मुखपृष्ठ
संवादिनी

माझे शेल्फ

संवादिनी

इंग्रजी शीर्षक
Sanvadini
सारांश

देखण्या, बोलक्या कथांची ‘संवादिनी’... ‘संवादिनी’ हा वसंत पुरुषोत्तम काळे यांचा कथासंग्रह. या संग्रहातील सर्व कथा पूर्वी निरनिराळ्या मासिकांतून येऊन गेलेल्या आहेत. पण त्याच कथांवर त्यांनी नवा प्रयोग केला. फक्त संवाद माध्यमातून ह्या कथा लिहिल्या आहेत.याचं कारण देतांना लेखक सांगतात की ‘मनांतले विचार व्यक्त करताना आपण संवाद वापरतो आणि घडून गेलेली घटना सांगतानाही आपण संवादच वापरतो. समोरच्या माणसाला रोखण्याचा प्रयत्न होतो तो संवादातूनच, म्हणून संवादच वापरून कथा लिहिण्याचा प्रयत्न. एखादी रुपवती स्त्री एकदाच दागिना घालून कशी सुरेख दिसते. तसंच झालंय इथे. मुळांत निवडलेल्या कथा उत्तम, आणि संवाद हे माध्यम. एखाद्या तन्मणीसारखे शोभले आहे, अत्यंत संतोषाची गोष्ट म्हणजे हा प्रयोग शंभर टक्के सफल झाला आहे. केवळ संवादांतून मनोव्यथा, मनोविश्लेषण, वातावरणनिर्मिती हे साधले आहे आणि सर्व कथा मनांवर ठसून जातात. सर्व कथांचे विषय निरनिराळे आहेत. पण ते आपल्या नेहमीच्याच जीवनांतील असल्याने आपण चटकन त्यांत शिरतो. लेखकाचे काही विचार नि:संशय धाडसी आहेत. पण व्यवहारीही आहेत असे विचार वरचेवर बोलून दाखवले गेले पाहिजेत म्हणजे ते मवाळ होतील, त्यांतील लाज वाटणारी भयकथा निघून जाईल. ‘निरंजन, मला उत्तर हवय् या कथेत पत्नीपासून मूल होणार नाही म्हणून दु:खी झालेल्या पत्नीला पति ट्यूबबेबीचा प्रयोग करण्याचीसंधि देतो, नव्हे तशी इच्छा व्यक्त करतो. पहिल्यांदा ह्याला नकार देणारी. त्याची पत्नी आपल्या प्रथम प्रियकरांपासून हवे ते मिळवते. पण माणसाच्या त्यागाची, मोठ्या मनाची कल्पना असलेला तो प्रियकर तिला ब्लॅकमेल करून तिच्या कडून पैसा उकळण्याचे ठरवतो. पण हा पति श्रीधर उलटेच करतो. त्यांचे पितृवात्सल्य हेलावते. आणि मग पत्नी प्रियकराला विचारते, ‘निरंजन, मला उत्तर हवय्, आता तू काय ठरवलस्’’ फार मोठ्या मनाचा माणूस पाहिजे ह्याला. पण असे झाले तर काही चांगले, दुष्ट लागण्यासारखे संसार तरीच देखणे राहतील. काळ्यांच्या संवादांत अत्यंत घरगुतीपणा आहे. आहे त्याच संसारात माणूस किती सुखी होऊ शकतो. पण समज नसते काही वेळा, काही वेळा परिस्थिती माणसाला सुख् लाभू देत नाही. ‘धरलं तर चावतं’ ह्या कथेत दोघही नवराबायको मिळवती, आर्थिक स्वास्थ्य भरपूर– ह्या सदैव नोकरीसाठी बाहेर असणाऱ्या स्त्रीला तिच्या स्वत:च्याच मुलांच्या मनांत अजिबात स्थान नसते. तिच्यावाचून त्यांचं काहीही अडत नाही. हे मोठे दु:ख परिस्थितीने निर्माण केले आहे. ‘‘शिक्षण घेतलेल्या बायका प्रकाशासारख्या पसरल्या त्या जिथे तिथे शिरल्या त्यांना आता पुन्हा घराकडे कसे वळवायचे हे सांगता येणार नाही. गंमत म्हणजे जे प्रश्न निर्माण झाले ते माणसाच्या चांगुलपणातून त्यामुळे दोषही देतां येत नाही.’’ विनोदाचा झरा काळ्यांच्या कथेत एक विनोदाचा झुळझुळता झरा असतो. तो कलावृत्तीसारखा चमकतो. त्यामुळे ह्या कथा जिवंत आहेत. कथा जणू नागाने वेटोळे सोडावं तशा सरसर उलगडत जातात. निवेदन नाही, वर्णन नाही हे जाणवत नाही. ‘आत्मानस्तु कामाय’ ही कथा सर्वांत उजवी आहे. एका स्वाभिमानी परंतु तितक्याच हळव्या, प्रेमळ नार्वेकरची ही कथा. मुलाप्रमाणे त्याला वाढवले, प्रेम केले शिकवले, तोच मुलगा, त्यांच्याच ऑफिसातील कलांतराने नार्वेकरांचा बॉस म्हणून त्यांच्याच ऑफिसांत येतो. बॉसने बॉससारखेच वागले पाहिजे. त्याच्या गुणांवर तो बॉस झाला आहे. त्याने माझ्यापुढे नग्न होता कामा नये. असे नार्वेकरांचं म्हणणे. पण वर्तकांवर फार उपकाराचं ओझ असतं. दोघांची अतिशय कुतरओढ, नार्वेकर स्वत:च्या नोकरीचा राजीनामा देतात. पण नंतरच्या काळात बायकोबाबत त्यांची फार फसगत होते. फार वाईट अनुभव येतो. केवळ शब्दांची सहानुभूती तर राहोच, पण नार्वेकर वैवाहिक सुखालासुद्धा बायकोच्या दृष्टीकोनांतून अपात्र ठरतात. हा अपमान सहनशीलपलीकडचा असतो. नार्वेकर म्हणतात, प्रेमात पडण्याचा जसा एकच क्षण असतो. तसा एकाबद्दल उबग आणावलाही एकच क्षण पुरतो.’’ अशा तऱ्हेच्या या कथा आहेत. दिवस उद्याचा भविष्याबद्दल सतत काळजी करणारा, विचारणारा नवरा आणि आजचं सुख आज मिळवावं, उद्याचं दु:ख पाहून आज कशाला दु:खी व्हायचं’ अशा विचाराची बायको ह्यांची ही कथा. चार चाकाच्या वाहानांपासून भय असे भविष्य आणि अखेर खेळण्यातल्या मोटारीवर पाय पडून घरात होणारा अपघात हा शेवट सुंदर आहे. ‘नव्या युगातले शोध हे कल्पवृक्षासारखे आहेत, आपण त्याचा डोळसपणाने स्वीकार करायला हवा’’ हा विचार कृतीत आणण्याजोगा आहे. ‘‘एकदां, बायको रागावली प्रथम, तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकांत गेली. ती मस्तकांतच राहिली. अशी काही वाक्ये आपल्याला खुदकन् हंसायलाच लावतात. एकदम देखण्या व बोलक्या कथांची ही ‘संवादिनी’ सर्वांना प्रिय होईल अशी खात्री द्यायला हरकत नाही.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
90
भाषा
मराठी
किंमत
70.00
समुदायाने जोडले
बंद