माझे शेल्फ
पाणभवरे
संवेदनाशील मनाच्या महापुरातील ‘पाणभवरे’… अंत:करणात उफाळणाऱ्या भावनांना शब्दरूप करताना गतकालातील घटनांना नेमक्या शब्दात, नेटक्या आणि नेमस्त संस्कारीत भाषेत वाचकांपुढे उभे करण्याचे सामर्थ्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. जवळ जवळ सहा वर्षांच्या काळात अलग अग लिहिलेल्या लेखांचे हे संकलन असूनही त्यात एक विलक्षण सातत्य आहे. सुसुगतता आहे. जीवनिष्ठा आणि तर्कसंगत, प्रामाणिक आचार यांची जाणीवपूर्वक जपणूक आहे. ग्रामीण आणि नागर संस्कृती यांच्यातील प्रवाशांना संस्कारक्षम मनाने इथे डोळसपणे अभ्यासलेले आहे. आयुष्यात जे जे घडले ते ते न्यायबुद्धीने स्वीकारलेले आहे. मानसिक द्वंद्व प्रामाणिकपणे रेखाटले आहे. आणि कुठेतरी मध्येच अनुभवातून शिकलेली समृद्ध झालेली विरक्तीही दिसते. ‘हातपाय थकले की छानपैकी चटकन मरून जायचे...’ (पृष्ठ ८८) असे एखादे उदास वाक्य लेखक लिहितो; परंतु ही क्षणिक मरगळ आहे हे वाचक समजतो. आशा-निराशा यांचे हेलकावे आणि त्यातून होणारी मानसिक जडणघडण यांचे एक अभावित, अनपेक्षित असे आगळे रूप या पुस्तकात दडले आहे. समचित्र वाचकाला ते आपोआप जाणवले. एकोणीस कथांमधून मन:चक्षूंसमोर उभा राहणारा ‘आनंद’ रसिक वाचकाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. शब्द मेळवून चाले नेमक्या शब्दांत प्रसंग, घटना उभं करण्याचं विलक्षण सामर्थ्य आनंद यादवांच्या लेखणीत आहे. त्याचे प्रत्यंतर पुस्तकात जागोजाग येते. ‘घराकडचा रस्ता वाचताना’ ह्या वत्सल घरांमधून आणि प्रेमळ रस्त्यांवरून मी खूप हुंदडलो आहे. धुळीच्या कणांसारखा प्रत्येक घराच्या अंत:करणापर्यंत जाऊन आलो आहे. घर निरनिराळ्या मनाची, पण रस्त्यानं ती एकाच जागी सांभाळली आहेत. दहा मुलांच्या पित्याच्या अनुभवाने त्यानं त्या सर्वांना उराशी धरलं आहे.’ (पृष्ठ ७) इथं वाचक थबकला नाही तरच नवल. वडलांच्या धाकामुळं ढोरं राखणारं बालमन ‘मारत असला तरी मास्तर बरा’ असं म्हणत आणि ‘माणूस शिकून शाणंबी हुतय म्हण’ असा तर्क करत तेव्हा विनोदाची सुप्त लहर जाणवून जाते. नवे कायदे येतात आणि जन्मभर पोटच्या पोराप्रमाणे जपलेली जमीन हातची जाताच दादाची-वडलांची होणारी जीवघेणी उलघाल लिहिताना यादवांनी उभे केलेले शब्द सहृदय वाचकाला स्तब्ध करतात. ट्रॅन्झिटर गळ्यात अडकवून ‘वानरांच्या गावाला गेलेल्या आनंदा मामीच्या हातची शिणकुटासारखी जाड ज्वारीची भाकरी खातो आणि शहरी मोठेपणाची ग्रामस्थांना वाटणारी गंमत कशी निर्लेपपणे पाहतो ते वाचायलाच हवे.’ आंबा घाटात वर उभं राहावं आणि खाली कोकणातून बाव नदीच्या खोऱ्यातून गगनाच्या गाभाऱ्याकडे निघालेल्या धूम्रशलका पाहव्या म्हणजे जो दैवी आनंद वाटतो तोच किंवा तसाच आनंद या पुस्तकातीन वळविलेल्या शब्दामुळे होतो. सौंदर्यस्थळे दक्षिण महाराष्ट्रातले विशेषत: पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील ग्रामीण जीवन त्याच्या गुणदोषांसह अभावितपणे या पुस्तकात पुढे आले आहे. या ग्रामीण भागात वाढून पुढे शहरात रमलेला, पोटासाठी शहरात शिरलेला ‘आन्दा’ क्रमाक्रमानं पण ठामपणे विकसित झाला आहे. ढोरांमागे फिरणारा गावंढळ’ पोरगा पुण्यात पोरांसमोर ‘शहरी’ प्राध्यापक म्हणून उभा राहतो. स्वत:च्या बळावर, बुद्धीवर. ‘जरासंध’मध्ये अगदी सुरुवातीलाच मित्रांचा एक प्रश्न येतो. ‘सध्या गावाकडं कधी जाता की नाही ?’ ‘जातो ना !’ आपल्याविषयी घेतलेली ही शंका लेखकाला पार अस्वस्थ करते कारण पुण्यात रमणारा जीव नाही. ग्रामीण जीवनाची ओढ आणि आपद् धर्म म्हणून स्वीकारलेले शहरी जीवन यांच्या मानसिक संघर्षातून स्फुरलेली कथाबीजे म्हणजे ‘शेवटची माती’, ‘आभाळगळ’, ‘ममी’, ‘पाटी आणि पोळी’, ‘बावीस एकरी’ ही अतिशय विलोभनीय सौंदर्य स्थळे आहेत. ‘पाटी आणि पोळी’त लेखकानं एक विलक्षण बोच उघड केली आहे. ... मला तिनं (पाटीनं) प्राध्यापक केल. माझ्या दोन भावांना कारकून करून रोज दोन वेळ पोटाला दिलं... ह्या स्वतंत्र भारतात एवढं पोटाला मिळतं, कुणी कार्यकर्ता अजून ताटातलं पळवून नेत नाही, हे का थोडं झालं ? (पृष्ठ १५०) यावर भाष्य हवेच का ? आत्मकथनाचा एक सुंदर प्रकार म्हणून या पुस्तकाकडे पहायला हवे. ग्रामीण आणि शहरी जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन मूलत: स्वच्छ आणि निरामय आहे. जे अनुभवले ते शब्दरूप केले यामुळे कुठेही कृत्रिमतेचा लवलेशही नाही. ‘एक स्वदेशी प्रवास’ व ‘राष्ट्रीय महारस्ता’ या प्रकरणात शहरी जीवनातील अगतिगता फार प्रकर्षाने जाणवते. ‘मी आताशा निर्दय समंजस होत चाललो आहे’ (पृष्ठ १९३) आणि ‘उगाच तग धरून राहिलेली नि काल बाह्य झालेली आपली माणुसकी जागी होते आणि दिवस चांगला जात नाही’ ही दोन वाक्ये या संदर्भात फार बोलकी आहेत. लेखकाच्या सेखणीचे सामथ्र्य सर्वत्र जाणवते. कुणाचे अनुकरण नाही. सारे स्वत:चे ! सारे स्पष्ट ! मन:प्रवाहाचे हे भवरे फार खोल आहेत. प्रचंड ओढ असूनही ते तालबद्ध आहेत.