माझे शेल्फ
मृत्युंजयी
मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. रत्नाकर मतकरींच्या भयकथांची वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या काही कथांची उदाहरणे देणे आवश्यक आहे, असे वाटते. हडळ या कथेत खूप दारिद्र्यात जगणारी आई, तिचा आजारग्रस्त, मरणपंथाला लागलेला मुलगा, यांचे चित्रण येते. दु:खी आईचे असहायतेच्या पार्श्वभूमीवर उमटणारे वात्सल्य, मृत्यूनंतर मुलाला अग्नी दिला पाहिजे, त्यासाठी ही आई दुसऱ्या जळत्या चितेतील लाकडे चोरते. बघणारे लोक तिला हडळ समजतात. हडळ इलीहा असा एकच कल्लोळ गावात उठतो. चोरी करून मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी चोरी करून लाकडे गोळा करणारी आई घरी येते. पाहते तर तिचा मुलगा उठून बसलाय आणि तिला आये म्हणून हाका मारतोय. हडळ आसंच रे मी - तुजी आये न्हई, असे म्हणून ही आई रडू लागते. एकाच वेळी कारुण्य, भीती, वात्सल्य, भास-आभास, चकवणारे सत्य, वास्तव अशा अनेक भावभावनांची संमिश्र अभिव्यक्ती या कथेमध्ये झालेली दिसते म्हणून या कथांना मनोविश्लेषणात्मक भयकथा आणि अर्थातच रंजक नव्हेत अशा कथा असे म्हणावे लागेल. फँटास्टिक या कथेत स्टोरी रायटर आणि मादक अभिनेत्री राणी` लालजीला ठार करू पाहतात; पण तो सरणावर जिवंत होतो. इथे आपल्याला वाटते, चला दचकायला लावणारी घटना घडली, आपल्याला धक्का बसलाय, इथे कथा संपलीच की! पण तसे घडत नाही. लालजी वाचला का मेला, हा प्रश्न बाकी उरतोच. याचे उत्तर लेखक वाचकांवर सोपवतो. त्याने हे सारे समजून घ्यावे. आपल्याला स्वत:च्या आणि इतरांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या सकारात्मक मानवी भावना, प्रेरणा समजावून घ्यायला, पुन्हा पुन्हा आठवायला आवडते, पण भीती, हिंसा, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार, आदी नकारात्मक, त्रासदायक, दु:ख देणाऱ्या त्रासदायक भावनांकडे काळजीपूर्वक पाहायला, नव्हे, विचार करायलासुद्धा आवडत नाही. रत्नाकर मतकरींच्या भयकथा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला लावतात.