माझे शेल्फ
कर्मचारी
व. पु. काळे यांचा ‘कर्मचारी’ हा संग्रह उल्लेखनीय आहे. मध्यमवर्गीय समाजातील जे स्त्रीपुरुष मुंबईत नोकऱ्या करतात त्यांच्या सुखदु:खांचा पट येथे चित्रित केला आहे. आज महागाई फार भडकलेली आहे. जागेचा प्रश्न अत्यंत कठीण आहे. प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी नवराबयको या दोघांनाही नोकरी करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हे रोजचे प्रदीर्घ प्रवास, जेवणाचे हाल, ऑफिसमध्ये गेल्यावर लहान मुले कोठे ठेवावीत इ. अनेक प्रश्नांमुळे कर्मचारी गांजून गेला आहे. मनातली स्थाने, कठोर वास्तव परिस्थिती, तडजोडी, कुटुंबातल्या व्यक्तींचे गैरसमज, वाढत्या जबाबदाऱ्या आणि शारीरिक शिणवटा या असह्य ओझ्याखालचे तरीही आनंदी वृत्तीने जगू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन वपुंनी मोठ्या मार्मिक, भेदक, प्रवाही शैलीत रेखाटले आहे. या कथांमध्ये कोठेही तोचतोचपणा येत नाही. पुनरुक्ती होत नाही. त्याचप्रमाणे या कथांत खोटा गहिवर किंवा अतिशयोक्त पेचप्रसंगही नाहीत. काही ठिकाणी थोडे चटपटीत, चलाख लेखनही आहे; पण एकंदरीत लेखकाने निकटवर्ती जीवनांनुभवाची स्पंदने सशब्द करून मध्यमवर्गीयांचे जीवन किती अशांत आणि अस्वस्थ आहे हे यशस्वी रीत्या दाखवून दिले आहे.