माझे शेल्फ
घणघणतो घंटानाद
युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी... दि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉरहूम द बेल टोल्स’ कादंबरीचं भाषांतर ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे. मूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅसिस्टांविरुद्ध लढणाऱ्या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अॅन्सेल्मोशी भेट होते. अॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वतः जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो. या कॅम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वतःवरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅम्पमधील गॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसऱ्या एका फॅसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं. वास्तविक, युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघर्षाचं संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं– ‘फॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार! तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅसिस्ट नाहीत. मी त्यांना फॅसिस्ट म्हणतो,पण ते फॅसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.’ या पार्श्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाव्याqक्तरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या किंवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अॅन्सेल्मोच्या मनात येतं ‘पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फुटावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झट्कन खिडकीतून फेकले गेले. या दुसऱ्या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकूळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.’ एकूण, या कादंबरीतील व्यक्तिरेखा किंवा आशय व्यामिश्र नाही; पण माणसांतील क्रौर्य आणि त्याला हवी असलेली शांती, या दोन टोकांमधील जीवनाचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे, असा संदेश ही कादंबरी देते, असं म्हणायला हरकत नसावी. तेव्हा त्या संदेशासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी.