माझे शेल्फ
प्रतिद्वंद्वी
अस्तित्वाचा अर्थ शोधणाऱ्या कथा... आशा बगे या अनेक वर्षे सकस कथालेखन करणाऱ्या एक मान्यताप्राप्त लेखिका आहेत. त्यांची कथा समकालीन प्रश्नांना स्वत:च्या खास पद्धतीने भिडते; त्यामुळे त्यांची कथा वेगळेपणाने उठून दिसते. ‘प्रतिद्वंद्वी’ या संग्रहात त्यांच्य चार दीर्घकथा समाविष्ट आहेत. ‘प्रतिद्वंद्वी’ हे शीर्षक असलेली एकही कथा यात नाही. आशा बगे यांच्या लिखाणाची एक रीत आहे, त्यानुसार या कथांमध्ये रुढार्थाने घटना फारशा नाहीत. त्या प्रामुख्याने दिसतो तो माणसांतला नातेसंबंधातला शोध घेण्याचा प्रयत्न. नात्यातला तोल राखताना आणि तो राखत स्वत:ला सावरताना माणसाच्या मनात उठणारी वादळं वा तरंग यांची विविध रूपं कथांमधून जागोजागी भेटत राहतात. अपघातामुळे अंथरुणाला खिळलेला आणि त्यातून सावरत असलेला कार्तिक, फिजिओथेरपिस्ट अन यांच्यातला नातेसंबंधांचा धुसरसा पट उभा राहतो तो संमिश्र भावभावनांच्या पार्श्वपटलावर. माणसाच्या सावरण्याच्या क्रियेवर ही कथा भाष्य करून जाते. लौकिकार्थाने वाया गेलेला आणि मनाला असंख्य अढीचे पीळ पडलेला मुलगा आणि त्याची आई यांच्यातल्या संबंधांचा आलेख सामोरा येतो तो किती दूर मधून ही आई स्वत: निष्णात डॉक्टर. तिच्या हातून रोज अनेक जन्म घडतात. पोटचा पोरगा मात्र तिच्यासाठी एखाद्या शापासारखा त्यांच्यातल्या संबंधांच्या आलेखात संघर्षाचे बिंदूचे अनेक. या आलेखाचा शेवटमात्र काहीसा वेगळा. एकूण आयुष्याचे सखाले भान देणारी कथा ‘निर्मोही’. सुखवस्तू आणि समृद्ध घरातल्या अनुराधाबाई आणि त्यांच्या मदतीसाठी (घरकामासाठी) वृद्धाश्रमातून ‘आणलेली’ सामान्य स्त्री कृष्णा. या दोघींच्या व्यक्तित्वं पूर्णत: निराळी. त्यांच्यातल्या संबंधाच्या निमित्तानेआशा बगे एक व्यापक अर्थाचं भान देऊन जातात. ‘सखी’ कथेत एका कुटुंबातल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांचं चित्रण आहे. परस्परांना आकळून घेता घेता स्वत:ला आकळून घेण्याचा प्रयत्न करणारी ही माणसं आहेत. ‘पाऊलवाटेवरले गाव’ मधल्या ‘केवडा’, ‘गाव’, ‘लग्न’, ‘अॅन्टिक’, ‘कलश’ या कथांमधल्या वर्तमानावर भूतकाळाची सतत सावली पडलेली दिसते. ‘पुन्हा एकदा जन्म’ आणि ‘अतिथी’ या दोन कथा मात्र वेगळ्या रीतीच्या आहेत. ‘केवडा’मध्ये प्रतिमांचा तरल आढळ आहे. सर्जनाचा पायरव ऐकवणारी ही कथा उत्तम उतरली आहे. लहानपणची पावलं ज्यांच्या घरात वावरली त्या काकू निवर्तल्याचं कळल्यानंतर त्या गावाला जाणारी अनू... काकुंशी जडलेलं तिचं नातं... अस या कथेचे विविध बिंदू आहेत. ‘लग्न’ ही कथा उलगडते बरीचशी पत्रांमधून. आंतरजातीय विवाहामुळे उठलेले कल्लोळ हे कथेच्या पृष्ठाभागी असले तरी त्या पल्याडचं असं बरंच काही ही कथा सांगू पाहते. ‘पुन्हा एकदा नवा जन्म’ मधली कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. ट्यूमर झाल्याने तिचं गर्भाशय काढून टाकलं आहे. हॉस्पिटलमधल्या मुक्कामात जुन्या आठवणींच्या निमित्ताने तिला स्वत:ला तिच्याच एका नव्या जन्माचं भान लख्खपणे येते. मात्र भोवतालात ते विरूनही जाते. ‘अतिथी’ मध्ये उतारवयात विवाह करण्यासाठी निघालेलं आणि अगदी जवळून मृत्यूचं दर्शन घडलेलं जोडपं आहे. या दोन्ही कथासंग्रहांचा समग्र विचार करायचा तर त्यात जमेच्या बाजू आहेत तशाच त्रुटीदेखील. मानवी नातेसंबंधांबाबतचं कुतूहल आणि आस्था कथांमध्ये आहे. अशा लिखाणात प्रतिमा-प्रतिकांचा वापर होत असतोच; तसाच तो इथेही आहे. असा वापर तरलतेने तोल राखून झाला तर कथा उंची गाठू शकते. या संग्रहांतल्या काही कथा त्यात काहीशा कमी पडतात. काही ठिकाणी प्रतिक-प्रतिमांचा वापर ढोबळ करकरीतपणे होतो. कथेच्या मूळ वृत्तीशी तो तादात्म्य पावू शकत नाही. त्यामुळे तरल पातळीवर चालत असलेल्या कथेची पावलं अचानक दुसऱ्या पातळीवर पोहोचतात. रसभंग तिथे होतो. हा तोल राखला गेला असता तर कथा अधिक उत्तम झाल्या असत्या.