भेटते. नेट आपल्या येण्याचा उद्देश स्पष्ट करतो व ती ११ बिलीयन डॉलरची जगातील एक अतिधनाढ्य व्यक्ती बनल्याचे तिला सांगतो. याकरता दोन कागदांवर सह्या करण्याची विनंती करतो. ती हे दान नाकारते कारण ह्याकरता मी काहीही केलेले नाही, ज्यानं ते मिळवले तोही मला माहीत नाही. मी माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा प्रभूला अर्पण केल्या आहेत आणि मी सर्वार्थाने आणि पूर्णार्थाने स्वस्थ जीवन जगत आहे. नेट तिला समजावण्याचा प्रयत्न करतो व शेवटी परतायचा निर्णय घेतो. लहान होडीने ते परतू लागतात. मोठी बोट वादळात बुडलेली असते. येथे तो डेंग्यूने फणफणतो, पण कसाबसा कोरुंबाला परततो. येथे दलालांविषयी त्यानी लिहिलेली माहिती देणे अप्रस्तुत ठरणार नाही. ब्राझीलमध्ये कुठलेही सरकारी काम यांच्या मदतीशिवाय होऊ शकतच नाही. यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची, अनुभवाची जरूर नसते. तर एका दलालामार्फत हा पासपोर्ट मिळवतो व अमेरिकेत परत जातो. आता फेलनचे वारसदार व रॅचेलचे वकील यांच्यात जबरदस्त कायदेशीर लढाई सुरू होते. फेलनच्या वारसदारांना सत्याची चाड नसतेच. त्याकरता खोटे साक्षीदार उभे करून ते मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान देतात. नेट हा अत्यंत हुशार वकील असल्याने तो त्या साक्षीदारांच्या साक्षीच्या चिंधड्या उडवतो व साक्षीदारांना उघडे पाडतो. अद्याप रॅचेलच्या सह्या मिळालेल्या नसतातच. नेटला तिच्या मन:स्थितीची जाणीव असल्याने ते तडजोडीचा प्रस्ताव मांडतात, ज्याद्वारे प्रत्येक वारसदाराला ५० मिलीयन डॉलर मिळतात, उरलेली संपत्ती रॅचेलला मिळण्याची तडजोड होते. अर्थात वारसदारांना हे घबाड आयतेच मिळते, वकिलांना कमिशन मिळते. रॅचेलला पटवून देऊन ह्या रकमेचा ‘रॅचेल ट्रस्ट’ स्थापन करून काही योग्य अटी ठरवून हा पैसा वापरावा असे ठरते. त्याकरता रॅचेलची संमती आवश्यक असते. अर्थात ते काम करण्याकरता नेटचीच नियुक्ती होते.