माझे शेल्फ
क्रांतिसूर्य
मुलखावेगळं कर्तृत्व!... भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून नाना प्रकारची, चित्रविचित्र स्वभावाची आणि धडाडीनं काम करणारी अनेक व्यक्तिमत्त्व पुढे आली. महाराष्ट्र हे तर कार्यकर्त्यांचे मोहोळच; मग साहजिकच अशी अनेक माणसं या आंदोलनानं उभी केली. साताऱ्याचे नाना पाटील हे असंच एक व्यक्तिमत्त्व. नाना पाटील हे नाव घेतलं की साताऱ्याचं ‘पत्रीसरकार’ डोळ्यापुढे उभं राहतं फार्डा वक्ता,डाव्या चळवळीचा सेनानी, पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारा झुंजार नेता, मार्क्सवादी आणि तरीही माळकरी... अशी नाना पाटलांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्यांचे एखाद्या कादंबरीपेक्षाही अद्भूत असे जीवन. त्यामुळे साहजिकच कुणालाही त्यांचं चरित्र लिहिण्यापेक्षा त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचाच मोह व्हावा. तसाच तो प्रख्यात लेखक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना झाला आणि त्यातून ‘क्रांतीसूर्य’ ही कादंबरी उभी राहिली. लेखक पाटीलबुवांची ‘क्रांतीसिंह’ नाना पाटलांवर असीम श्रद्धा आहे, हे पानापानातून जाणवत. त्यामुळेच ही कादंबरी वाचनीय झाली आहे.