माझे शेल्फ
पारखा
पारखा ही कर्नाटकातील काळेनहळ्ळी या गावात वोक्कलिंगम या पशुपालक समाजातील श्रध्दा आणि रुढींनी घडवलेल्या समाजात घडलेली कथा आहे. कळिंगगौडा हा आपल्या पुण्यकोटी गाईंसह इतर गाई बैलांचा भला मोठा गोठा सांभळणारा गावचा देवभोळा गौडा आहे आणि त्याचा नातू पुट्टकळिंग जो अमेरिकेत शिकून आलेला पाश्चिमात्य विचारांनी भारलेला नातू या दोघांमधल्या मानवी मुल्ये,श्रध्दा आणि व्यवहारवादातील संघर्षाची कथा या कादंबरीत वाचायला मिळते. यात एकीकडे गाईला देव मानणारी श्रध्दा आहे तरी दुसरीकडे गाईकडे व्यवसायिक दृष्टीने पाहणारी पाश्चिमात्य दृष्टी आहे ज्यात भाकड गाई कसायला विकणे हे त्यांना पोसण्या पेक्षा आर्थिक दृष्ट्या फायदेशिर असल्याचा व्यवहार शिकवते . या बरोबरच जागतिकीकरणाच्या बदलामधे झालेले बदल पचवत पचवत आपलं गायरान टिकवणारा गौडा पुण्यकोटी गाईचं मंदिर बांधून मरुन जातो .या नंतर अमेरिकेतून परतलेला पुट्ट कळिंग हा त्याच्या अमेरिकन बायको बरोबर या गायरानात येऊन शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत घरच्या जनावरांनाही व्यवसायिक दृष्टी समोर ठेवून पाळू पाहतो. यात कळिंगाच्या बायकोने केलेले गोमांस भक्षण आणि देवस्थानात केलेली ढवळढवळ यात गावकरी विरुध्द कळिंग सघर्ष होऊन शेवटी आपल्याच देशात ,आपल्याच लोकांमधे कळिंग कसा एकटा पडत जाऊन पारखा होतो यांची सगळी कथा ही कादंबरीची मध्यवर्ती कथा आहे. यात कर्नाटकातील खेड्यातील लोकांची श्रध्दा,यात्रा जत्रा , वेगवेगळ्या व्यक्तिरेखा इ.मुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे .कळिंगाचा मित्र आणि मंदिराचा पुजारी असलेला वेंकटण्णा यांच्यातील वैचारिक संवाद आणि वादविवाद विचार करायला लावणारा आहे. कादंबरीच्या शेवटी कळिंगाच्या विसर पडलेल्या संस्कारांवरचा पडदा दूर होऊन तो पुढे काय करतो हे वाचण्यासारखं असलं तरी पुढे काय होईल हा प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच कादंबरीचा शेवट झाला आहे. भारतीय मुल्यांचां बदलत्या परिस्थितीत शोध घेण्याची दृष्टी या कादंबरीमुळे वाचकाला मिळते. याच कादंबरीवर कन्नड मधे चित्रपट तयार झाला तसा हिंदीतही गोधुली हा चित्रपट येऊन या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.