मुखपृष्ठ
स्पीडपोस्ट

माझे शेल्फ

स्पीडपोस्ट

इंग्रजी शीर्षक
Speedpost
सारांश

तरुणांपासून प्रौढांपर्यंत साधलेला संवाद... शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला होता. त्यांनीच शोभा डे यांच्या ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचाही अनुवाद केला आहे. या पत्ररूपी पुस्तकाचं वेगळेपण यात आहे की मुलांना द्देशून लिहिलेल्या या पत्रातील संवाद तरुणांपासून प्रौढांपर्यंत साऱ्यांशीच साधतो. खरं म्हणजे ई-मेलच्या जमान्यात पत्रं हा कालबाह्य प्रकार ठरला आहे. तरीही ‘स्पीड पोस्ट’नं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ‘स्पीड पोस्ट’मधली सहा मुलांची ममा ही जगातल्या कोणत्याही मातेची प्रतिमा. आपल्या काळजाच्या तुकड्यांवर अपार मायेचा वर्षाव करणारी, प्रेमळ कधी तितकीच कठोर, तर कधी काळजीनं हळवी होणारी आई आपल्याशी जवळीक साधते. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावरील तरुणाईपुढील आव्हानं, स्पर्धा, बदलती जीवनमूल्यं, अर्थसत्तेचं अनिर्बंध प्राबल्य यामुळे अवघे आयुष्य ढवळून निघत आहे. त्यातच नातेसंबंधांना हादरे बसत आहेत. या साऱ्याला सामोरे जाताना तरुणाई कधी गोंधळलेली, कधी भरकटलेली होऊ शकते. कोवळ्या वयातील त्यांच्या विश्वाशी सुसंवाद साधण्याचा, त्यांचं आधुनिक बदलतं, अपरिहार्य जग समजून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न या पुस्तकात केला गेलाय. मुलांशी संवाद साधताना कुठेही छडी उगारलेली दिसत नाही. प्रसंगी समज दिली गेली असेल, पण चुकलेलं कोकरू उबदार घरट्याच्या वाटेवर परतेल असा विश्वास यात व्यक्त होतो. त्यांची उच्चभ्रू जीवनशैली, अत्यंत व्यस्त आयुष्य, धावपळ, मन अस्वस्थ करणाऱ्या आयुष्यात घडलेल्या अनेक कडू-गोड घटना त्यातूनही कुटंबाशी असलेलं घट्ट नातं हे ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी’ असंच. कुटुंबात पहिल्या पतीची, दुसऱ्या पतीची मुलं अशी. अपरिपक्व वयातील मुलांशी संवाद, आपुलकी साधणं, सर्वांनाच आपलं घर वाटणं यात ममाची स्त्रीची भूमिका महत्त्वाची. ही कसरत करताना आलेले अनुभव, प्रसंग, मनाची होणारी घालमेल पत्रांतून व्यक्त होत राहते. पुस्तकातील असंख्य पत्रांत विविध विषयांवर चर्चा आहे. कौटुंबिक चौकट, परस्पर नातेसंबंध, संस्कृती, नीतिमूल्यांचा आग्रह, तर दुसरीकडे आधुनिक जगाचं अनिवार आकर्षण असलेली जीवनशैली पार्ट्या, इंटरनेट चॅटिंग, तासन्तास चालणारे टेलिफोन कॉल्स, स्पर्धा, आव्हानं, प्रलोभनं अशा सर्वस्पर्शी पत्रांचा खजिना मनाला स्पर्शून जातो. या पत्रांचा सूर केवळ उपदेशाचा, काळजीचा आग्रहाचा नाही. लेखिकेनं आपलं मनही अत्यंत दिलदारपणे उलगडलंय. मागे वळून बघताना नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुलीही आहे. आधुनिक जगात वावरताना आपली मुलं विचारपूर्वक निर्णय घेतील. नातेसंबंधांना हादरे बसणार नाहीत, मोठा मुलगा वडीलकीच्या नात्याने कुटुंबाचे बंध सैल होऊ देणार नाही असा सार्थ विश्वास त्या व्यक्त करतात. पत्रातील भाषेचा डौल काही वेळा सेलिब्रिटी टच वाटला तरी तो भावस्पर्शी, हळुवार मनाचा उद्गार आहे हे जाणवतं. काही पत्रांचा शेवट मात्र अगदी काळीज ओतल्यासारखा. ‘सदैव काळजी आणि संशयात बुडालेली तुमची ममा.’ असा आपल्या दोन मुलांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रातील हा तुकडा ‘तुम्ही किती बदल्या मिळवता किती पैसा अगर पुरस्कार मिळवता याच्याशी मला देणं-घेणं नाही. तर मग मी चुकूनसुद्धा तुमच्या पायात पाय अडकवायला मध्ये मध्ये येणार नाही. ‘प्रॉमिस!’ प्रस्तुत पुस्तकातील हा संवाद कोणत्याही संवेदनशील जागरूक पालकाच्या व पाल्याच्याही काळजाला हात घालणारा, त्यांचं अंत:करण उलगडून दर्शविणारा एकमेकांवरच्या विश्वासानं, मायेनं एकमेकांशी घट्ट बंध असलेलं हे कुटुंब वर्षाच्या सरत्या रात्री उगवत्या वर्षाच्या स्वागतासाठी एकमेकांसोबत सज्ज असतं. तो क्षण एकमेकांच्या मिठीत पाणावलेल्या नेत्रांनी साजरा होता. वाचकांनाही पत्रांप्रमाणेच हा क्षणही मुठीत धरून ठेवावासा, हृदयात साठवून ठेवावासा वाटतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद