माझे शेल्फ
नटरंग
आनंद यादवांची नटरंग.लेखन हाच पिंड स्वीकारलेल्या लेखकांकडून एकाहून एक सरस साहित्यकृती निर्मिल्या जातात पण तरीही त्यांची ओळख एखाद्याच अजरामर साहित्यकृतीशी घट्ट विणली जाते.शिवाजी सावंतांची ओळख मृत्युंजयकार म्हणून तर विश्वास पाटील झाडाझडती ,विस भाऊंना यातिकार म्हणून अशी उदाहरणं वाणगीदाखल देता येतील.अशाच पंक्तीतलं एक उदाहरण म्हणजे डॉ.आनंद यादव अर्थात झोंबीकार.आनंद यादवांची आठवण येण्याची कारण म्हणजे त्यांचा स्मृतिदिन व जयंती दिन.हे दोन्ही दिवस कमी अंतराने आहेत.कागलकर आनंदरावांचा जन्म 30 नोव्हेंबरचा व मृत्यू 27 नोव्हेंबरचा.दोन तारखातलं अंतर दिवसात मोजलं तर तीन दिवसाचं आहे पण शरीरदेहाच्या वावरण्याचा कालखंड मोजला तर तो तब्बल एक्याऐंशी वर्षाचा आहे.आकाशवाणी केंद्रातली काळी काळची नोकरी ,पुण्यातली दीर्घ काळ प्राध्यापकाची नोकरी केलेल्या आनंदरावांनी मराठी साहित्यासाठीही एकाहून एक सरस साहित्यकृती दिल्या.त्यांच्या नटरंग या कादंबरीचा परिचय मी मांडत आहे. नटरंग हा मराठी सिनेमा अनेकांनी पाहिलेला आहे.काहींनी तो दोनदा तीनदाही पाहिला असेल.तमाशा कलेचे वेड पांघरलेल्या गुणा या गुणी कलाकाराची चित्तरकथा म्हणजे नटरंग .अर्थपूर्ण गीते व दमदार कथानक यांमुळे नटरंग प्रेक्षकांचा ठाव घेतो. हो ,हा नटरंग सिनेमा ज्या कादंबरीवर बेतलेला आहे तिचं नाव आहे नटरंग व लेखक आहेत डॉ.आनंद यादव. चित्रपट पाहिलेल्या माणसांनी कादंबरी वाचायला घेतली की सुरूवातीची काही पाने वाचताना माणुस चित्रपटातल्या दृश्यांना डोळ्यासमोर ठेऊन वाचतो.मग हळूहळू चित्रपटाचं झाकण आपोआप गळून पडतं व आपण साहित्यकृतीशी एकरूप होतो. कागलच्या मांगवाड्यातील गुणा हा मुलाची ही कथा.अंगापिंडानं चांगलं थोरलं व रूपानं राजबिंड असलेलं हे गुणा पोर खरोखरीच गुणी असतं.कुस्त्या मारलेलं शरीर त्याच्याजवळ असतं पण दणकट शरीराच्या मनात एक कलासक्त चित्त वावरत असतं.भोवतालच्या परिसरात यात्रा व यात्रेतलं मनोरंजन म्हणून तमाशा ही संस्कृती रूढगत झालेली असते.गुणालाही तमाशा पाहणं आवडत असतं .त्यातूनच त्याला तमाशात काम करण्याचं व स्वतःचा फड उभा करण्याचे वेड लागते.तमाशा उभा करण्यात येणाऱ्या अडचणी व अडचणींवर केलेली मात ,तमाशाबद्दलची मते या सगळ्या गोष्टी नटरंगमध्ये वाचायाला मिळतात.तमाशा ही जरी कला असली तरी कलावंताचा प्रवास किती खडतर किती जीवघेणा असतो ,याचा आरसाच नटरंग उभा करते.कादंबरी दोन भागात आहे.पहिल्या भागात गुणाचं कौटुंबिक जीवन ,तमाशा उभे करण्याचे कष्ट अडीअडचणी आहेत.कलेला साधना ,ध्येय स्वीकारलेल्या गुणाचा संघर्ष पहिल्या भागात आहे.गुणाच्या वडिलांना गुणाचे हे तमाशाचे वेड अजिबातच पटत नव्हते.दोघा बापलेकाचे वारंवार खटके उडत.शेवटी गुणाचा बाप आत्महत्या करतो.चित्रपटात गुणाच्या बापाचा मृत्यू नैसर्गिक दाखवलेला आहे. कादंबरीचा दुसरा भाग थरार आहे.गुणा ,नयना ,विष्णू या सामान्य कलाकारांना असामान्य रंगमंच मिळतो व नाच्या या पात्राने गुणाची वाहवा होते.रात्रीच्या वेळी कलाकार म्हणून गुणाच्या नाच्याचे कौतुक होत असले तरी दिवसा मात्र नाच्या गुणाच्या वाट्याला सगळीकडूनच हेटाळणी वाट्याला येत असते.पुढं तर जे घडतं ते भयावह व अकल्पित आहे.बापय माणुस असलेल्या गुणावर बलात्कार होतो.कलेच्या पुजेला ध्येय मानणारा गुणा पुजारी अक्षरशः उद्धवस्त होतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे तांत्रिक कौशल्य असते .मुळ लेखनात पाया ,विस्तार व समारोप असल्यामुळे लेखकाची मुळ कृती चित्रपटाहून अधिक व्यापक असते.गुणाचा सारा प्रवास ,ग्रामीण बोली इ.बाबीसाठी नटरंग वाचावी.