माझे शेल्फ
खेकडा
खेकडा कथासंग्रहात अकरा छोटया गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट गूढरम्य, थरार वाटणारी, काहीतरी वेगळी अनुभूती देणारी आहे. त्यांच्या गोष्टीत कमी पात्रे असतात, बघता बघता त्यातल्या कथानकात आपण गुंतून जातो, भीतीचा, रहस्याचा पगडा मनावर बसू लागतो आणि अतिशय वेगळाच धक्का बसून कथा संपते. त्यांच्या सगळ्याच गोष्टीत एक दृश्यमयता जाणवते, संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहते, काही दिवस झोप उडेल इतकी ताकद त्यांच्या लेखणीत जाणवते. त्यांचे सर्वच कथासंग्रह वाचनीय आहेत. त्यांची नावे, गहिरे पाणी, एक टोल वाजतायेत, रंगांधळा अशी लेखकांची वेगळी वाट सुचवणारी.मी ग्रंथालयात अगदी प्रतीक्षा यादीत नाव घालून एकापेक्षा एक मतकरींची पुस्तकं आणून वाचली आहेत. विलक्षण भीती, थरार आणि औत्सुक्य वाटून पुढे काय असे नेहमी त्यांच्या कथा वाचताना होते, कथा पुस्तकात आणि चलबिचल होणाऱ्या वाचकाच्या मनातही घडत असते. कधीतरी कॉलेज दिवसात वाचलेल्या या खेकड्याने अजूनही भयकथांची पकड आणि आवड कायम ठेवली आहे. दुर्दैवाने गूढ, रहस्यमय अशा कोविडमुळेच या प्रतिभावंत लेखकाने आपला निरोप घेतला हा विचित्र योगायोग. साहित्यविश्वात वेगळ्या धाटणीच्या कथांनी वाचकांना समृद्ध करणाऱ्या मतकरींचे कृतज्ञ स्मरण.