मुखपृष्ठ
नांगरणी

माझे शेल्फ

नांगरणी

इंग्रजी शीर्षक
Nangarni
सारांश

‘जीवघेण्या’ साहित्य प्रकाराची मीमांसा… झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत ज्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे, त्या डॉ. आनंद यादव यांनी आत्मचरित्राची वाङ्मयीन व तात्त्विक चर्चा करण्यासाठी ‘प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच’ केला आहे. कथा-कादंबरीेक्षा हा साहित्यप्रकार वेगळा कसा, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, स्वातंत्र्योत्तर काळात आत्मचरित्रे कथा-कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात का आली, तरीही त्यांची एकूण संख्या कमी का, अशा तऱ्हेचे विवेचन कुठेही डॉ. यादव यांना मराठीत आढळले नाही. ही उपेक्षा दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आत्मशोध ही कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात पूर्वीपासूनच असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच मराठीत आत्मचरित्रे येऊ लागली आहे. त्यामध्ये ‘स्व’चा भौतिक शोध असला, तरी पाश्चात्त्य आत्मचरित्रांपेक्षा ती भारतीय दृष्टिकोनामुळे वेगळी झालेली आहेत. आत्मचरित्र लेखनामागे विविध प्रेरणा असू शकतात. दादोबा पांडुरंग किंवा बाबा पद्मनजी यांच्या आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक जीवन गौण स्थानी; तर सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्यावर भर होता. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध अशा व्यक्ती, आपल्याबद्दल गैरसमज होऊ नयेत म्हणून आत्मवृत्त लिहितात. व्यक्तिगत इतिहास लिहिणे ही काही आत्मचरित्रांची प्रेरणा असते. तर काही भूतकाळात रमण्याच्या उद्देशाने लिहिली जातात. लिखाणाच्या प्ररेणेप्रमाणे त्या त्या आत्मचरित्राला विशेष आकार प्राप्त झालेला असतो. आत्मचरित्र हा चरित्राचाच उपप्रकार आहे हे आन्द्रे मौरॉज यांचे मत डॉ. यादव यांना मान्य नाही. ‘नायका’च्या व्यक्तिमत्त्वावरून आत्मचरित्रांचे अंतर्मुख व बहिर्मुख असे प्रकार करता येतील. त्यातील पहिला प्रकार वैयक्तिक, प्रापंचिक, आत्मकेंद्रित असा असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे बहिर्मुख स्वरूपाची असतात. लेखनाच्या मांडणीला प्राधान्य देऊन आत्मचरित्रांचे तत्त्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्यरूपी असे वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक असतात. कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेली ‘पोएटिक’ आत्मचरित्रे (श्यामची आई, तुंबाडचे खोत) ही डॉ. यादवांच्या मते कादंबऱ्याच असतात; कारण त्यात काल्पनिक घटना व पात्रे निर्मिलेली असतात. ‘साहित्यरूपात्मक आत्मचरित्र मला आत्मचरित्रच वाटत नाही,’ असे म्हणतात. निदान ६० वर्षांचे होईपर्यंत आत्मचरित्र लिहू नये, असे सांगून डॉ. यादव म्हणतात की, १९७० नंतर नवजागृत समाजातल्या तरुण पिढीने लिहिलेली आत्मचरित्रे रोचक असली, तरी अर्धकच्ची झाली आहेत. स्वत:पासून अलिप्त होऊन स्वत:बद्दलचा विचार करण्याची एक विघटनाची प्रक्रिया आत्मचरित्रात असते. घटनाची निवड, रचना, त्यातून आकृतीबंध व नीटसपणा यासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. त्यात स्मरणशक्ती, संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता इत्यादींचाही सहभाग असतो. आत्मचरित्रातील संभाव्य दोषांबद्दल विवेचन करतानाच ते कसे टाळता येतील, अशीही चर्चा डॉ. यादव यांनी केली आहे. विस्मरण, निवडक स्मरण, वस्तुस्थिती विपर्यास, लज्जास्पद गोष्टी टाळणे असे अनेक धोके या लिखाणात संभवतात. त्यावर कालिक परिणामही होतो. मराठीत आत्मचरित्रांची लाट आल्यावर जी आत्मचरित्रे लिहिली गेली, त्यात उत्साह जास्त, अभ्यास कमी होता. तत्कालीन प्रश्नांना प्राधान्य दिल्याने ती खूप प्रसिद्धी पावली; पण नंतर कालबाह्य ठरली. ‘जो ललित लेखक असतो तो आपल्या कथा, कादंबरी किंवा नाटकात एक प्रकारे आत्मचरित्रच लिहीत असतो... त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचे समग्र साहित्य हे त्याचे एका अर्थाने परिपूर्ण आत्मचरित्रच असते,’ असे मत जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. परंतु डॉ. यादव यांच्या मते प्रत्यक्ष घटना व त्यावर आधारित साहित्यकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साहित्यिक आत्मचरित्र लिहू शकतो व त्यात त्या त्या घटनांचा साहित्याचा कसा वापर केला हेही सांगू शकतो; परंतु अनेक साहित्यिकांची आत्मचरित्रे फसली आहेत. कारण त्यात जीवनाचा सर्वांगीण अभ्यास दिसत नाही. ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ हा डॉ. यादवांना वदतोव्याघात वाटतो. कारण आत्मचरित्र हे घटित; तर कादंबरी काल्पनिक असते. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखनकौशल्य हवेच. घटनांची काटेकोरपणे निवड न केल्यास ‘कऱ्हेचे पाणी’तल्याप्रमाणे अस्ताव्यस्तपणा येतो. निवडीत अतितटस्थता आली तर ते महर्षी कर्वे यांच्या ‘आत्मवृत्ता’प्रमाणे कोरडे होते. एकाच हेतूने लिहिलेली आत्मचरित्रे संकुचित होतात. उदाहरणार्थ, आनंदीबाई विजापुरे, कांचन घाणेकर, कमल पाध्ये यांची आत्मचरित्रे. आत्मचरित्रे ही झाडाझडती नसून त्यात घटनांची निवड केलेली असते. निवडीचा दृष्टिकोन लेखकाचा असतो आणि तो मान्य करूनच आत्मचरित्र वाचायचे असते, असे डॉ. यादव सांगतात.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
288
भाषा
मराठी
किंमत
220.00
समुदायाने जोडले
बंद