माझे शेल्फ
धुमारे
धूमारे या पुस्तकात गोयच्या भूमीवर लिहिलेले पंधरा लेख आहेत. गोवा म्हणजे फेसाळती बियर, उघडेबागडे फोरेनर्स एवढंच मर्यादित नाहीये याची आपल्याला नव्याने जाणीव हे पुस्तक करून देतं. आपण गोव्याच्या अंतरंगात माधवी ताईंचं बोट धरून शिरतो. त्यांच्या संवेदनशील नजरेने इथला निसर्ग, इथली माणसं आपण पाहतो. हे सरधोपट प्रवासवर्णन असं नाहीये. एखाद्या ठिकाणी आपण बराच काळ राहिलो तर त्या भूमीशी त्या वास्तूंशी आपले बंध तयार होतात, तिथे आपली मूळं आपसूक रुजतात, तिथल्या झाडापेडांशी आपलं हितगूज सुरू होतं. आपुलकीची जी माणसं भेटतात आपण त्यांना आणि ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात, त्या डोळ्यात स्नेह असतो, आपलं एक पान त्या डोळ्यात दडलेलं असतं, नुसतं डोळ्यात पाहून आपण स्वतःला वाचू शकतो. गाईडच्या भूमिकेत एखादी वास्तू, निसर्ग, तारीखवार इतिहास सांगणं वेगळं आणि आपल्या मनातील या साऱ्या सभोवतालाविषयीचे प्रामाणिक भाव व्यक्त करणं वेगळं. १९९० साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनी माधवी ताई त्यांच्या बांदोडा या गावी परतल्या. जागा तीच पण वयाच्या १६ व्या वर्षी पाहिलेलं गोवा आणि साठीत समजलेलं गोवा या दोन्ही गोष्टी त्यांनी कुतुहलाने तोलून पहिल्या, आणि मांडल्याही. गोवा म्हणजे विविध संस्कृतीची सरमिसळ. त्याचे समाजावर झालेले बरेवाईट परिणाम या पुस्तकात मांडले आहेत.परकीय राजवट असून आणि आता स्वतंत्र घटक राज्य असून जपलेल्या चालीरीती, समाजात परकीय राजवटीमुळे आलेला एक मोकळेपणा सारं त्यांच्या लेखणीतून झरझर उतरतं. त्यांचं लिखाण समुद्राच्या पाण्यासारखं नितळ, ओघवत्या शैलीचं, गजाली गप्पांच्या लाटाच जणू. म्हणून पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेववत नाही. देवचार, कोपेल, पायलट, तळी, पालखी, फुलराणी लेखांच्या नुसत्या नावावर नजर फिरवली तरी काहीतरी वेगळेपणा असणार लेखात हे कळतं. गमतीची बाब म्हणजे सलमान, संजय दत्त, चंकी पांडे, दिव्या भारती विषयी त्याकाळी भाबड्या लोकांना असलेलं आकर्षण, गजालीत सिनेमा, राजकारण, दाऊद इब्राहिम हे आलेले विषय, तिथल्या लोकांची त्यावर गमतीदार टिपण्णी हे सारं वाचायला मस्त वाटतं. डोना पॉला ची प्रतिक्षा त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. गोवन स्त्रियांमधला काळानुरूप झालेला बदल काही ठिकाणी त्या अधोरेखित करतात. पूर्वीचं गावपण कसं मागे पडत गेलं हे त्या सांगतात, तरी जे काही शिल्लक आहे ते निराशाजनक निश्चित नाही अन्यथा त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातील विश्वासाने विसवायचं ठिकाण म्हणून त्यांनी हे गाव निवडलं नसतं. इथल्या भाषेतली मौजेची गोलाई आणि माधुर्य माधवी ताई न टिपतात तर नवल. पुस्तक वाचून झालं तरी काय बरं ते गाणं होतं म्हणून पानं पुन्हा चाळली जातात आणि गुणगुणायचा प्रयत्न होतो. ... आलयली डोलयली पंटी पालयली सांग गे बाये, तुका कोणे चोरून वेल्यान गो बाये ... आंव तुजो सदाच मोग करतलो गे बाये आणि तुका हाव केन्नाच विसरचो ना गे बाये -
बोलणाऱ्यातला आपण विनोदी काही बोलतोय याची कल्पनाही बहुतांशी नसते. तमाशा या कथेत देसायांचे तीन गडी खळ्याजवळ रात्री राखणीला बसलेले असतात. जवळच जत्रेत तमाशा चालू असतो. त्या तमाशाला जाण्याची तिघांनाही अनावर इच्छा असते. आता तमाशाला जायचे तरी कसे? ते वेगवेगळे पर्याय विचारात घेतात. एका वेळी दोघांनी जायचे– एकाने राखण करायची. पण मग तू बघायला जाणार- आम्ही काय मांजर मारलंय व्हय? मी काय घोडं मारलंय व्हयं? म्हणजे एक आंबा आणि खाणार तिघं. त्यो कापायचा न्हाई, सोलायचा न्हाई, पिळायचा न्हाई, अन वर तूबी खा आणि आम्हालाही दे, असंच बोलणं आहे तुमचं. आंबा एक त्याला अडवणूक अशी! मग आपण सगळेच गेलो तर? ... आणि चोर आले तर? तीन गडी खळ्याभोवतीनं पडलेत असा सगळा सीन करायचा- लवकरच माघारी यायचं. विरुबाच्या नावानं चांगभलं करू अन् फेडा धोतरं... बांधा एकमेकाला. तेवढ्यात मालक येताना दिसतो आणि सगळ्यांना घाम फुटतो. अशा वेगवेगळ्या घटनांची मालिका उभी करतानाही शंकर पाटील शक्य तेवढे पर्याय पेश करतात. कथेची लांबण त्यामुळे कधीकधी वाढत जाते. परंतु कुठलाही पर्याय डावलला गेला असे वाटू नये यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे आज या कथा वाचताना ग्रामीण मानसिकतेबरोबर कथाकार म्हणून तपशीलातील बारकाव्यांवर भरपूर मेहनत घेणारे शंकर पाटील यांचे निवेदन कौशल्यही आपल्याला खिळवून ठेवते.