माझे शेल्फ
शेलका साज
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! हा साज शेलका असल्याने त्यात सर्व प्रकारचा ऐवज आहे. किल्ले सुधागडावर कवी कुलेशाला संभाजी महाराज बोलावतात, उरभेट देतात आणि औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंडाचा प्रस्ताव घेऊन आला असताना त्याला संभाजी महाराज कसे रोखतात - त्याची कहाणी ‘किल्ले सुधागड’ यात सावंत सांगतात. रायगडच्या बालेकिल्ल्यातल्या खासे महालात श्री शिवाजीराजे अखेरच्या दुखण्यात कसे दिवस काढत होते याचे चित्रदर्शी वर्णन करून त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन सावंत घडवतात. ‘‘आरक्त देखिजे डोळा, ग्रासिले, सूर्यमंडळा सूर्यमंडळा, सूर्यमंडळा, जगदंबा! चैत्री पुनवेचा, हनुमान जयंतीचा सूर्य रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या ऐन माथ्यावर असताना महाराजांनी रायगडाच्या हनुमंतानी उड्डाणी झेप घेतली. सूर्यमंडळ कब्जा करण्यासाठी’’ असा भारावून टाकणारा शेवट सावंत करतात. ‘शिवभक्त सरलष्कर’ ही हकीकत आहे १६६५ सालची, औरंगजेबाच्या ब्रम्हपुरच्या छावणीतली. संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची. म्हसवडच्या नागोजीराव माने यांचा पुत्र सिधोजी याने संताजीबद्दल छत्रपती राजारामाचे मन कलुषित केले. त्यांनी धनाजी जाधवाला सरसेनापती पद दिले. आणि पुढे शिवपिंडीच्या पूजेत मग्न असलेल्या संताजीच्या मानेवर नागोजीने तलवारीने आघात करून त्याचा बळी घेतला. औरंगजेबाकडे ते शिर घेऊन जातो. तेथे येसूबाई संताजीचं शिर तबकात पाहून डोळ्यात अश्रू ढाळत म्हणतात, ‘‘सरलष्कर, तुम्ही खरे शिवभक्त. आजवर आम्हांस मुजरा केलात, आता या क्षणी आमचा मुजरा रुजू करून घ्या.’’ औरंगजेब मनात म्हणतो, ‘‘ऐसी एकभी बहू-बेटी-बेगम हमारे तैमूर खानदानमें क्यों नही पैदा होती? ये मुल्क कभी नही शिकस्त लेगा - जहाँ ऐसे सालार है - ऐसी मलिकाएं है। ऐसे शाहजादे है। तौबा! हम लौटेंगे लाल किले देहली या नही?’’ पुस्तकात सगळ्याच ऐतिहासिक कथा आहेत असे मात्र नाही. ‘शिवकालीन मावळा’ हा मावळ्याचे खाणे, पेहराव, जगणे, लढणे, याची माहिती देणारा लेख आहे. तर शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारा गूढरम्य मनफूल हा लेख आहे. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी रायगडावर चैत्री पुनवेला आगमन केले. चंद्र हा कल्पनाशक्तीचा कारक. शिवरायांच्या मनाचं फूलही त्या आकाशातल्या चंद्राच्या लाटांवर हेलकावे खात असावे असे सावंत सुचवतात. शिवरायांची तरल कल्पनाशक्ती अनेक प्रसंगात दिसते, तिचे चंद्रभावाच्या प्रभावाच्या रूपात सावंत स्पष्टीकरण - समर्थन करू पाहतात. संभाजीच्या मनाचे शल्यही मांडतात. शिवराजांना चाणक्य नीती ज्ञात होती. चाणक्यासारखा कोणी त्यांना भेटला असता तर महाराष्ट्रात एक नवे पर्व सुरू झाले असते असे सावंतांना वाटते. चाणक्याची अर्थशास्त्रीय बुद्धिमत्ता आणि शिवरायांची सर्वसामान्यांबद्दलची राजस कणव यांची सांगड पडली असती तर दुग्धशर्करा योगच या देशातील समाजपुरुषाने चाखला असता. शिवरायांचा प्रधान अण्णाजी दत्तो याचा तो वकूब नव्हता; अण्णाजीने जमीनधारा पद्धत जमिनीची प्रत बघून सरकारी धारा वसूल करणे ही वापरली; त्याऐवजी प्रत्येक किल्ला धनधान्याने समृद्ध करावा व गवतकाडीने बंदिस्त करावा, शेतकऱ्याला जमिनीचा कस वाढवायला सहाय्य करावे - उत्पादनक्षमता वाढवावी - असा शिवरायांचा मानस होता. पण अण्णाजीला तो विचार प्रत्यक्षात आणता आला नाही असे सावंतांचे प्रतिपादन आहे. अण्णाजी दत्तो याला ते महाराष्ट्रातील शेतीच्या दुरावस्थेबद्दल जबाबदार धरतात. कामगार नेते मनोहर कोतवाल, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अस्पृश्यांचा आधारवड राजर्षी शाहू महाराज यांच्यावरचेही लेख या संग्रहात आहेत. एका वाचकाने कसा गंडा घातला याचा किस्सा ‘चलाख’मध्ये आला आहे. ऐतिहासिक ललित लेखन - एक विचार, मी आणि कविता हे दोन लेख साहित्यविषयक चिंतन प्रकट करतात, तर शेवटी ‘तू नसतीस तर’ ही कविता आईबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबून निथळणारी आहे. ‘‘जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला देणारी, केवळ तूच’’ असे म्हणून ‘‘तू केवळ एक व्यक्ती किंवा जीव नसून’’, तू एक जीवनतत्त्व व जीवनसत्य आहेस असे सावंत म्हणतात.तू आहेस एक अतितापासून ते अनागतापर्यंतचे एक जीवनतत्त्व, एक जीवनसत्य. ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते आई!’’ सावंतांचा हा ‘कोल्हापुरी’ शेलका साज भरजरी आहे; भव्य आहे; आणि भारावून टाकणाराही आहे.