माझे शेल्फ
करुणाष्टक
पुस्तक परिचय मधील आजचं पुस्तक एका सुप्रसिध्द कलावंताचं. मराठी साहित्यक्षेत्रात ज्यांनी आपला अमीट असा वेगळा ठसा उमटवलाय त्या व्यंकटेश माडगूळकर यांचं. मला अतिशय भावणारा हा लेखक. ग्रामीण जीवन, कलाक्षेत्र, परदेश, वन्यजीवन आदिंबाबत समर्थपणे अन् सजसोप्या भाषेत लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य.त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकांसोबतच एक हळवं, स्वानुभवाचं पुस्तक आहे करुणाष्टक. बहुतांश रसिकांनी माडगूळकरांची विविध पुस्तके वाचलेली असतात करुणाष्टक मात्र कित्येकांनी वाचलेलं नसतं. का ते माहीत नाही. ज्यांनी वाचलंय त्यांच्या काळजात नक्की या पुस्तकानं घर केलं असेलच. “करुणाष्टक - व्याकूळ करणारा अस्वस्थ अनुभव...!” - सुधांशु नाईक करुणाष्टक म्हटलं की मराठी माणसाला समर्थ रामदासस्वामी यांची करुणाष्टके आठवतात. “ तुजवीण रामा मज कंठवेना...” अशा शब्दांतून ओसंडणारी त्यातली आर्तता मनाला भिडलेली असते. तीच भावना हे पुस्तक वाचतानाही मन भरून राहते. करुणाष्टक हे अवघ्या १५७ पानांचं लहानसं पुस्तक. अगदी पहिल्या २-३ पानांपासूनच थेट काळजाला भिडतं. “करुणाष्टक” ची नायिका आहे या थोर भावंडांची आई. दारिद्र्याने हे कुटुंब देशोधडीला लागलं, त्याचीच ही कहाणी. मराठीत आईवरच्या कविता खूप आहेत पण आईवरची पुस्तकं कमीच आहेत. त्यातलं हे एक महत्वाचं. चार भावंडं, आई-बाप आणि आजी असं हे कुटुंब घर सोडून निघतं तिथूनच कहाणी सुरु होते. जिथं अनेक वर्षे वावरलो ते सारं असं सोडून जाताना होणारी उलघाल वाचक म्हणून आपल्यालाही अस्वस्थ करु लागते. ती आजी तर प्रथमच गाव ओलांडून दूर देशी निघालेली. ती भयंकर अस्वस्थ आहे. त्यात ते मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर येतात. तिथं ते रूळ ओलांडताना सगळ्यांचीच तारांबळ उडते. आपल्याला रेल्वे चिरडून तर जाणार नाही ना असं जे अजाण बालकांना वाटतं, अगदी तसं या खेडुतांना वाटतं. शेवटी रूळ ओलांडताना आजी पडतेच. मग कसेबसे तिला उचलून बाजूला आणतात. तिचं ते भेदरलेपण, तुटलेपण मांडताना माडगूळकर म्हणतात, “ या प्रसंगानंतर मुळे उघडी पडलेल्या वेलीसारखी आजी सुकत सुकत गेली...” आणि अंगावर काटा येतो..!! व्यंकटेश माडगूळकर हे उत्तम चित्रकार. प्राणी,पक्षी, वनस्पती अशा निसर्गात रममाण झालेले. उत्तम निरीक्षण शक्ती तर त्यांच्याकडे होतीच पण पाहिलेलं सारं नेमक्या व मोजक्या शब्दांत मांडायचं त्यांचं कसबही अफाट होतं. अनेक छोट्या छोट्या गोष्टी नोंदवत ते शब्दांतून जणू चित्र तयार करत जातात. नवं गाव, माणसं, त्यांचं वागणं, त्या सगळ्याशी एक हाती झुंजत आई कशी अफाट कष्टत रहायची याचं चित्र मांडत राहतात. नव्या गावात पाण्याचे फार हाल असायचे. इथल्या ओढ्यात खड्डे करून लहान झऱ्यातून पाणी काढावं लागे. मग घरापर्यंतच्या चढावरून ते पाणी आणून घरी भरावे लागे. याबाबत एक प्रसंग ते सांगतात, “ या पाणी भरण्याचा आईने धसकाच घेतलेला. कधीही मध्यरात्री जग येताच ती ओढ्यावर जायला निघायची. घरात घड्याळ नव्हतंच. आभाळ पाहून अंदाज घ्यायचा, दिशा उजळल्याहेत, डोळ्यांना थोडं दिसतंय असं बघून बाहेर पडायचं. मात्र कधी हा अंदाज साफ चुकायचा. किट्ट काळोखात फक्त बेडक्यांचे आवाज येत. बिचारी आई एकटीच झऱ्याशी बसून पाणी भरायची. जड घागरी घेऊन धापा टाकत घरी यायची. बऱ्याच वेळानं पहाटवारे सुटायचे आणि मग हिच्या लक्षात यायचं की आपण तीन वाजायच्या सुमारासच ओढ्यावर जाऊन आलो...”हे सारं वाचताना आपण त्यात कधी गुंतत जातो ते कळतच नाही. एका प्रसंगात ते वडील, ज्यांना ते दादा म्हणत त्यांच्याविषयी ते फार आत्मीयतेने लिहितात. ते म्हणतात,“ इथं आल्यावर दादांना दम्याचा जास्त त्रास होऊ लागला. तरीही ते दूरवरच्या एका विहिरीवरून पाणी आणायचे. ती चव त्यांना आवडायची. मग एकदा मी पाणी आणायचं व त्यांना चकित करायचं ठरवलं....” असं म्हणत ते तो प्रसंग रंगवू लागतात. होतं काय तर रहाटावरून दोर सोडून घागर भारून घेताना लहानग्या व्यंकटेशाची चड्डी अचानक विहिरीत पडते, मग ती आणायला तो पाण्यात उडी मारतो. मात्र वर परत कसं यायचं हे कळत नाही. शेवटी घरात आल्यावर घागर जागेवर नाही हे पाहून घाबरे घुबरे दादा विहिरीकडे येतात, त्यांना वर काढतात.... माडगूळकर हा खूप साधासा प्रसंग अशा काही खुमारीने रंगवत सांगतात की आपण तो प्रसंग जणू पाहू लागतो. आणि शेवटी ते म्हणतात, “ पुढे असा गर्तेत पडण्याचा उद्योग मी आयुष्यात आणखी काही वेळा केला, पण दादा तेंव्हा मरून गेले होते... आणि आई सतत दूर होती.मला कुणीही शेंदून वर घेतलं नाही...” अचानक असं वाक्य समोर येतं की वाचता वाचता आपणही ब्रेक लागल्यासारखे थांबतो. विचार करू लागतो. काळजात काहीतरी खूप टोचत रहातं. कालांतराने शिक्षणासाठी दूर जाऊन राहिलेला मोठा भाऊ लेखक / कवी म्हणून मान्यताप्राप्त ठरला, तरी घराचं दारिद्र्य काही लवकर उणावले नव्हते.