माझे शेल्फ
पाऊलवाटेवरले गाव
चिंतनशील कथा... आशा बगे यांच्या स्वतंत्र धाटणीच्या कथांना मराठी साहित्यविश्वात एक खास ओळख प्राप्त झालेली आहे. त्यांचा ‘पाऊलवाटेवरले गाव’ हा कथासंग्रहही त्यांच्या आधीच्या कथांच्या लेखनपरंपरेशी नाते सांगणाराच आहे. या संग्रहात सात कथा आहेत. व्यक्तीच्याजगण्याच्या माध्यमातून प्रश्नांकडे पाहणे आणि चिंतनशीलतेचा स्पर्श असलेले निवेदन योजणे ही त्यांच्या कथांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ‘केवडा’ ही पहिली कथा एका जाणत्या वयातील मुलाचा अंत न पचवू शकलेल्या स्त्रीची भावस्पंदने टिपते. त्यांच्या शेजारी नव्याने राहायला आलेल्या तरुण आजारी मुलाविषयीची जयाची सुरुवातीची अनुकंपा हळूहळू विकृत कुतूहल आणि बटबटीत असूया अशा वाटेने बदलत जाते. केवड्याच्या वासाचा जयाला होणारा भास हा मरणगंधाचीच चाहूल व्यक्त करतो. त्यातही सूक्ष्म दरवळ ते उग्र गंध अशा छटांमधून वेगवेगळे भाव सूचित होतात. यातील काही कथा कसलाही गाजावाजा न करता गाभ्याशी सामाजिक आहेत. ‘गाव’, ‘लग्न’, ‘कलश’, ‘पुन्हा एकदा जन्म’ या सर्व कथा स्त्रीकेंद्री आहेत. या कथांमधील नायिका वेगवेगळ्या प्रकाराच्या जीवनानुभवातून जात आहेत. लेखिका व्यक्तिलक्ष्यी पद्धतीच्या या कथांमधून सामाजिक बदलांवर भाष्य सुचवत आहे. ‘लग्न’ ही कथा यात विशेष महत्त्वाची आहे. आंतरजातीय विवाह केलेली रेणू अर्थातच आपल्या घराला मुकलेली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर रेणू आपल्या मुलीबरोबर प्रथम माहेरी येते. तिच्या लग्नानंतर घरी नातेवाईक मंडळींनी पाठविलेली पत्रे तिच्या हाती पडतात. एक-दोन अपवाद वगळता ती पत्रे त्रागा करणारीच असतात. तिच्या काकांचे आणि आजीचे पत्र मात्र वेगळी समज दर्शविणारे असते. या सर्व भावनिक क्षोभाचे चित्र तपासताना ‘आपण खरंच बदललो का?’ हा प्रश्न तिला पडतो. तिच्या मुलीनेही स्वत: अशाच वेगळ्या वाटेने जायचे ठरवलेले असते. त्यामुळे या प्रश्नांचे सातत्य आणि त्यांना जाणून घेण्याच्या समाजिक कुवतीचे दुबळेपण विशेष ठसते. ‘गाव’ ही कथा जितकी नायिका अनूची आहे तितकीच ताराबार्इंचीही आहे. त्या दोघींच्या शेजारपणातून वाढत गेलेल्या नात्याशीच ही कथा थांबत नाही. मूल नसलेल्या स्त्री सामाजिक अस्तित्व हा कथेचा केंद्रबिंदू होतो. ताराबार्इंच्या परपुरुषाशी असलेल्या मैत्रीकडे अनू निकोप दृष्टीने पाहू शकते. मूल नसण्याच्या वैयक्तिक दु:खात जखडलेल्या ताराबाई आणि मतिमंद मुलांसाठी संस्था चालवणारी, मातृत्वाचे व्यापक रूप अनुभवणारी अनू यांच्यातील विरोध बोलका ठरतो. ‘कलश’ ही कथाही देवकी आणि विद्याधर या एके काळच्या जवळच्या आणि आता स्वतंत्रपणे संसारी असलेल्या दोघांच्या भेटीचा प्रसंग रंगवते. ‘महाभारतातील नायिका’ या विषयावर व्याख्यान द्यायला आलेला विद्याधर मुलाच्या मृत्यूचा आघात पचवून स्वत:च्या मृत्यूची चाहूलही शांतपणे ऐकत आहे. मात्र, देवकीकडील भेट त्याला जणू जीवनेच्छेने भरलेला कलश पुन्हा प्राप्त करून देते. ‘अँटिक’ ही कथाही जुन्या मित्रमैत्रिणीची फार वर्षांनी होणारी भेट चित्रित करते. भूषण सरदेसाईचे कुठेच न रूजणे, मैत्रिणीने दिलेले छोटे पितळी घंगाळ त्याला ‘फिंगर बाऊल’ वाटणे... इत्यादी गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे उडून गेलेले रंग दाखवून देतात. तो मैत्रिणीकडून शारीरिक सुखाची अपेक्षा करतो तेव्हा स्त्रीची अनावृत आकृती असलेला ‘अँटिक पीस’ ही कथेत एक अर्थगर्भ प्रतिमा बनते. ‘पुन्हा एकदा जन्म’ मधली कावेरी आजारपणात हॉस्पिटलमध्ये काही भासचित्रे अनुभवते. तिच्या अबोध मनातील इच्छा-आकांक्षा जणू त्यातून तरारून येतात. त्या एकांतातला आत्मभानाचा क्षण तिला नव्या जन्मासारखा समृद्ध करणारा ठरतो. ‘अतिथी’ ही कथा अर्ध्या उतरलेल्या वयात पहिले लग्न अनुभवून दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या दोघांची कथा आहे. लग्नाला जाताना वाटते रस्ता पुराने बंद होणे, अनोळखी ठिकाणी आसरा मिळणे, तिथे एक मृत्यू जवळून पाहणे... असे घटनाचक्र त्यांच्या लग्नाच्या आधी घडते. वृद्धापकाळी शांतपणे मृत्यू पावणाऱ्या पतीला तितक्याच इममामाने निरोप देणारी यातली प्रगल्भ वृद्ध स्त्री लक्षात राहते. नव्याने लग्न करणाऱ्या या जोडप्याला पती-पत्नी नातेसंबंधाचे एक प्रगल्भ रूपच यानिमित्ताने पाहायला मिळते. यातील अनेक कथा घटनाप्रधान नाहीत.दोन व्यक्तींची भेट, त्यांच्या नातेसंबंधातले सूक्ष्म हेलकावे यांनाच कथेत महत्व असते, ‘पाऊलवाटेवरले गाव’ हे शीर्षक व्यक्तीच्या आंतरिक जीवनाशी समाजाचे सूक्ष्मपणे जोडले जाणे सुचवते. या कथा सामाजिकतेचा आशय याच मार्गाने पोचवतात. ‘उत्तररामचरिता’तील सीताख् महाभारतातील नायिका इत्यादी साहित्यातील संदर्भ यात कथेच्या आशयाशी एकजीव होतात. स्वत:चा स्वत:शी असलेला संबंध, इतरांशी जोडलेले असण्याची जाणीव आणि कालप्रवाहाची अनिर्बंध गती अशा विविध कोनांतून मानवी संबंधाकडे पाहणारी यातली कथा चिंतनशीतनेचे परिमाण आत्मसात करते. क्वचित निवेदनशैली तरल होता-होता धूसर होते. जसे ‘केवडा’ या कथेतील केवडा.