माझे शेल्फ
सामान्यातले असामान्य
माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू... ‘सामान्यातले असामान्य’ या सुधा मूर्तीलिखित कथासंग्रहात उत्तर कर्नाटकातल्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत. कथांमधील व्यक्तींमध्ये अस्सल कर्नाटकी गुणधर्म असलेले कथांचे नायक-नायिका या कोणी असामान्य नाहीत. पण प्रत्येक माणसत काहीतरी चांगले-असामान्य असते. याच असामान्यत्वाचा शोध लेखिका घेते. असे करताना कधी विनोदी शैलीत व्यक्तिचित्रण केले आहे. उमा कुलकर्णींनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे उ. कर्नाटकी संस्कृतीचा व भाषेचा थाटच वेगळा आहे. प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. येथील माणसं वरवर ओबडधोबड वाटली तरी पारदर्शी आहेत. बोलण्यात, वागण्यात रोखठोकपणा जाणवला तरी भावनाशीलता व मृदुताही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य अधोरेखित होते. ‘बंडल बिंदप्पा’ या नावातच त्याच्या स्वभावाची कल्पना येते. वरवर जाणवणारा उद्धटपणा, पण आतून फणसासारखा गोड रसाळपणा हे कर्नाटकी वैशिष्ट्य बंडल बिंदप्पामध्ये पुरेपूर भरलंय. बिंदप्पाला बंडल या उपाधीची तमा नाही, राईचा पर्वत करणं हा त्याचा स्वभावधर्म. याचा फटका कित्येकांना बसूनही तो कोणाच्या क्रोधाचा बळी ठरत नाही. कारण त्याचं पराकोटीचं कन्नड प्रेम. कंडक्टर भीमण्णा एक अजब वल्ली. स्वत:च्या संसारापासून अलिप्त, सामान्य परिस्थितीतही सदा आनंदी असणारा भीमण्णा दिलदार आहे. त्यामुळे नोकरी गमवावी लागली तरी मूळ स्वभाव जात नाही. ‘जीवन म्हणजे मूळ कडुनिंबाचं मिश्रण. माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणे रंग भरायचे. किरकिरता जीवनाचा कुठलाही रुट सोडून पळून जात नाही.’ हे भीमण्णाचं तत्त्वज्ञान. अंगडी जयण्णा हा सामान्य पण दिलदार माणूस. अंगडी म्हणजे दुकान लहानपणापासून व्यापाराची आवड असणारा जयण्णा दुकान चालवतो. पण अव्यवहारीपणामुळे बुडितखाती जातो. अखेर आजोबा मळा विकून कर्जफेड करतात. याच्याविरुद्ध आहे चंतुर चामव्व. सामान्य रूप, सामान्य शिक्षण, सामान्य परिस्थितीतील चामव्वा व्यवहाराला चतुर व स्वार्थी. पैसा हेच सर्वस्व मानणारी चामव्वा सतत फायद्या-तोट्याचाच विचार करताना दिसते. प्रेम, ममता या शब्दांशी तिचा काहीही संबंध नाही. वरवर गोड बोलणारी चामव्वा आतून कडवटपणाने युक्त आहे. म्हणूनच कोंडीत पकडून श्रीमंत सासर पटकवते; इतकेच नव्हे तर दागिने, तिजोरी लंपास करते. संसाराच्या आर्थिक नाड्या हातात घेण्यात यशस्वी ठरते. असूया. तिचं नाव अनसक्का. ही स्त्री अत्यंत मत्सरी. कधीही कुणाच्याही चांगल्या गुणांचे कौतुक न करणारी वृत्ती. म्हणूनच वैभवात असूनही असमाधानी, अतृप्त. पण तिचा हा अवगुण झाकला जातो तो तिच्या एका गुणामुळे. कुणाच्याही, कुठल्याही अडचणीला धावून जाऊन मदत करण्याचामोठेपणा तिच्यात आहे. मुळात शहाणी असून स्वाभावाला चांगले वळण न लागल्याने स्वभावात आलेला विचित्रपणा आहे. गंगा एक सुंदर, कलाकुसर निपुण, वाचनाची आवड असणारी सुशिक्षित स्त्री. आपल्यातील या गुणांचा गर्व असलेली गंगा कुणात मिसळत नाही. इतरांवर टीका करणे, त्यांच्यातले न्यून शोधून तिरस्कार करणे, चेष्टा करणे हा स्वभावच बनून गेला. लग्नासाठी प्रत्येक मुलात काही तरी खोड काढण्याच्या सवयीमुळे अखेर लग्नापासून वंचित रहावे लागले. त्याचे पर्यवसान रागीटपणा, चिडचिड यात होते. स्त्रीला तडजोड करावी लागेल हे तिला वेळेवर न उमजल्याने आयुष्याची फरफट अटळ ठरते. अक्कमा स्वभावत:च परोपकारी. गावातल्या कोणासाठीही कोणत्याही प्रसंगी तिला वडीलकीच्या नात्याने बोलावले जाते. कोणत्याही अडचणीतून खंबीरपणे मार्ग काढू शकणारी अक्कमा निरपेक्ष वृ्तीने लोकांसाठी झटते. पण लोक तिला गृहीत धरतात. कोणत्याही स्वरूपात त्याची परतफेड करण्याचे भानही ठेवत नाहीत. ‘कोणी किती कृतज्ञता ठेवायची हे प्रत्येकाला त्याच्या आईनं जेवढं, जसं शिकवलं असेल त्यावर अवलंबून असतं. ती सगळ्यांना जगणारी गोष्ट नाही.’ हे अक्कमाचं तत्त्वज्ञान तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. बण्णभट्ट व पार्वती या विजोड जोडप्याचं वर्णन लेखिका नर्मविनोदी शैलीत करते. ‘नॉट मेड फॉर इच अदर’ अशी स्पर्धा आयोजित केली तर पहिला पुरस्कार मिळेल, पार्वती अत्यंत देखणी, हौशी, लिहा-वाचायची आवड, सिनेमाची आवड, स्वच्छतेची आवड असणारी, नटणारी चैत्रगौरीसारखी स्त्री. याउलट बण्णभट्ट तेलकट चेहरा, पुढे आलेलं पोट, जुनकट कपडे, पान खाऊन लाल झालेले, पुढे आलेले दात असं ध्यान. दोघांचे स्वभावही विरुद्ध रसिक पार्वतीला स्वप्नातला राजकुमार भेटलाच नाही. तिच्या इच्छा-आकांक्षा त्याला उमजल्याच नाहीत. तो अलिप्तसाच राहिला. पण पार्वतीच्या मृत्यूनंतर अगदी लवकरच बण्णभट्टही गेला. मनात तिच्याविषयी ओढ असूनही स्वभाववैशिष्ट्यामुळे त्याच्या भावना अव्यक्त राहिल्या. पण तिचं जाणं मात्र तो सहन करू शकला नाही. काही काही व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात.