मुखपृष्ठ
शेवटची लढाई

माझे शेल्फ

शेवटची लढाई

इंग्रजी शीर्षक
Shevatchi Ladhai
सारांश

‘शेवटची लढाई’ हा यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत अनेक प्रकारच्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत, त्यांच्यावर प्रखर प्रकाशझोत प्रस्तुत पुस्तकात विनो आणि उपहास, उपरोध यांच्या अंगांनी यादवांनी टाकलेला दिसतो. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’, ‘महाराजांचा वाढदिवस’, ‘वाघिणीची धार काढणारा गवळी’ अशा या संग्रहातील कथा निखळ विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या आहेत. भ्रष्ट समाजजीवन, स्वार्थी, मतलबी राजकारण, संधिसाधू, हपापलेला शासकीय नोकरवर्ग आणि दारूत बुडालेला सामान्य माणूस या कथांतील विनोदाचा विषय झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील गावातील बदलते राजकारण आणि समाजकारण, संधिसाधू लोकांनी साधलेला स्वत:चा स्वार्थ आणि भ्रष्ट राजकारणी मंडळी या बाबी या कथांत उपरोध आणि उपहासाच्या रूपाने व्यक्त होतात. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’ या कथेत बदलत्या आर्थिक परिस्थितीची, समाजकारणाची, औद्योगिक संस्कृतीची दिशा ओळखून भिक्षुकी पेशात कालानुरूप चातुर्याने परिवर्तन करणाऱ्या बेरक्या गोपाळजींची व्यक्तिरेखा साकार होते, तर वाघिणीचे दूध काढणारा शिवा गवळी एका रात्रीत एकदम ‘हिरो’ बनतो,याही कथेत इतिहास आणि दंतकथा यांची सरमिसळ उपरोधाच्या स्पर्शाने जिवंत झाली आहे. महाराजांचा वाढदिवस मावळ तालुक्यांतल्या त्यांच्या गावकीतल्या मंडळींना ‘धाडदिवस’ कसा वाटतो, याचे मिस्किल चित्र या कथेत उभे राहते. ‘पीळ’ आणि ‘शिवरामाचे आरसे’ या कथा गांभीर्याकडे झुकणाऱ्या आहेत. ‘पीळ’ मधून जुन्या सरंजामशाहीचे अभिमानी पंत, जुन्या मानसन्मानाच्या निष्ठा उराशी बाळगून स्वत:च्या मनस्वीपणाचे ताठ कंगोरे कसे उभे करतात, याचा उल्लेख यादव करतात, तर ‘शिवरामाचे आरसे’ या कथेत साहित्यनिर्मितीच्या प्रवासालाच लेखकाने स्पर्श केला आहे, असे वाटते. ‘खरं’ तर वरवर सरळ दिसणारे आत वाकडेच असतात, हे भेदक सत्य लेखकाला अनेक वर्षांनी गावी गेल्यावर शिवरामाला भेटताना गवसते आणि शिवराम हाही एक आरसा आहे. त्याच्या मनाची सहा रूपं म्हणजे सहा आरसे अशा निष्कर्षापर्यंत यादव येतात. रजिस्टार साहेबांची पत्नी यात श्रीमंत उच्चभ्रू स्त्रियांच्या उथळ नटवेपणाचे प्रतिबिंब आहे, तर ‘शेवटची लढाई’मध्ये पुराणकथेचा वापर वास्तवजीवनातील राजकारणी जगातील मुर्खता व दांभिकता अधोरेखित करण्यासाठी यादवांनी चांगला केला आहे. लेखक यादवांचीच दोन भिन्न प्रतिबिंबचे या कलाकृतींमध्ये लक्षणीय रीतीने उमटली आहेत. गंभीर प्रकृतीच्या कादंबरीमध्ये कलावादाची, वाङ्मयचौर्याची, एकूण कलाव्यवहाराची परखड चिकित्सा करणारे तटस्थ यादव या कथांमध्ये प्रसन्न विनोदाचा निर्मळ शिडकावा करतात,ही त्यांच्या लेखन व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद