माझे शेल्फ
फॅन्टसी एक प्रेयसी
एक अस्सल माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा बहुतेक कलावंतांच्या ठिकाणी प्रबळ असते. हा ‘अस्सल माणूस’ जेवढा बहुश्रुत, आयुष्यात इंटरेस्ट घेणारा, तितकेच त्याचे ललित लेखनही वैशिष्टयपूर्ण आणि वेगळे ठरते. कथा, कथा-कथन आणि कादंबरी या तिन्ही प्रांतात व.पुं. चे ललि लेखनही वेगळ्या वाटेने जाणारे व आपला पृथगात्म ठसा उमटवून देणारेच आहे. व.पुं.च्या संवेदनशील, स्पंदनशील आणि संपन्नशील व्यक्तिमत्त्वाच्या आकलनासाठी ‘फॅन्टसी - एक प्रेयसी’ हा आठ लेखांचा ललितसंग्रह नक्कीच साह्यभूत ठरतो. फॅन्टसी आणि व.पु. हे समीकरण सर्वश्रुतच आहे. माणसाच्या वृत्तीवर, विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या फॅन्टसीबद्दल व.पुं.च्या मनात कमालीचे प्रेम आहे. फॅन्टसी ही हवे तेव्हा अवतरणारी चीज नसून, एखाद्या लहरी प्रेयसीप्रमाणे हटून बसणारी प्रेयसीच आहे, असा प्रत्यक्षानुभव व.पुं.नी व्यक्त केला आहे. मन उद्ध्वस्त करणारे अनुभव पचविण्याचे सामर्थ्य देणारी फॅन्टसी हा उदास मन:स्थितीवरचा उतारा असून, आपल्या लेखनाच्या दिगंताच्या प्रवासातील सावलीच आहे, असे व.पु. जेव्हा कथन करतात, तेव्हा ‘फॅन्टसी’ या प्रकाराशी त्यांचे असलेले मानसिक नाते लक्षात येते. प्रवासाने माणूस चतुर होतो, या न्यायाने रेल्वेतला तिकीट चेकर हा सर्वांत हुशार माणूस अशाच एका प्रवासात रेल्वे तिकीट चेकरने टारगट मुलांना शिकविलेला धडा (केल्याने देशाटन) आणि सुधीर फडक्यांपासून श्रीधर फडक्यांपर्यंतच्या संगीत कलावंताचा आलेख (माझं गं तारू) वपुंनी रेखाटला आहे. दूरदर्शनने आकाशवाणीची केलेली हकालपट्टी, प्रचंड जाहिरातबाजी आणि कॅसेटचे राजकारण या गदारोळात खऱ्या संगीत कलावंताची परवडच होत असते, हे विदारक सत्य ‘माझं गं तारू’ या लेखाच्या निमित्ताने वपु निदर्शनास आणून देतात. बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेत ‘घर’ या संकल्पनेसंबंधी स्वत:चे चिंतन ‘कशासाठी घरासाठी’ या लेखात वपुंनी अभिव्यक्त केले आहे, ते विचारार्ह आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रचंड प्रमाणात झालेल्या औद्योगीकरणाने माणसाचाच घेतलेला बळी आणि सगळ्या घरांची झालेली थिएटर्स त्यांना अस्वस्थ करतात. दिवेलागण, पाढे, शुभंकरोतीचा जमाना कधीच अस्तंगत झाला आणि मग घर म्हणजे आसरा, सावली, आधार, गारवा देणारा मित्र न राहता, आपल्याशी स्पर्धा करणारे, त्याच्या प्राप्तीसाठी आयुष्याचे दान मागणारे विधिलिखितच होऊन बसले. शेवटी ज्यामुळे वास्तूला ‘घरपण’ येते, ते माणसामाणसातले नाते, माणसामाणसांतला संवाद हरवलेले घर आपल्याला घराचाच बळी देऊन मिळते. वपुंचा ‘कशासाठी घरासाठी’ हा लेख वाचकांच्या मनात घर करून राहील, असाच आहे. मध्यमवर्गीय जाणिवांच्या परिघातच वपु टच लेखणी घुटमळतच राहिली आहे, असा आरोप अनेक समीक्षकांनी केला आहे; पण मध्यमवर्गाच्या मर्यादा केवळ साहित्यालाच पडल्या, असे नव्हे. तर जगण्यालाच पडल्या होत्या, असा कबुली-जबाब ‘बडोदेकर मित्रांनो’ या आत्मचरित्रपर लेखात वपुंनी दिला आहे. सामान्यांचा प्रतिनिधी या एकमेव नात्याने व एक अस्सल माणूस म्हणून जगण्याच्या प्रबळ इच्छेखातरच या लेखाचा जन्म झालेला आहे. लता दीदीला अर्पण केलेले एक आगळेवेगळे मानपत्र आणि ‘घरचा आहेर’ हे अखेरीचे लेख मात्र शाब्दिक कारागिरी, ओढूनताणून आणलेली चमत्कृती, आकाराला दिलेले अकारण महत्त्व आणि एकसुरी संवाद यांमुळे खटकतच राहतात; पण तरीही कथा, कथा-कथन, कादंबरी या प्रांतांप्रमाणेच ललितलेखांवरचा ‘वपुटच’ त्यांच्या साहित्याच्या समग्र अभ्यासासाठी आणि शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, याबद्दल तिळमात्र शंका नाही.