माझे शेल्फ
महासम्राट : रणखैंदळ
ही महत्त्वाकांक्षी, साहित्यात निर्मितीगड सर करणारी अशी महासम्राट कादंबरी मालिकेतील दुसरी मालिका किंवा दुसरा भाग पहिला झंझावात; तर हा दुसरा रणखैंदळ,खैंदळहा इतिहास गोवणारा, कालदर्शक शब्द म्हणजे रणधुमाळी. महानायक, महासम्राट शिवाजीराजे म्हणजे मरठी मनांचे स्फूर्तिदैवत. त्यांची इतिहास घडविणारी कारकीर्द आतापर्यंत अनेकांनी स्फूर्तिचैतन्य घेऊन शब्दबद्ध केली आहे. तरीही काही व्यक्ती, काही तपशील, काही घटिते यांचा एकमेकांत गुंतून घडलेला इतिहास अनेकांना सांगावासा वाटतो. कारण तो कधीही जुनाच (इतिहास ) होत नाही. शिवाजीमहाराजांचे "आठवावे रूप आठवावा प्रताप। असे वाटणे अगदी सहज असते. पाहिलेंचि पहावे पुन्हा पुन्हा ही अंतरीची भावना त्यामागे असते. नेथ धरिता राजकारणा। प्रसंग पाहोनि चालावे ।। हा समर्थ रामदासस्वामींचा मंत्र स्वीकारून राजांनी जे राजकारण केले, जो इतिहास घडवला त्याचे महत्त्व आजही आहेच. हे जाणून विश्वास पाटील यांनी महासम्राट कादंबरी मालिका सुरू केली. राजांच्या कर्तृत्वावर आधारलेली, त्यांच्या कर्तृत्वाइतकीच भव्य दिव्य पहिली झंझावात तर हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषांतही अनुवादित होऊन स्वीकारली गेली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अफझलखानाच्या वधापासून सिंधुदुर्गाच्या पायाभरणीपर्यंतची शिवरायांची कर्तृत्वाची इथे या कादंबरीत घोडदौड येते. नेताजी पालकरांचा पराक्रम येतो. बाजी प्रभू यांचे योगदान येते, पन्हाळ्याच्या वेढ्यावेळी, शिलांगण या आपल्या मनोगतात, विश्वास पाटील म्हणतात त्याप्रमाणे पहिला इस्लामधर्मीय हुतात्मा सिद्दी वाहवाह येतो. या सिद्दीचे वडील हिलालही हुतात्माच झाले होते. रणदुल्लाखान त्याचा मुलगा रुस्तुमजमा यांनीही शहाजी, शिवाजी यांची सेवा केली... हे सगळे "शिलांगणात पाटील सांगतात. तो ऐतिहासिक प्रदेश ते भर पावसात पायांखाली घालतात, छायाचित्रे मिळवतात, परिसरातील दुर्गमता आणि स्पंदने समजून घेतात. म्हणूनच ते म्हणतात, अभ्यासकांनी अनेक गोष्टी पुरावे असूनही दुर्लक्ष केले. दस्तऐवजांकडे पण सध्याचे राजकारण निवडणूकप्रवण झाल्याने शिवप्रदेश आणि शिवकाळ यांकडे आत्मीयतेने पाहिले जात नाही. सह्याद्रीबाबतचे शिवरायांचे निसर्गभान, गनिमाला धडा शिकवणे असलेल्या साहित्याला अधिक धार देणे, लोक राखणे... आणि आजचे वास्तव यांचे भान राखत लेखकाने हे चरित्रखंड लिहिल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. विजापूर, आग्रा, सुरतेत शिवरायांचे अश्वारूढ पुतळे आहेत. लेखकाने नकाशे, प्रदेशाचे गडकिल्ल्यांचे महत्त्व, भटकंती करून कुणाकुणाकडून जमविले आणि म्हणूनच या पुस्तकात मर्यादित कालखंड मोठा आयाम घेऊन जणू महाकादंबरीच बनतो. या पुस्तकातील शिवरायांचे कर्तृत्व आणि ऐतिहासिक कार्य त्यांच्या चरित्रातून पाहण्यासाठी लेखकाचे शिलांगण महत्त्वाचे ठरते. कादंबरी सुरू होते ती नेताजी पालकरांनी केलेल्या विजापुरावरील हमल्यापासून आणि संपते ती सूरतेची लूट करून, सिंधुदुर्गाची निर्मितिस्वप्नं प्रत्यक्षात आणण्याच्या धडपडीने. अगदी पहिल्या प्रकरणापासून वाचकाला आधी नकाशाच्या मदतीने प्रदेश ओळखीचा होतो. मग हालचाली, घटना, परस्परसंबंध, धोरण, व्यक्ती यांच्या चित्रणातून साकारलेली घटना भूतकाळाला पालाण घालून प्रत्यक्षात उतरते जणू. वाचक या हालचालीत, घटनांत प्रत्यक्ष साक्षीदारच असतो. वाचकाला असे वाटणे ही लेखकाने जिंकलेली लढाई आहे. त्यासाठी इतिहासकार, कादंबरीकार म्हणून येणे कसब फार प्रभावी आहे. इथे थोड्या अवकाशात त्या संदर्भात सफर करायची तर सर्व इतिहास पुनरावृत्त करणे अशक्यच. शिवाय पन्हाळा, विशालगडावरील तोफांची सलामी, काशीदने प्रतिशिवाजी बनून फसगत करणे, लाखांचा पोशिंदा जगण्यासाठी बाजीने छातीची ढाल करणे, नेताजी पालकरचे कर्तृत्व, सुरतेची लूट, जंजिरा उभारण्याची रायांची मनसा, आबासाहेब व्यंकोजी- शिवाजी यांचे संबंध, जिजाबाईंना सती जाण्यापासून शिवबांनी रोखण्याचा पाडलेला सुधारणेचा पायंडा, शाहिस्तेखानाला लालमहालात गमवावी लागलेली बोटे कात्रजचा घाट, मुस्लीम बांधवांना शिवरायांनी दिलेल्या अधिकाराच्या जागा, शाही लढाया आणि शिवरायांची युद्धनीती... या सगळ्यांची मराठी मनाने अभिमानाने केलेली उजळणीच असते. अशा वेळी विश्वास पाटील यांचे कसब असे की इतिहासाला कुठेही धक्का न लावता वाचकाला साक्षीदार म्हणून गुंतवत गुंगवत ठेवणे. या अर्थाने पाटील खरेच महाकादंबरीकार आहेत. इतिहासकाळाला जागून त्यांनी पात्रांची भाषा वापरली आहे. दाखला म्हणून (पृ. १७) नेतोबा आणि मोरेमामांचा संवाद पाहावा. मामा नेतोबाला म्हणतात, नेतोबा कसा रणपागल आहे. हे सुदीक माझ्या राजाला ठाव हाय रे इथे ठाव नाही येत. ठाव येते. रणपागल हे नेतोबाचे विशेषण त्याच्या वीरश्रीचा अर्क दाखवते. दोन पराक्रमीमधील हा संवाद राजांचे जागरूक भान आणि प्रजादक्षता दाखवतो. भाषेचा असा लहेजा ऐतिहासिकता मुखर करतो.