माझे शेल्फ
जागल्या
विविधांगी अनुभवांचा ‘जागल्या’… दया पवार यांच्या या कथासंग्रहात एकूण एकतीस कथा आहेत. भारतीय समाजरचनेत विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे येणाऱ्या विविध प्रकारच्या अनुभवांचा साठा या कथासंग्रहात वाचावयास मिळो. एकेक अनुभवातून एकेक कथा साकार झाली आहे. या अनुभवांतील दु:खाची झळ वाचकांपर्यंत पोहोचते. अनुभवाच्या मांडणीत कुठेही ऊरबडवा आक्रोश केलेला दिसत नाही. -- ओघात समाजातील वृत्ती-प्रवृत्तीवर भाष्य केले आहे. ‘परेम हा तसा साथीच्या रोगासारखा पसरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरु झालं. आईबापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं ‘बस-काही पन करा कुलकरनीच्या बाला भेटा. लेकाचा जीव तीळ-तीळ तुटताना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी. पन झालं भलतंच. लयी आगत-स्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हणाला, ‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी देली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पण एक मातुर खरं की लगीन लावता येणार न्हायी. ते धरमशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, ‘माझ्या मुलीला पळवून न्यायला.पळवून नेणं धरमात बसतं.’’ परदेसातील ‘मिसीसिपी मसाला’ हा चित्रपट दया पवार यांच्या एका कथेचा विषय झालेला दिसतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर जाता जाता भाष्य केलेले आहे. ‘जगात कुठेही गेलं तरी माणूस हा एकच. एका मासाचा हाये. त्यात दुजाभाव न्हायी.’ हा संदेश देणारा ‘मिसीसिपी मसाला’ आपल्याही देशात घराघरात जायला हवा अशी सदिच्छाही ते व्यक्त करतात. व्यक्तिचित्रणावर कथेत ‘तुकाराम’ या कथेचा विचार करता येतो. महार जातीतील या तुकारामाला आपल्याला दिली जाणारी वेगळी वागणूक सहन होत नाही. तो या गोष्टीचा प्रतिकार करतो, त्याला जे योग्य वाटेल तेच तो करतो. पुढे काही काळानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याला काम करण्याची काहीच आवश्यकता नसतानाही फुटपाथवर जुन्या पुस्तकांची तो विक्री करतो. गोकुळासारखे नांदते घर सोडून जुन्या पुस्तकांच्या जगात फुटपाथवर राहतो. पाऊस आला तर पुस्तके भिजू नयेत म्हणून जपतो. अशा या तुकारामाकडे पाहताना लेखकाला ‘संत तुकारामां’ची आठवण होते. संत तुकारामाला विठोबाचा ध्यास तर या आधुनिक तुकारामाला जुन्या पुस्तकांचा ध्यास. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेला असं म्हणतात, पण पुस्तकांसाठी रानोमाळ भटकणारा हा आधुनिक तुकाराम. उद्या फुटपाथवर मरुन पडला तर देवाच्या सोडाच, पण येणाऱ्या जाणाऱ्याला तरी ध्यानात येईल काय? असा हृदयाला भिडणारा प्रश्न विचारुन ‘अशा मान्सापुढं नाही चिरा-नाही पनती. हेच मान्य केले आहे.’ मराठी सारस्वतांनी बेदखल केलेले अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचं प्रेम, आदर, सहानुभाव व त्यांना समाजाने दिलेलं दु:खं ‘जग बदल घालून घाव’ या कथेत व्यक्त झालेले आहे. ‘जुनून’ सारख्या कथेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलेले आहे. या कथेचे स्वरुप नाट्यात्मक संवादांसारखे आहे. समाजातील निरनिराळ्या थरातील माणसे ‘जात’ या संस्थेला खतपाणी घालताना दिसतात. याचा अनुभव ‘फराळ’सारख्या कथेत येतो. ‘जात’ ‘धर्म’ या संकल्पनांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न या कथेतून दिसतो. भ्रष्टाचार, राजकारण, कटकारस्थान या संदर्भातील काव्य ‘बोफर्स’ या कथेत वाचावयास मिळते. आपल्या देशात जशी ही जातीपातीची उतरंड दिसते तोच अनुभव परदेशातही आलेला आहे. या अनुभवांचा उच्चार ‘इटा’, ‘गरिबी हटाव’ या कथांतून केलेला आहे. ‘जागल्या’ हा कथासंग्रह आजच्या जीवन-जाणिवांकडे पुन्हा एकदा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करतो. आजच्या जीवनाशी या कथासंग्रहाचे असलेले हे साम्य लक्षात घेता वाचकांनी या कथासंग्रहाची जरूर दखल घ्यावी.