मुखपृष्ठ
झाडवाटा

माझे शेल्फ

झाडवाटा

इंग्रजी शीर्षक
Zadvata
सारांश

झाडवाटांवरचा नवा प्रवास… गाव आणि शहर यांच्यातील फरक हा केवळ सोयीसुविधांचा नसतो, तर तो विभिन्न जीवनदृष्टींचा फरक असू शकतो– असा प्रत्यय देणाऱ्या कथा झाडवाटांमध्ये भेटतात. मराठी कथेला आणि पर्यायाने कथालेखकांना वर्णनांचा सोस असल्याचे दिसते. आनंद यादवां्या कथेतील वर्णने कथाबीज घेऊन येतात, नेमकी असतात. ‘एका दगडी घराचा इतिहास’ या कथेमध्ये वस्तुत: तो त्या घरातील गुंडांचा इतिहास आहे. भमा मांग व त्याचे भाऊ यांचा गावात चालणारा अमानुष कारभार, गुंडगिरी, खून, दहशत याचा प्रत्यय या ‘इतिहासा’तून येतो– ‘... ह्या घराला पोरांनी मारलेली ढेकणं, पुसलेला शेंबूड, कोळशाच्या रेघोट्या आपल्या भिंतीच्या अंगावर वागवायला अभिमान वाटायचा–’ यासारखे अभिप्राय किंवा दोन पैकी उजव्या बाजूची खिडकी बुजवल्यामुळे ‘खुनात डोळा फुटलेल्या जानू पैलवानागत ते घर वाटतं’– अशा वर्णनांमधून घराचा इतिहास, घराचे नायक (?), घराचे कथानक एकाच वेळी आकळतं. आणि अशा घराचे भवितव्य काय? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सुचवून कथा संपते.‘बाकड्यावरचं जग’ ही रूढ अर्थाने कथा म्हणता येणार नाही. अनिल अवचटांची आठवण करून देणारी शैली यात आनंद यादव वापरतात. रिपोर्टाजसारखा प्रवासाचा आढावा यात घेतला आहे. त्यातील प्रवासाचे रूपक ‘बहुप्रसवी’ आहे व ते अंधारयुग, अश्मयुग, आधुनिक युग या साऱ्याचा समावेश करणारे आहे. आपण खरंच प्रगत झालो का? ‘आपली खेडी’ आणि ‘प्रसार माध्यमे त्यांचे जे चित्र उभे करतात’ यातील दरी किती सखोल आहे याचा अंदाज या कथेमधून येतो. ‘झाडवाटा’ ह्या १३९ पानी कथासंग्रहात आनंद यादव यांच्या एकूण १४ कथा आहेत. अपघातामध्ये हात गमावल्यानंतर जगावं लागणारं विमनस्क जगणं, हातांच्या अभावी जगण्यातील अपुरेपणा, ठसठस यांचा अत्यंत संयत अनुभव घेऊन ‘हात’ ही कथा आपल्यासमोर येते. खाजवणे, लाळ पुसणे, घोंघावणाऱ्या माशा उडवून लावणे इ. अनेक गोष्टींना पारखा झालेला, मनाने घायाळ झालेला अपंग व त्याची बायको मंजी यांचे चित्रण दूर कथेमध्ये केले आहे. अपघतावर मात करून जगण्याची ताकद व इर्षा यांचा या कथेमध्ये मिळणारा प्रत्यय परिणामकारक आहे. हत्तींच्या कळपामधील घडामोडींवर लिहिलेली ‘नर’ही कथा हत्तींच्या बारीकसारीक तपशिलांमुळे विचक्षण झाली आहे. हत्तींच्या हालचाली, त्यांचे कान हलवण्याची रीत, सोंडेने फुत्कार सोडणे, तसेच कानोसा घेणे, बेचैनीत पाय हलविणे यासारखी वर्णने नैसर्गिक व म्हणून प्रवाही झाली आहेत. स्थूल मादीची आकांक्षा धरणारा एक नर हत्ती, त्याची तिच्यावरील माया, त्यांचे खेळ व चाळे– कळपाच्या प्रमुखाशी तिच्यामुळे घेतलेले वितुष्ट, त्या ‘महाराजांशी’ दिलेली टक्कर तिथपासून त्याने कळप सोडणे, दुसऱ्या मादीशी त्याला पकडून नेण्यापर्यंतच्या घडामोडी या कथेत आहेत. पालवी आणि पानगळ ही कथा दत्तोबा व त्याच्या भावंडांची सावकारी कर्ज, सव्याज परतफेड, बापाचं छत्र उठलेलं, सोबत तीन धाकटी भावंडे या दत्तोबा एका कमजोर क्षणी घर सोडून जातो. नंतर तो २०-२५ वर्षांनी परत येतो. तोवर त्याच्या तिघा भावांची ३ घरे झालेली असतात. कूळकायद्याचा फायदा होतो. सावकारीचा नष्टावा झाल्यामुळे, भाऊ गेला तरी तशीच झगडत राहिलेली किसाखा, रामजी, मारुती ही दत्तोबाची भावंडे हळूहळू भरभराटीस येतात. मोठी होतात. गब्बर होतात. लग्न, संसार व प्रेम याला मुकलेला एक अभागी भाऊ ‘पालवी आणि पानगळ’ मध्ये रंगविला आहे. एकीकडे परंपरेशी नातं सांगणाऱ्या आनंद यादव यांच्या कथा ‘ग्रामीण’ आहेत, पण त्या कथांमध्ये घटनांपेक्षा, चित्तथरारक कलाटणीपेक्षा, दृष्टिकोनांचा विस्तार दिसतो. कथेतील कथाबीज हे ग्रामीणतेमुळे बहरास येते. आनंद यादवांच्या कथेतील ग्रामीणता ही ‘ग्राम्य’ भाषेमुळे आलेली नाही. वर्णनांमुळेही आलेली नाही. अनुभवाच्या अस्सल मुशीतून यादवांनी ग्रामीणता येते. आकारते. म्हणूनच संकेतसाध्य वाटा सोडून या झाडवाटांनी केलेला प्रवास जास्त बहारीचा, ताजा व स्वयंशोधात्म झाला आहे. काही कथा ह्या ‘रिपोर्टाज् ’ ह्या रूपबंदाशी जास्त जवळीकीचे नाते सांगत असल्यामुळे त्यांना ‘कथा’ म्हणताना, कथेची व्याख्या फारच रुंदवावी लागते. प्रसन्न नसला तरीही एक अस्सल अनुभव आपल्याला झाडवाटांमधून मिळतो. हा अनुभव आपल्याला मराठी ग्रामीणतेच्या अंतरंगाचे दर्शन घडवितो. मराठी समाज, मराठी कृती व मराठी परिसराचा आरसा बनून हा अनुभव येतो आणि सहजरीत्या आपल्याला भिडतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
90.00
ISBN
9788177660463
समुदायाने जोडले
बंद