माझे शेल्फ
किनारा
सकारात्मक दृष्टी देणारा कथासंग्रह... ‘किनारा’ हा माधवी देसाई यांचा पाचवा कथासंग्रह! मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला! एकूण अकरा कथा संग्रह असलेला हा संग्रह! यातील सर्व कथा १९९८ साली महाराष्ट्र व गोवा येथून प्रसिद्ध झालेल्या दिवाळी अंकांतून पूरवप्रसिद्धी मिळालेल्या. या अकराही कथांचा विस्तार तसा फार मोठा नाही, पण पात्रे वेगळा विस्तर घेऊन वावरणारी. जीवनभर मौजमजा करून जीवनातला एक साथीदार गेल्यानंतर मागे राहिल्याने केलेला शोक आणि पश्चात्ताप व अखेरीस स्वीकारलेला सकारात्मक दृष्टिकोन हे कथासूत्र असलेल्या काही कथा यात आहेत. पहिल्याच ‘झिंग’ कथेतला पोलीस खात्यातला डी.एस.पी. रवींद्र एस. पी. झाला होता. घरी सोन्यासारखी बायको लक्ष्मी, मुलं हे वैभव असूनही रवींद्र मात्र बाहेरच्या स्त्रियांत गुंतत होता. एस.पी म्हणून बढती मिळाल्यावरदेखील घरी न येता रात्रभर माळरानावर झोपून राहतो. उघड्या डोळ्यांनी आभाळातल्या चांदण्या निरखताना पत्नीची आठवण येते. कधीही तक्रार न करणारी लक्ष्मी, तिच्याशी खूप बोलायचं, मनातले बेत सांगायचे म्हणून उत्साहाने घरी येतो तर लक्ष्मीने बेगॉनचा पूर्ण डबा पिऊन आयुष्य संपवलेलं असतं. आपल्या प्रमोशनचं कळलेली पत्नी जीवन संपवते. मुलं रवींद्रला दोष देतात. अखेर तेरा दिवस झाल्यावर नोकरीचा राजीनामा व मुलांच्या नावाने बक्षीसपत्र करून भल्या पहाटे घरातून निघून जातो, परत कधीही न येण्यासाठी! ‘अर्जुनाचे धनुष्य’ कथेतील अजय एक पत्रकार, विचारवंत पी.ए. असलेल्या ऐश्वर्याशी संबंध ठेवणारा, पत्नीच्या वेदना, तिचा एकटेपणा न जाणवलेला अजय अर्धांगाने दीन होतो, पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवलेली मुलं! पण त्याचं प्रेमाने करणारी कामवाली परिबाई, तिच्याकडून पत्नीचं एकटेपण, तिनं भोगलेल्या वेदना त्याला कळतात, तेव्हा सारी संपत्ती, त्या कामवाल्या बाईच्या नावाने करून पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. ‘सोनपुतळी’ कथेतील ‘मित्रा’ ही नायिका अचानक श्रीमंत पती मिळाल्याने बाहेरख्याली बनते. पतीच्या मृत्यूनंतर श्वशूरसेवा करण्यात धन्यता मानते. या काही कथांतील कथासूत्र एकाच प्रवाहातून जातं. ‘सोळावं वर्ष’मधील नीता मोठ्या वयात कपड्याच्या दुकानातल्या ‘त्या’वर प्रेम करते. त्याचं गावाकडच्या पत्नीवर प्रेम असतं. म्हणून गावी जातो. पण हे वास्तव कळण्यापूर्वी नीताने अनुभवलेले ते मोरपंखी दिवस तिला पहिल्या प्रेमाचा अनुभव देऊन गेले. अखेरच्या ‘यौवना’ कथेतील नायिका यौवना हीही अशीच पतीनिधनानंतर उदास झालेली. एकेकाळची संगीत नाटकांची नायिका. तिच्या नाटक कंपनीचा मुलांनी मांडलेला बाजार (दारू, पार्ट्या, नाचणं इ.) पाहून त्यांना मुलांना कंपनीतून काढून परत एकदा जुनी नाटकं गाजवण्याचा चंग कथेच्या अखेरीस बांधते. ‘सॅम’ हीही अशीच सकारात्मक दृष्टी जपणारी वेगळ्या वातावरणातील कथा! या बहुतांश कथांतील व्यक्तिरेखा या लेखिकेला वास्तव जीवनात भेटलेल्या! विविध पार्श्वभूमी आणि वातावरणात घडणाऱ्या या कथा वाचकांना नक्कीच भुरळ घालतात. साधी, सोपी, प्रवाही भाषा, मर्यादित कथाविस्तार असणाऱ्या या कथा बायकांना सकारात्मक दृष्टिकोन देणाऱ्या तर आहेतच पण जीवनात होणारा सत्य, सुंदर आणि शिव यांचा समर्पक विजय हेच जीवनाचं अंतिम तत्त्व सांगणाऱ्या या कथा वेगळी आत्मिक उंची वाचकांपर्यंत पोहोचवतात. पैसा, वैभव, कीर्ती, मोह, प्रसिद्धी, मानसन्मान हे सारं मिळालं तरी माणसाला अंतर्यामी असणारा सदसदविवेक माणसाचा सदविचार हेच माणसाला कसे अखेरपर्यंत सोबत करतात हेच जीवनाचं सार आहे. त्यामुळे ‘अर्जुनाचे धनुष्य’ कथेचा नायक अजय अनेक चुका करणारा! पण पत्नीच्या साऱ्या इच्छांनुसार कामवाल्या बाईसाठी खूप काही करणारा! म्हणूनच अखेरीस तोही नायक वाचकांच्या मनात कुठेतरी ओलावा निर्माण करतो. जीवनात अनेक प्रतिष्ठेच्या पायऱ्या चढूनही माणूस कसा एकाकी असतो हे सूचित करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ म्हणूनच लक्षणीय आहे.