मुखपृष्ठ
मोडेन पण वाकणार नाही

माझे शेल्फ

मोडेन पण वाकणार नाही

इंग्रजी शीर्षक
Moden Pan Vaknar Nahi
सारांश

श्री. व. पु. काळे यांच्या आगळ्या शैलीने रंगलेल्या गूढ जीवनकथा...पु. लं. च्या ‘व्यक्ति आणि वल्ली ची चटकन आठवण होते हा कथा संग्रह वाचताना. लिहीण्याची धाटणी तशाच पद्धतीची. वाचल्याबरोबर लेखकाला विचारावंत वाटवणारी की, ही व्यक्ती कुठंय ती वल्ली तुम्हाला कुठं भेटली?’’ अनुभव असे मिळतात म्हणून कथा लिहिल्या जातात की त्या गोष्टीतल्या प्रमाणे आपण प्रसंग अनुभवतो? आता हेच पहा ना! ‘जलधारा’ मधील मंदा नाईक ही अगदी आपल्यातली. पण गर्दी असताना सिनेमाचं तिकिट ऑफर करणारा उमदा रमेश अन् त्याचा मोकळा स्वभाव कुठला? ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ या बाण्याचा! मंगला नामक एका मुलीशी एका जलधारित पडलेल्या बाणाशी एकनिष्ठ राहणारा! ‘सुंभ वळतो पीळ उरतो’ मधले लेखकांच्या मित्राचे मित्र ‘धाकटा’ अन् ‘मोठा’ यांचे स्वभाव असे चमत्कारीकच. प्रोड्यूसर होण्याच्या आशेनं नटीच्या घरी ‘टॉमी’ असलेलेला मोठा भाऊ अन् लेटमार्क केला जाऊ नये यासाठी उपोषण करीत मृत्यूला मिठी मारणारा धाकटा दोघेही जिद्दीच नव्हे तर काय? ‘जिद्द’ मधला जिद्दी दादाही असाच पिळाचा माणूस. पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा मोडतील पण वाकत नाहीत अशातल्या! या स्त्रियासुद्धा तशा जिद्दी! किंबहुंना कथासंग्रहात पुरुषांपेक्षा अशाच स्त्रियांचे विविध नमूने आहेत. ‘पंगू’ मधली मोहिनी अगदी मनात ठाण मांडून बसते. कथा वाचता वाचता आपणसुद्धा तिच्या मनानं मानानं पंगूच आहोत काय असा मधली रेवती आपल्यासमोर सारखी नाचत राहते. पूर्वाश्रमी रविद्रांबरोबर मजा केलेली सुचित्रा विवाहबद्ध झाल्यावर, रविंद्र अन् तिचे सहवासातील ‘फोटोच्या ‘निगेटिव्हज् ’ मिळवण्यासाठी त्याच्या स्टुडिओला आग लावते. ही सुचित्रा कोण? हिच्या अंगी होता तो बाणा कोणता? ती मोडली? की वाकली? ‘ही वाट एकटीची’ मधली बाबी तर फारच वेगळी. आपल्यापेक्षा आपला बच्चा सवाई होईल. ताठ मानेनं जगेल, कोणापुढं मान तुकविणार नाही या आकांक्षेनं, कोणताहि प्रसंग आला तरी सत्याला सामोरी जात स्वत: आयुष्य खऱ्या अर्थाने जगते. आठले मास्तरांनी तिची कुंतीशी केलेली तुलना तिला आवडलेली नाही. लग्ना आधी मूल झालं तर पाप म्हणून या मुलाला जगात येण्याचा अधिकार न देण्याइतकी ती क्रूर नाही. पण अशानं या जगात तिला सुख केवळ मानसिक लाभलं. सत्यप्रिय व सत्यनिष्ठ जगात पुनर्जन्म घेण्याची तिची इच्छा आहे. ‘खेळणी’ मधलं सरोजच व्यक्तिमत्त्व आणखीच निराळ! ती म्हणजे खरोखरच न फुटणारं खेळणं आहे. दुसऱ्याला मोडायला अन् वाकायला लावणारी सरोज स्वत: अगदी ताठ आहे, चौपाटीवर बसल्यानंतर कपड्यांना लागणारी वाटू जितक्या सहजपणे झटकावी तितक्याच सहजी निरनिराळ्या पुरुषांना आपल्यापासून झटकणारी अन् जगातील बरेवाईट बरेच अनुभव घेऊन लग्न करण्याची जिद्द बाळगणारी ‘वाळू’ तली सुरेखा काही औरच आहे. आणखी किती तरी व्यक्ति ध्यानात राहतात. कितीतरी वाक्यं, संवाद लक्षात राहतात. पण किती म्हणून सांगावेत? त्यापेक्षा पुस्तक वाचाव हेच बरं. आगळी,लोभस शैली करमणूक म्हणून काळ्यांचा हा कथासंग्रह वाचायला घेतला तरी तो वाचल्यावर ‘केवळ करमणूक’ म्हणून एवढंच त्याचं स्थान निश्चितच राहत नाही. मनाच्या खोल गाभ्यापर्यंत काही व्यक्ति भिडतात, तर काही वाक्यं अंतरंगात खोलवर कोरली जातात. अननुभवी व्यक्तीला क्वचित त्या व्यक्तीचं भयही वाटेल. पण त्यात भिण्यासारखं काही नाही. उलट, अशी जिद्द मोडेन पण वाकणार नाही. बाण्याची माणसं जीवनात भेटायलाच हवीत, त्या आगळ्या जीवनाची थाडीशी तरी ओळख व्हायला हवी की! काळ्याचं नाव कथालेखक. म्हणून प्रसिद्धच आहे. छोट्या छोटया वाक्यांतून बराच मोठा आशय सांगण्याची त्याची हातोटी आता आपल्या परिचयाची आहे. मानवी जीवनातल्या तत्वज्ञानाच्या कधी कधी तर ते इतक्या जवळून जातात; पण न वाकणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून प्रत्येकाचं निराळं तत्त्वज्ञान ऐकताना त्यात रुक्षपणा किंवा कठोरपणा मुळीच जाणवत नाही. लालित्यातूनच ते जीवनाचा हा मागोवा घेतात हेच तर ‘वपुं’चे वैशिष्ट्य.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद