माझे शेल्फ
गुलमोहर
लोकविलक्षण माणसांच्या चाकोरीवेगळ्या कथा... व. पु. काळ्यांच्या कथा नेहमी वेगळे, चाकोरीबाहेरचे असे काहीतरी सांगतात. त्यांच्या कथांतून आपणांस भेटणारी माणसेही विलक्षण वरवर पाहायला सामान्य, पण सर्वांहून वेगळी आहेत. प्रत्येक माणसाचे काही लोकविलक्षण असे वे आहे. जगावेगळी निष्ठ आहे. प्रत्येक माणसाची जगाला न पटणारी, सामान्य माणसांपेक्षा वेगळी विचारसरणी आहे. त्यांच्या कथेतील अनुभवही वेगळ्या धाटणीचे काही वेळा अतर्क्य आहेत. त्यांची बांधणी पुष्कळ वेळा योगायोगातून होते. अशी लोकविलक्षण माणसे, केवळ योगायोगच म्हणावा लागेल असे प्रसंग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही भेटत असतात. तथापि आपण अशा काही गोष्टी दुसऱ्यांना सांगून त्यांना त्या पटवणे आपल्याला जमत नाही. व. पु. काळे हे अवघड काम सिद्धहस्तपणे करतात. अर्थात अशी सर्वस्वी वेगळी माणसे, अशा योगायोगाच्या गोष्टी एकत्र भेटल्या तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. व. पु. काळ्यांच्या ‘गुलमोहर’ या नव्या कथासंग्रहातील कथा तर सांगायचं झालं तर ‘एकटा’, ‘दहावा ग्रह’, ‘शिळा अहिल्या’, ‘पुरुष’ इ. गोष्टी पाहाव्यात. ‘एकटा’चा कथानायक विश्वनाथ खायलाप्यायलादेखील पैसा राहत नाही. तेव्हा चोरी करतो एका लहान मुलीच्या हातांतील बांगड्यांची. चोरी करताना त्याचा मुलीच्या तोंडावर हात दाबला जाऊन श्वास कोंडला जातो व ती मुलगी मरते. पोलिसांच्या नजरेला विश्वनाथ खुनी म्हणून सापडत नाही. पण त्याला स्वत:ला तो अपराध पोखरत असतो. (स्वत:च्या हातून खून झालाय हे त्याला योगायोगानंच– पेपर वाचताना एका छोट्याशा बातमीवर नजर गेल्यानं समजतं. – त्याच्या मनावरचं दडपण योगायोगनंच त्याची आई त्या छोट्या मुलीच्या मृत्यूबद्दल बोलते त्यामुळे वाढतं.) आई आत्महत्येची धमकी देते म्हणून विश्वनाथ लग्न करतो. गुणी बायकोच्या स्वभावामुळे त्याच्या मनावरचं दडपण नाहीसं होण्याचा प्रसंग जेव्हा येतो त्यावेळी विश्वनाथला कळतं की आपले हात जिच्या मृत्यूला कारण झाले. तिची मोठी बहीण म्हणजेच आपली पत्नी. ‘दहावा ग्रह’ मध्ये निवेदक आपल्या बहिणीचे लग्न जमवण्यासाठी एका स्थळाची चौकशी करण्यासाठी जातो. तेव्हा त्याची गाठ सांगून आलेल्या मुलीच्या फोटाचा आलबम करणाऱ्या चमत्कारिक माणसाशी पडते. वीस वर्षानंतर आपल्या मुलीसाठी स्थळ पहायला निवेदक जातो, तेव्हा त्याची गाठ त्या चमत्कारिक माणसाच्या मुलाशी पडते. ‘शिळा अहिल्या’ या कथेतील केशवनाना रात्रीच्या वेळी चौपाटीवर फिरायला जातात. तेथे त्याची बहिण योगायोगाने दिसते. ती चाललेली असते आपल्या प्रियकराकडे, केशवनाना तिचा पाठलाग करतात. प्रियकराच्या खोलीपाशी थांबून त्यांचे बोलणे ऐकतात. योगायोगानेच त्यांची बहिण त्यावेळी प्रियकराला सांगते की रिकामपणाचा उद्योग म्हणून तिने डायरी लिहून ठेवली आहे. तिच्यात आपल्या वेदना लिहून ठेवल्या आहेत. केशवनाना ती डायरी वाचतात व त्यांतून मग कथा उलगडते. असे हे योगायोग. लोकविलक्षण व्यक्ती ‘गुलमोहर’, ‘गांधारी’, ‘भरती’, ‘नजर’, ‘मुक्तछंदा’ या कथांमध्ये आपल्याला लोकविलक्षण स्वभावाची माणसे भेटतात. ‘गुलमोहर’ मधले वडिलांचे बंगला बांधण्याचे स्वप्न पुरे करण्याचा ध्यास घेतलेले दिवाकरपंत केवळ त्यासाठी आपले सर्व आयुष्य वेचतात– पण शेवटी त्यांच्या मुलांच्या संसाराची काच तडकते आहे अशी चाहूल लागल्यावर धास्तीने आपणहूनच त्या स्वप्नाचा निरोप घेतात. स्वप्नांचे प्रतीक गुलमोहराचे झाड तोडून टाकतात. ‘गांधारी’ आंधळा नायक आंधळ्याच पण रुपवान मुलीशी लग्न करतो. तिची फसवणूक करणाऱ्या डोळस माणसांपासून पाठवण्यासाठी. ‘भरती’ मधील उपेंद्र व इरावती या दाम्पत्याला मुलं नाही. त्यासाठी इरावती उपेंद्राला सुखी राखण्यासाठी, त्याला आपल्याजवळ राखण्यासाठी रोज एक विलक्षण नाटक खेळते. त्यांतून आपले जीवापाड प्रेम उपेंद्रवर असल्याचे दाखवून, त्याला आपल्याकडे सतत खेचते ठेवून त्याचे लक्ष विचलीत होऊन देवकुळे,‘मुक्तछंदा’मधली मुक्ता ही अशीच आणखी लोकविलक्षण माणसे. अनोखे प्रसंग आणि लोकविलक्षण माणसे एवढेच काळ्यांच्या कथांचे वैशिष्ट्य नव्हे. त्यांची प्रत्येक कथा वाचकांना काही सांगू इच्छिते. काहीतरी नवे आणि वेगळे. जगण्याची भूमिका. एखादा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत प्रत्येक कथा हे सांगते– जे अर्थातच कथाकारालाच सांगायचं असतं– निरनिराळ्या पात्रांकरवी सांगते. बहुधा पुष्कळशा कथांमध्ये हे सांगणे चपखलपणे बसते. पण काहीवेळा हे सांगणे कथेतील बरीचशी जागा अडवते व कथेने कथापण हरवते. उदाहरणार्थ ‘गांधारी’ ही कथा. ही कथा तर रूढार्थाने कथा होऊच शकत नाही हे एक प्रासंगिक प्रवचन आहे. बहुतेक कथांमध्ये काळे असे कथेतील पात्रांद्वारे स्वत: बोलतात. हा खटकणारा दोष सोडला तर काळ्यांच्या कथा खूपच देखण्या आहेत. ‘शिळा अहिल्या’ मधील ‘अक्का’ कथा पुढे पुढे जाते तशी आपल्या मनावर कब्जा मिळवते व कथासंग्रह वाचून झाला तरी नंतरही दीर्घकाळ मनांत रेंगाळत राहते.