माझे शेल्फ
रंगांधळा
थरारक गूढकथा… रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा लेखनात वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. गूढकथा हा लेखन प्रकार घाऊक लेखनाचा नाही; त्यातील कल्पना साचेबंद होता कामा नयेत. त्यात प्रत्येक वेळी काहीतरी नावीन्य हवे याबद्दल ते जागरुक आहेत. मतकरंच्या या कथांमध्ये अतींर्दिय पातळीवरचे वैशिष्टपूर्ण अनुभव येतात. एखाद्या व्यक्तीच्या अकाली व अपघाती मृत्यूनंतर तिच्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी वा आधीच्या जन्मातील हिशेब वा सूड पूर्ण करण्यासाठी कोणातरी व्यक्तीच्याद्वारे पुन्हा अस्तित्व जाणवणे हा प्रकार मतकरींना बराच विश्वासार्ह वाटत असावा. त्याची वेगवेगळी रूपे त्यांनी अनेक कथांमध्ये दाखवलेली आहेत. ‘रंगांधळा’ मधील आरंभीचीच रंगांधळा हा कथा एका चित्रकाराच्या जीवनावर आहे. रंगनाथ महिंद्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मॉडर्न शैलीतला रंगाशी ताकदीने खेळणारा चित्रकार. त्याच्या चित्रांबद्दल आकर्षण असाणाऱ्या विज्ञानाची प्रध्यापिका असाणाऱ्या तरुणीला वाटते की त्याच्या चित्रातल्या रंगामध्ये एक जिवंतपणा आहे. चित्रात त्या रंगांना एक अपूर्व तेज चढल्यासारखे दिसायचे. त्या रंगांचे एकमेकांशी काही नाते आहे, त्यांची भाषा एकमेकांना समजते आहे. कॅनव्हासवर हा चित्रकार नुसते रंग चोपडीत नाही तर तो रंगांची एक नवी सुष्टी निर्माण करतो आहे असे तिच्या लक्षात येते. त्याच्या लँडस्कोपमध्ये देऊळ, झाड, पाणी, डोंगर यांच्याऐवजी नुसते रंग असत. ‘तुमची चित्रं मला आवडतात पण समजतात असं नाही. ती दृष्टीच मला नाही.’ तेव्हा रंगनाथ तिला आपल्या कलेचे एक गुपित सांगतो. ‘तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजेल... कुणाकडे तरी बोलावे असं खूप वाटायचं, पण ते समजू शकेल असं माणूसचं भेटलं नाही. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्करीक दृष्टी त्यात आहे. मला रंग दिसतात. इतरांना दिसतात तेवढेच नाहीत. तर फार वेगळे, फार मोठ्या प्रमाणावर दिसतात.... हे हलत असतात; श्वासोच्छ्वास करीत असतात. जिवंत असतात. नेहमीच्या जगातले रंग रेषांनी बांधलेले असतात. माझ्या चित्रातले रंग रेषांची बंधने सोडून बाहेर पडतात. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्रं काढता येत नाहीत. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनीच माझा ताबा घेतला. आणि तेव्हाच मॉर्डन आर्टिस्ट म्हणून माझा लौकिक वाढू लागला. आता मला रंगांवाचून वेगळं मीपण राहिललं नाही. आंधळ्याला काळोख दिसावा, तसा मला रंगाचा स्वत:भोवती पूर आलेला दिसतो. नुसते रंगच मला दिसतात. रेषा कमीत कमी दिसतात. एक प्रकारचा आंधळेपणा म्हणा हा! नुसती चित्रं काढतानाच नव्हे, एरव्हीसुद्धा मला रंगांखेरीज दुसरं काही दिसत नाही. कधी हर्ष होतो कधी भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंगांधळा होईल. काही बरंवाईट तू मला आवडतेस. मला समजेल असं वाटतंय म्हणून हे सर्व मी तुला सांगतो आहे. ...लँडस्केप पेंटिंगसाठी रंगनाथ तिला बरोबर घेऊन एका पहाडावर जातो. आकाशात मावळतीच्या वेळी सोनेरी छटा आवरतात. हे बघ लखलखत्या ज्वाला पाऊस, निळा सोनरी पाऊस, गोल्डन ब्ल्यू... धीस इज लाइफ, धीस इज ब्यूटी... करीत तो म्हणतो, ‘मी चाललो! रंगांकडे चाललो’ आणि कड्याच्या टोकावरून पुढे जात राहतो. दुसऱ्या दिवशी खालच्या दरीत त्याचे प्रेत मिळते. छिन्नविच्छिन्न देह. रक्ताचा शिडकावा होऊन लालकाळे पडलेले दगड... ....उजेडात रक्ताने माखलेले ते दगड बघताना तिला विचित्र अनुभव येतो. दगडावरचे वाळलेले ते काळे रक्त पुन्हा लाल होत आहे. आपल्या रोखाने रंगांची लाट चालून येत आहे असे तिला जाणवते. ती बेशुद्ध पडते. ...रात्री तिला आवाज येतो. ‘तू ऐकते आहे ना? इथं दाट काळोख आहे. मी त्या गुदमरतोय. मला रंग हवे आहेत. ‘मी तुझ्या नजरेतून आता रंग पाहीन.... आपल्यात एक नातं आहे. मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून..’ ती घाबरून किंचाळते, ‘नाही नाही... आपल्यात कसलंही नात नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस.’ ...पण तिला कळून चुकते, तो आपल्या नजरेत आला आहे. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला जाते. सर्वत्र रंगच रंग तिला जाणवतात. ती गॉगल घालते तरी रंग गर्दी करतात. ‘मी आलो आहे. असा आवाज येत राहतो. तो आता जाणार नाही. तो आपल्या डोळ्यात कायमचा राहणार. आपण रंगांधळी होणार रंगाची गुलाम होऊन सारे आयुष्य घालवावे लागणार. ती कॉलेजच्या प्रयोगशाळेत जाते. सारे धैर्य एकवटून डोळ्यात अॅसिडचेथेंब टाकते. तिची दृष्टी जाते. रंगांच्या त्या लाटांपासून दूर होते. नित्य काळोख तिला सुखाचा वाटतो. ‘या काळोखात रंगनाथाचा आत्मा तडफडत असेल, पण माझ्या डोळ्यांची दारे त्याला बंद केली आहेत.’ असे ती म्हणते. आता ही तिची कहाणी डेड एन्डला येऊन पोहचली आहे असे वाचक म्हणून आपल्याला वाटते. पण नाही. ही कहाणी इथे संपत नाही. एका पार्टीत ही दृष्टीहीन, गॉगल लावलेली तरुणी बघून कोणातरी तरुणाला तिच्याजवळ जावेसे वाटते.