माझे शेल्फ
धिंड
ग्रामीण ढंगाच्या अस्सल कथा… ग्रामीण कथाकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या, गावरान बोलीचा ठसका प्रकट करणाऱ्या शंकर पाटील यांचे कथासंग्रह नव्या देखण्या स्वरुपात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे मराठी रसिकांच्या भेटीला आले आहेत. शंकर पाटील यांची कोल्हापूरकडील गावरन बोलीभाषा, चटपटीत संभाषणांचा इरसाल बेरकीपणा, ग्रामीण जीवनातला पिढीजात शहाणपणा, परंपरेचा सामूहिक अंत:स्तर आणि कथानिवेदनातील उत्कंठावर्धक अनपेक्षित बाज यांनी मराठी ग्रामीण साहित्य आणि चित्रपटांना सत्तर-ऐंशीच्या दशकात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अस्सल मराठी मातीचा कणखरपणा आणि बेरकीपणा पाटील यांनी जसा पकडला, तसा तो इतर लेखकांना सहजी पकडता आला नाही. कथाकथनाच्या माध्यमातून अनुभवविश्वात स्थानापन्न केले आणि खेड्यांपासून मनोमन दूर गेलेल्या नगरजनांनाही आपली नाळ नेमकी कुठे जोडलेली आहे हे उत्कटपणे दाखवून दिले.पाटील यांच्या आयुष्यातील पहिली पंधरा वीस वर्षे खेड्यात गेली. त्यामुळे त्या खेड्यापाड्यातील बारा बलुत्यातील शेकडो व्यक्ती आणि शेकडो घटना त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या त्या व्यक्तींना, त्या घटनांना अस्सल कोल्हापुरी बोलीत जिवंत करण्याची त्याची हातोटी विलोभनीयच! त्यामुळे आता खेडी बदलत असली तरी पाटलांच्या या कथांतील माणसे आणि घटना अजूनही आपल्याला साद घालू शकतात. ‘धिंड’ ही कथा पाटील यांच्या लेखनाची सगळी वैशिष्ट्ये प्रकट करणारी आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा त्यांच्या गाजलेल्या कथांमध्ये गणली जाते. जो कोणी मद्य प्राशन करील त्याची गावातून धिंड काढायची असा ठराव ग्रामपंचायतीत १५ ऑगस्टला मंजूर होतो आणि चार दिवसांनी तशी पहिलीच केस राऊ खोताची मिळते, तेव्हा सगळ्या गावात एकच धमाल उडते. भातमाऱ्याचा शिरपा धापा टाकत चावडीत येतो आणि राऊ खोत दारु पिऊन हाल्ट झालाय... घरातच बायकोसंग धुमडी घालतोय अशी बातमी देतो. पाटील आपले बूड हलवत पुढं झुकून नव्या हुरुपानं ह-ह-ह करीत समद्यांना आज्ञा देतात, ‘अरं बघा बघा, त्याला घेऊन या जाव!’ तराळाला ते सांगतात, ‘बघत काय ऱ्हायलाईस?’ खोताचा रा, दारू पिऊन हाल्ट झालाय... अगुदर दवंडी द्यायला भाईर पड. पाक सारं गाव गोळा व्हायला पाहिजे. सूट म्हणावं. राऊ खोताची गाढवावरनं धिंड काढायची हाय. लगोलग सगळे चावडीवर या. ऐका हो ऐका. चावडीवर लगेच ही गर्दी होते. पंचमंडळी येतात. राऊ खोत येताच पोरं शिट्ट्या मारू लागतात. गाढव उधळतं, सरपंच रामभाऊ विभुते खोताला विचारतात. ‘दारू प्यालास की न्हाई?’’ गुन्हा कबूल हाय का न्हाई? खोत नागाच्या फडीगत झुलल्यागत म्हणतो, ‘‘म्या दारुला शिवला न्हाई’... उगा इनकारणी माझ्यावर अदावत घेऊ नका. ‘मग माळ्यावर तिनीसांजचा काय करत होतास? गडद झोपलो होतो. दारू घेतली न्हवतीस तर घरात बायकूसंग वाद का घालत होतास? मग कुणासंग वाद घालायचा? तुमच्याबरोबर कबूल कर. वास घ्या की त्याच्या तोंडाचा. सबंध चावडीत वास दरवळत होता. वास याचाच की! त्यो तुमच्या नाकात बसलायगा. पाटील मग शेवटचा फ़ैसला सुनावतात. काय लागलाय त्याच्या नादाला?सबंध चावडी घानाय लागलीय. भपकारा याय लागलाय...ते काय सुद्दीत न्हाय... सरळ बोलेना. उचला आणि ठेवा गाढवावर याला. राऊ खोताला गाढवावर उलटं बसवतात. तोंड मागं, पाठ पुढं, खेटराची माळ घालतात. बचकभर गुलाल उधळतात. लेजीम, हलगी, एकच गदारोळ. मारू लागतो. डांग टिकटाक टिक डांग टिकटिक. त्याच्या त्या नादावर लोक नाचू लागतात. गल्लीबोळानं धिंड फिरते. रात्रीचे दोन वाजतात. राऊ तरीही गाडवावरनं उतरायला नकार देतो. अजून म्हारुडा ऱ्हायलाय, मांगुडा ऱ्हायलाय... संबंध गाव म्हंजे संबंध गाव पालथा घालय पायजे. अर्धी धिंड काढता का माझी? लोक दमून गेल्यात. तुला हौस असंल तर उद्या परत फिरु, रामभाऊ समजावू पाहतात. उद्याचं काय नका सांगू... ते कोण चाललेत परत? बोलवा त्यांना... राऊ कुणाल जाऊ देईना. मधनं गेलं तर त्याच्या सात पिढ्या भाईर काढीन अशी धमकी तो देतो. अखेर चांदणी उगवेपर्यंत ही धिंड चालू राहते. रात्रीच्या जागरणानं आणि दमणुकीनं लोक घरोघर निवांत घोरत पडतात. तिसऱ्या प्रहरी राऊ खोत चावडीवर येतो. सगळे सनदी गोळी लागून गडद झोपलेले. राऊ तराळला सांगतो, दवंडी द्याला भाईर पड... येळ घालवू नको. वाजापाची जोडणी करा. पाटील, सरपंच, पंच सारा लवाजमा गोळा करा. नव्या धिंडीची तयारी चालू होते. गावात पिणाऱ्याचा काय तोटा? ग्राम पंचायतीने ठराव केला म्हणून काय झाले? ठरावाने पिणारे थांबतात थोडेच? पकडले जायची भीती... पण तीही किती दिवस वाटणार? ग्रामीण भागातील ही वास्तवता... नाट्यपूर्ण शैलीत धिंड द्वारे समोर येते. समाजातले वेगवेगळे घटक, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची विशिष्ट कामे वा व्यवसाय... या सर्वांचा कोलाज त्यातून उभा राहतो. शंकर पाटील यांची कुठलीही कथा घ्या. संभाषणातून ती फुलत जाते, खुलत जाते. उलगडत जाते. तिच्यातला विनोद नकळत होत असतो.