मुखपृष्ठ
एक दिवा विझताना

माझे शेल्फ

एक दिवा विझताना

इंग्रजी शीर्षक
Ek Diwa Vizatana
सारांश

एक दिवा विझताना या कथासंग्रहात एका पेक्षा एक सर्रास ठरणाऱ्या एकूण सात संकीर्ण कथा आहेत. या सर्व कथा वाचकाला निश्चितचं बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचत असताना एका अनोख्या गोष्टीचे गूढ उकलत जाते. विज्ञाननिष्ठ तत्वांची पायमल्ली न करता मानवाच्या चाकोरीबद्ध बुद्धीला आव्हान देणाऱ्या काही शक्तींचा लेखकांनी परिचय करून दिला आहे. भौतिक जगात प्रमाण मानलं जाणाऱ्या विज्ञानासोबतचं मानवी पंचेंद्रियांच्या जाणिवांवर आधारलेल्या काही अपरिचित शक्तींचा अनुभव लेखकांनी मांडलेला आहे. गृहीत न धरलेल्या मानवी मनाच्या सामर्थ्यास केंद्रबिंदू ठेवून परलोकाचा अभ्यास म्हणजे विज्ञानाच्या काही अंशी पलीकडे जाण्यासारखचं. अशा गोष्टींचा उहापोह करण्यासाठी लागणारं विज्ञान या क्षणाला ठाऊक नसलं तरी भविष्यात पाश्चात्य संशोधक याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील असं वाचताना आपलं मत तयार होत जातं. या कथासंग्रहातील पहिल्याचं कथेत अॅनिमियाचा प्रादुर्भाव झालेला एक तरुण मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या धाकट्या भावाला एका अगम्य शक्तीचा परिचय होतो. डॉक्टरांनीसुद्धा त्याच्याकडे वेळ कमी असल्याचं नमूद केलेलं असतं. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी कि मानवी मनाची शक्ती सांगणारं हे रहस्य त्या रुग्णाचे काही काळासाठी आयुष्य वाढवतं. वैद्यकीय चिकित्सकेतसुद्धा ही गोष्ट अचंबित करणारी आहे. मानवी मनाच्या सुप्त शक्तीवर लिहिलेली ही कथा वाचकाला सुन्न करून टाकते. कथासंग्रहातील "अशब्द" ही कथा भावनिक पातळीवर लिहिली गेली असून, दोन मानवी मनांचा होणारा सवांद आणि त्यासंबंधित घडलेल्या नैसर्गिक घटनांचा उल्लेख या कथेतून अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या मांडला आहे. टेलीपॅथीनुसार दोन माणसं प्रत्यक्षात न बोलता मनातल्या विचारांचे दुसऱ्या मनापर्यंत संप्रेषण करू शकतात. परंतू त्यासाठी माणूस जिवंत असायला हवा, कारण या कथेतील पात्र मृत व्यक्तीशी संभाषण कशी काय करू शकते हे समजण्याच्या खूप पलीकडे आहे. "चौथी खिडकी" ही कथा टाईम ट्रॅवेल वा भविष्य भ्रमण करणाऱ्या संशोधनाचा एक सुंदर अनुभव देणारी कथा म्हणून वाचकांच्या पसंत पडेल याची खात्री आहे. भविष्य भ्रमण याविषयी अनेक देशांत संशोधन चालू असल्याचं कित्येक वैज्ञानिक लेखांत आपल्याला वाचायला मिळतं, त्यामूळे वाचकाला ही कथा रुचण्यास अधिक मदत होईल. याशिवाय "रूममेट" ही कथा वाचताना कंटाळवाणी वाटत असली तरी तिचा शेवट तितकाच अकल्पित आणि भयावह आहे. कथेची नायिका अनावधनाने तिच्या मैत्रिणीचा खून करते आणि यामागे तिचं मानसिक आजारपण असतं. मानसिक विकारातून एखाद्याचा खून करण्याइतपत बुद्धी भ्रष्ट होऊ शकते याबद्दल अलीकडेचं संशोधन झालेलं आहे. लहानपणीचा "पोरखेळ" कधी आपल्या जीवनाचा अकल्पित भाग बनू शकतो, याची प्रचिती एका कथेतून वाचकांना मिळते. मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट फँटसी आहे, ही कथा वाचकाला जादुई वास्तववादाची आठवण करून देते. म्हणजे असं खरंचं झालं तर माणसाच्या स्वतंत्र बुद्धिप्रणालीला काही महत्वचं उरणार नाही एवढं नक्की. "नाईटमेअर" ही कथा आपल्या आयुष्यातील सहज घडणाऱ्या घटनेचा उत्तरार्ध कसा होऊ शकतो हे सांगत त्याचा माणसाच्या एकंदर आयुष्यावर कशा प्रकारे आघात होऊ शकतो याचं गांभीर्य लक्षात आणून देते. या सर्व कथांकडे बारकाईने पाहिल्यास असं लक्षात येतं कि लेखकांनी माणसाच्या मृत्यूच्या मार्गात घडत असलेल्या काही गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवा विझत असताना नेमकं काय होत असेल एवढंच सांगून मतकरी थांबत नाहीत तर जीवित व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांना प्रत्यक्षात एकरूप करून सोडतात. मृत्यूसंदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या किंवा सध्याच्या काळात संशोधनात्मक पातळीवर असलेल्या वैज्ञानिक गोष्टींच्या आधारे या कथा लिहिलेल्या आहेत. मुळात सध्या आपण ज्यास अकल्पित असं संबोधत आहे, त्या गोष्टी भविष्यात प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याचा आधार वैज्ञानिक सिद्धांत असून त्या केवळ मानवी आकलनक्षमतेच्या बाहेर आहेत एवढंचं. अशा प्रकारे, रत्नाकर मतकरींचा "एक दिवा विझताना" हा कथासंग्रह म्हणजे लेखकांचा कोणत्याही गोष्टीचा "शेवट" प्रचंड विलक्षण, थोडंसं विचित्र आणि अद्वितीय करण्याचा हातखंडा वाचकांच्या लक्षात येतो. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी रत्नाकर मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच, पण तो आत आत खोलातही नेतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद