मुखपृष्ठ
रिवणावायली मुंगी

माझे शेल्फ

रिवणावायली मुंगी

इंग्रजी शीर्षक
Rivanavyali Mungi
सारांश

अनोखं ग्रामजीवन साकारणारं भन्नाट लेखन... राजन गवस हे आजचे आघाडीचे लेखक. ‘कळप’, ‘भंडारभोग’, ‘तणकट’ या कादंबऱ्या लिहिल्या नंतर ‘रिवणावायली मुंगी’ या कथा-संग्रहाने या लेखकाने मराठी कथालेखनाच्या प्रांतात पदार्पण केलं आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात ‘सत्यकथा’, ‘बखर’, ‘सा. सकाळ’, ‘साहित्य शिवार’, ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘म. टाइम्स’, ‘रानमळा’, इ. नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या तेरा कथांचा हा संग्रह ‘अंधारवड’ सारखी एखादी कथा वगळता धगधगतं ग्रामीण विश्व उभं करतो. अनोखं ग्रामजीवन साकार करणारं हे बिनधास्त, बेधडक आणि भन्नाट लेखन वाचकाला चक्रावून सोडणारं आहे. अंधागची वर्तुळं अवतीभवती घेऊन दु:खभोग भोगणाऱ्या रासवट माणसांच्या या विश्वात स्त्रियांची संख्या अधिक आहे. यातील प्रत्येक नायिका अंतरात भळभळती जखम वागवूनच आयुष्याला सामोरी जाते. सटवीने दु:खभोगच त्यांच्या भाळी कोरला असला तरी प्रत्येकीच्या ‘दु:खाची तऱ्हा वेगळी आहे, आयुष्याची वाट वेगळी आहे. ‘रिवणावायली मुंगी’ या कथेत भेटणारी बिनधास्त, बेधडक तरुण मुलगी आपल्या प्राक्तनाची कथा खुल्लमखुल्ला सांगताना जे अनवट समाजदर्शन घडवते ते सुन्न करणारं आहे. आत्मभान आलेली ही बंडखोर नायिका माणूसपण हरवलेली जाती-व्यवस्था, स्त्रीला खेळणं समजणारी पुरुषप्रधान समाजरचना, अगतिकतेतून जन्मलेली देवदेवस्की, चळवळीतील भंपकपणा, इ. अपप्रवृत्तीविरुद्ध आक्रोश करते, पण ‘रामसीता फेम’ संस्कृती या मनस्विीनचं जगणं अशक्य करते. ‘तिच्या वळणाची गोष्ट’ मधील तुळसाबार्इंचं प्राक्तनही यापेक्षा वेगळं नाही. मराठ्याच्या लेकावळ्या जातीची सुविद्य तुळस मनस्वी आहे. अनेक पुरुष तिच्या आयुष्यात येतात, पण प्रत्येक ठिकाणी जात आड येते आणि प्रेमभंग होतो. बिनधास्त आणि मोकळ्या स्वभावाच्या या स्त्रीवर ‘वाईट चालीची’ म्हणून समाजाचा शिक्का बसतो आणि तिच्या आयुष्यापुढेही प्रश्नचिन्हं उभं राहतं. तुळसा प्रतिगामी समाजव्यवस्थेचीच बळी आहे. ‘घुमसट’ ही वेगळ्या प्रकारची कथा. रंगा-इंदू हे जोडपं आणि रंगाची विधवा बहीण दिवाणसाब अशा मोजक्याच पात्रांवर बेतलेली. दिवाणसाबचं, मनोविश्लेषणपर चित्रण हे या कथेचं बलस्थान. ‘झळ’ची नायिका लगमव्वा ही अस्सल गावरान बाज असलेली रसरशीत व्यक्तीरेखा. ही रांडमुंड बाई पोट जाळण्यासाठी दारू विकण्याचा धंदा करते. दारिद्र्य असलं तरी लगमव्वा स्वाभिमानी आहे. फुललेल्या इंगळांचा डंख, कोल्हापुरी मिरचीचा झणझणीतपणा तिच्या भाषेत आहे. लगमव्वाची भाषा गावरान भाषासौंदर्याचा अस्सल नमुना आहे. ‘दादा कोतोलीकर’ ही व्यक्तिचित्रणपर कथा आजच्या मूल्यहीन राजनीतीचं विदारक दर्शन घडविते. लब्धप्रतिष्ठित भंपक पुढाऱ्यांच्या दंभाचा आणि ढोंगाचा फुगा फोडणारी ही कथा उपरोध आणि उपहासपूर्ण शैलीचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. मुखवटे धारण करणारा चारित्र्यहीन ‘गांधीनंतरचा महात्मा’ आणि दादा कोतोलीकर यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकणारा कथेचा शेवट मन सुन्न करणारा आहे. अन्य कथांमध्ये ग्रामीण जीवनाचे वेगवेगळे पैलू चित्रित होतात. लोकापवादाने त्रस्त झालेला आणि कावळ्याच्या भयगंडाने पछाडलेला शिक्षक (एक होता कावळा), मंत्रतंत्राचा नादी दादा (उचकी), डोंगरावरच्या देवाला वाहिलेला म्हादबा (खांडूक), संपामुळे नोकरी सुटून गावी आलेला ऐदी पांडू (संप) अशा अनेक पुरुष व्यक्तिरेखा वाचकमनाला भिडतात, अंतर्मुख करतात. ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ ही विरोधलयतत्त्वावर बेतलेली कथा. रोज शेणामुतात आणि मातीत वावरणारी चिवट आणि काळजात आठवणीचं ‘गाठुडं’ घेऊन जगणाऱ्या गसवट माणसाचं हे विश्व राजन गवस यांच्या कथांना बावनकशीपणा आणून देतात. या माणसांच्या कथाव्यथा त्यांच्याच अस्सल गावरान भाषेत व्यक्त होतात आणि त्यांना खरीखुरी झळाळी येते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
130.00
समुदायाने जोडले
बंद