मुखपृष्ठ
कथा सावलीची

माझे शेल्फ

कथा सावलीची

इंग्रजी शीर्षक
Katha Sawalichi
सारांश

एकाकी स्त्रीच्या कथा... ‘मुळाचा आणि सावलीचा चिरप्रवास सुरु झाला होता एकमेकांना आधार देत! एक स्थितप्रज्ञ प्रवास! प्रकाशाच्या शोधार्थ, एक साधना सुरु झाली होती.’ या शोधापाशी माधवी देसाई यांची पहिली कथा संपते, परंतु त्याचक्षणी वाचकाच्या मनात ती सुरु होत. वरकरणी पारंपरिक वाटणारं वृक्ष व सावली हे रुपक वापरुन लेखिकेने असामान्य पुरुष व त्याच्या पाठीशी असणारी स्त्री यांच्यातील नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधयात्रेत स्वाभाविकपणे स्वत:च्या अस्तित्वाविषयी, भोवतालच्या विश्वविषयी चिंतन येतं, असं चिंतन हा माधवी देसाई यांच्या कथांत वारंवार येणारा भाग आहे. ‘कथा सावलीची’ हा त्यांचा स्त्रीविषयक कथांचा संग्रह असल्यानं या चिंतनाला स्त्रियांच्या व्यथा, वेदनांचे संदर्भ आहेत. तरीही हे चिंतन स्त्रियांपुरतं मर्यादित राहत नाही, हे या कथांचं यश आहे. म्हणूनच ‘मोकळं झाड’ या कथेतील प्राचीचं सुरक्षित, संपन्न आयुष्य सोडून कामेरी गावी येणं, शाळा उभारण्याचं स्वप्न पाहणं हे कोणताही संवेदनशील वाचक समजून घेऊ शकतो. या कथेतील आजी व प्राची आणि कामेरी गाव व प्राची यांच्यातील भावबंध वाचकाला स्पर्शून जातात. समान सूत्र भोवतालच्या व्यवहारी जगापासून तुटलेल्या स्त्रिया, त्यातून येणारं एकाकीपण हे जवळपास साऱ्या कथांमधील समान सूत्र आहे. हे एकाकीपण ‘कमळाची कविता’मधील कमळाच्या आयुष्यात जोडीदाराच्या अकाली निधुनामुळं येतं, तर जीवन, व्यवहार आणि काव्य यांसारख्या कथांत संवेदनाहीन जोडीदारापायी येतं. काव्य शिकवणारे, पण व्यवहार जगणारे समेळ सर, व्यवहारी पती आणि स्त्रीपुरुष संबंधांतून काव्य साकार करु पाहणारे सहकारी अशी या कथेतील विभागणी मात्र ढोबळ वाटते. या एकाकी स्त्रियांना निसर्ग साद घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो. म्हणून माणसांपेक्षाही त्यांना तो जवळचा वाटतो. म्हणूनच ‘लेकुरवाळा’ कथेतील उर्वशी म्हणते, ‘या वृक्षांचं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं, म्हणूनच स्थिर आहे. ना तो बदलला, ना मी! म्हणून या नात्याचे संदर्भही स्थिरच आहेत.’ याच दृष्टीने ‘हरवलेला चंद्र’ ही कथा पाहता येते. यातील लीनाला लहानपणी तूप-साखरेचा घास भरवणारा चंद्र तरुणपणी मात्र हरवतो. पुढे तो अचानक निसर्गाच्या सहवासात भेटतो. या कथांमधील प्रेमभावना वेगवेगळ्या अवस्थात व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त होते. ‘लेडी डायना’चं एकनिष्ठ प्रेम गोमांतकीय भूमीवर व खास पोर्तुगीज वातावरणात व्यक्त होतं, तर ‘जास्वंदी’ मधील प्रियकर प्रेयसी हे माणुसकी हाच धर्म मानणारे आहेत. अशाच उत्कंट प्रेमापायी ‘जिजींचं’ वर्चस्व झुगारुन उंच झेपावू पाहणारी रेशमा ‘आकाशझेप’ कथेत दिसते. आईच्या नेहमीच्या प्रतिमेशी विसंगत असे यातील जिजींचं व्यक्तिमत्व त्यातील वेगळेपणामुळं लक्षात राहतं. तारुण्यातील अविचारी प्रेमानंतर उत्तरावस्थेत अनुभवायला येणाऱ्या संयत, परिपक्व प्रेमानुभवामुळं ‘आसावरी’ कथा वेधक ठरते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असूनही ‘स्वरमयी’ ही कथा सामान्य वाटते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
70.00
समुदायाने जोडले
बंद