माझे शेल्फ
घरभिंती
झोंबी, नांगरणी नंतरचे आनंद यादव यांचे आत्मचरित्र म्हणजे घरभिंती .... खरतर.... मध्यम वर्गीय माणसाच्या सुखाच्या संकल्पना काय असतात? चांगलं शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळावी... भौतिक सुख सुविधांनी युक्त टुमदार घर बांधावं... सुंदर मुलीशी विवाह करून घ बाळगोपाळांनी भरून जावं... बहुतांशी हीच मध्यमवर्गीय माणसांची सुखाची संकल्पना असते.. याच सुख स्वप्नांच्या परिपूर्ती साठी माणूस रात्रंदिवस शारीरिक किंवा बौद्धिक काम करीत असतो. या योगाने माणूस आपले जीवन समृद्ध बनवून समाजात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करत असतो.. अशी स्वप्न उराशी बाळगून सुखदुःखाचे चटके खात परिस्थितीशी दोन हात करीत कागल सारख्या खेड्यात लहानाचे मोठे झालेल्या या गाव खेड्याच्या शेती मातीची नाळ मराठी साहित्याशी जोडून शेती मातीत राबणाऱ्यांच्या वेदना.. संवेदना.. ग्रामीण मराठी साहित्य या नवप्रवाह द्वारे मांडून दुर्लक्षित गाव खेड्यातील माणसांच्या जगण्याला बळ देणारे एकमेवादित्य ग्रामीण साहित्यिक म्हणजे.आनंद यादव.... यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग म्हणजे घरभिंती लौकिकार्थाने एम. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजमधून प्राध्यापकाच्या नोकरीची सुरुवात कशी झाली यानंतर कागल मधील घराच्या गळणाऱ्या छताला.. भग्न घरभिंतीला.. कसं नवरूप दिलं या घरातील आई-दादा चार बहिणी तीन भाऊ यांना मळा पिकवण्यासाठी कशी मदत केली आणि याच दरम्यान पंढरपूरची नोकरी सोडून सारस्वतांच् माहेरघर तथा साहित्य पंढरी म्हणून सर्व परिचित असणाऱ्या पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारून आपली वाड़मयीन आवड कशी जोपासली व वाढवली याचं समर्पक सुंदर वर्णन या आत्मचरित्रा मध्ये त्यांनी केले आहे नोकरी लागल्यानंतर फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या स्मिताशी त्यांनी विवाह केला, कागलातील कुटुंबाची जबाबदारी सांभाळत स्मिताला पुढील शिक्षण देऊन पुण्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे समर्पक वर्णन यामध्ये आहे. त्यांची वांडंमयीन आवड पुण्यातील व गावाकडील घरप्रपंचाची जबाबदारी त्यातून ते करीत असलेले प्राध्यापकाची नोकरी पुण्यामध्ये लहानाच्या मोठ्या होत असलेल्या मुली स्वाती व कीर्ती यांच्या पालकत्वाची जबाबदारी.. स्मिताला नोकरी लागल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कुटुंबाची होत असलेली परवड.. राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घ्यावी त्याप्रमाणे साहित्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं साहित्यिक वलय निर्माण करून गोतावळा, पाचोळा ,नटरंग, खळाळ या व अन्य साहित्य कृती कशा निर्माण केल्या याच भावस्पर्शी वाचकांना भावनाप्रधान बनवून वाचण्यास भाग पाडणारे हे आत्मचरित्र आहे खरं तर माणसाचं जीवन सुखाने भरलेला पेला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे.. हे वास्तव सिद्ध करणारे हे आत्मचरित्र आहे धनधान्यान मोटचाड्यांन आणि गाडीबैलांन नांगर कुळवन भरलेलं घर.. दादाच्या ,आईच्या, लहान भावंडांच्या राबणाऱ्या हातांनी फुललेला त्यांचा मळा..तोंडचा घास काढून घ्यावा तसा शासनाने केलेले नवीन कुळ कायद्यामुळे हातचा निघून जातो हे दादांना सहन होत नाही तो सर्व काम धंदा सोडून निराश होऊन बसून राहतो... सर्वांवर मोलमजुरी ची वेळ येते, याही स्थितीमध्ये उंचआकाशात घिरट्या घालणाऱ्या घारीचे लक्ष घरट्यातील तिच्या पिल्लांकडे असते त्याच प्रमाणे घराची वाताहात झाली असता पुण्यात नोकरी करीत असताना लेखकांनी दुसरा मळा कसा खरेदी केला व घराला उभारी देण्यासाठी त्यांची झालेली परवड सुंदर रीतीने यामध्ये मांडली आहे. खेडवळ वळणाची आई व उच्च शिक्षित लेखकांमध्ये उडणारे शाब्दिक खटके यांचे वर्णन समर्पक ग्रामीण बोलीचा वापर करून केलेले असल्याने यामध्ये एक प्रकारची वातावरण निर्मिती लेखकांनी सुंदर साधली आहे वादळात ज्याप्रमाणे दिवा तेवत राहावा त्याप्रमाणे लेखकांनी या प्रतिकूल जीवन संघर्षांमध्ये सुद्धा आपली साहित्यिक आवड जोपासून बेजोड साहित्यकृती निर्माण केल्या त्याचं बरोबर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी कशी संपादन केली याच समर्पक वर्णन या आत्मचरित्रात असल्याने हे आत्मचरित्र म्हणजे घराला घरपण प्राप्त करून देणाऱ्या एका गाव खेड्यातील बुद्धिजीवी तरुणाची यशोगाथा म्हणल्यास वावगे ठरणार नाही...