मुखपृष्ठ
नियती

माझे शेल्फ

नियती

इंग्रजी शीर्षक
Niyati
सारांश

नाजूक विषयाची समर्थ हाताळणी करणारे : नियती माधवी देसाई यांची नियती ही सामाजिक कादंबरी मन, शरीर, प्रतिष्ठा, प्रारब्ध ह्या सर्व अंगांचा सखोल विचार करून लिहिली गेली आहे. एका नाजूक विषयाची ही कादंबरी आपणासही निश्चित मानवी स्वभावाचा अभ्यास करावयास लावते खोट्या प्रतिष्ठेपायी दिले जाणारे बळी, शारीरिक आकर्षणातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यातून निर्माण होणारी तडजोड प्रारब्ध आणि नियतीच्या चक्री वादळातले प्रवासी या सर्व गोष्टींचा लेखिकेने अतिशय सूक्ष्म विचार ह्या कादंबरीत केला आहे. नुसता विचारच नव्हे, तर काही मार्गदर्शनही मिळू शकते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मानसी. जिनं कधी दुःखं पाहिलच नव्हतं. ती एका श्रीमंत घरात लग्न करुन येते. आई-वडील सुखावतात तर मानसीच्या दुःखाला प्रारंभ होते. रितेनसारखा सुंदर, रुबाबदार नवरा मिळूनही ती दुःखी असते. रितेनकडून शारीरिक सुख तिला मिळणार नसतं तरी रितेन तिला तिच्या सोबतीची भीक मागतो. २४ तासांची मुदत देतो. दोन मनांच्या संघर्षातून सुसंस्कारी मानसी रितेनचा स्वीकार करते, त्याला सुखी करण्याचा निर्णय घेते. विधवा आत्याच्या शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेला रितेनमधील हा दोष ती सहृदयतेने बाजूला ठेवते. पण विधीलिखीत वेगळेच असते. रितेन फॉरिनला जातो. मानसीची नणंद ४ दिवसांसाठी मानसीला आपल्या घरी घेऊन जाते. रितेन बरोबरचाच तिचा मुलगा संतोष व मानसीची मैत्री जमते. त्यात जे नको घडायला ते घडतं. साधी भोळी मानसी संतोषकडे लग्नाची मागणी करते. संतोष प्रतिष्ठेला सांभाळून असतो. तो छुप्या संबंधासाठी तयार होतो. तर मानसी लग्न करुन उघडपणे संसार मांडायला तयार असते. संतोषच्या नकारानं ती उन्मळून पडते. आपल्या घरी येते. दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलच असतं. तिला दिवस जातात. घरातल्यांना तोंड दाखवणं मुश्कील होतं. पण सगळा वेगळाच प्रकार दिसून येतो. सासूबार्इंच्या आनंदाला ऊधाण आलेलं असतं. ही दुःखानं पिचून जाते आणि अशातच सासूबाई गौप्यस्फोट करतात. सारा डाव त्यांनीच आखलेला असतो. विधवा आत्यावर मुलाला सोपवणारी आई-आपल्या चुकीचं परिमार्जन अशा रितीने करते. मानसी चक्रावून जाते. तिला माणसाच्या प्रवृत्तींची घृणा आलेली असते. रितेन आल्यावर तोच प्रकार होतो. तो आनंदाने बेहोश होतो. वरील कथा पाहता प्रत्येक पात्र विचार करायला लावणारं असंच आहे. मानसीचा निर्णय, संतोषचा नकार, आत्याचा अतिरेक, आईचा खोटेपणा, रितेनची अनैतिक मूल सांभाळण्याची तयारी ही प्रत्येक घटना काय सांगते ? तर प्रत्येकाला प्रतिष्ठा हवी आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी कोण काय करेल ह्याचा नेम नाही. काही ह्यातले नियतीचे बळी तर काही प्रतिष्ठेचे बळी शेवटी लेखिका म्हणते स्वतःचे दुःख कुरवाळीत बसण्यापेक्षा स्वतःच अंतरंग स्वच्छ मनानं पाहिलं तर कितीतरी संसार सुखी होतील व जीवन सुसह्य होईल. एकंदरीत कठीण विषय लेखिकेने फार सहजतेने हाताळला असून कोणत्याही पात्रावर अन्याय न करता प्रत्येक पात्राची त्याच्या वागण्यामागची कारणमिमांसा शोधून काढली आहे. सुंदर भाषाशैली, काकतालीय न्याय कथेची मांडणी आणि जीवन सुसह्य होण्याचा मार्ग सर्वच काही कादंबरीत सापडते. प्रस्तावनेपासून कादंबरी वाचण्यास सुरुवात करायला हवी. प्रस्तावनादेखील काहीतरी देऊन जाते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद