मुखपृष्ठ
शुक्रचांदणी

माझे शेल्फ

शुक्रचांदणी

इंग्रजी शीर्षक
Shukrachandani
सारांश

ठसठशीत नायिका आणि त्यांच्या जीवनातील मूल्यसंघर्ष चितारणाऱ्या चित्तरकथा... माधवी देसाई यांच्या अकरा कथांचा समावेश शुक्रचांदणी या पुस्तकात करण्यात आला आहे. हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ठसठशीत नायिकांच्या व्यक्तिरेखा हे कथांचे वैशिष्ट्य. अधांतर या थेची नायिका आहे एक महिला पोलीस इन्स्पेक्टर. नीलांबरी. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यातील हवालदार रावराणे यांची एकुलती एक कन्या नीलांबरी. वडिलांप्रमाणेच थोराड, धिप्पाड, काळीसावळी. ती बी.ए. झाल्यावर पोलीस इन्स्पेक्टर होण्याचे ठरवते. प्रशिक्षण काळात खाकी युनिफॉर्म आणि इतरांवर अधिकार गाजवण्याची ईर्षा यांचा संचार जणू तिच्या अंगात होतो. डिस्टिंक्शन घेऊन ती ग्रुपमध्ये पहिली येते. हवालदार बापाला अस्मान ठेंगणे होते. ठाणे जिल्ह्यातील एका महिला पोलीस स्टेशनवर तिची नेमणूक होते. हाताखालच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवते. गुन्हेगारांना ती कर्दनकाळ वाटते. त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढायचे काम मात्र ती असिस्टंटवर सोपवते. लग्नाचा बेत ती लांबणीवर टाकत राहते. तिचे वडील घोकत राहतात.``लेकीचं लगीन? चिल्लर गोष्ट. आधी डी.वाय.एस.पी. तर होऊ द्या.`` आई सुमन मात्र तिला सांगत राहते,``लग्न करून टाक पोरी. हे असं राहणं खरं नव्हे.`` एकदा चोरीच्या आरोपावरून एका आदिवासी कुटुंबातील चौघांना पकडून आणले जाते. ``माय, पोरं घरी उपाशी. जन्मात कधी चोरी केली न्हाय. तू बाईमाणूस दया कर. सोडून दे. ही लछमी पोटुशी हाय. बायामान्स आम्ही.`` त्या आदिवासीपैंकी म्हातारी गयावया करीत होती. पण नीलांबरीचा पोलिसी खाक्या. ``बायामाणसं? एवढं का कौतुक ह्या बाईपणाचं? कुणासाठी? चोरा करताना कुठे गेलं होतं बाईपण? घरी पोरं आहेत? आणि ही पोटुशी. हाच खरा उपयोग बाईपणाचा? की आणखीही काही?`` असं म्हणत ती कातडी पट्ट्याचे वार त्या दोन बायांवर सपासप करत राहते. म्हातारी खाली कोसळते. सुनेची साडी रक्तानं माखते. नीलांबरीचे असिस्टंट सांगतात,``मॅडम, आवरा स्वत:ला हे महिला पोलीस ठाणे आहे... आदिवासी... काही झालं तर पेपरवाले आणि सोशल वर्कर तुटून पडतील.`` त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असते. पण अंगावर वळ. कायद्याने गुन्हा . लछमी दम सोडते. ...पहाटे पहाटेच तिच्या बरोबरच कोर्सला असणारा आणि जवळच्याच पोलीस ठाण्यावर इन्स्पेक्टर असलेला जगताप आपल्या पत्नीबरोबर येतो आणि सांगतो,``मॅडम, लछमी, तिची सासू आमच्याच बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये राहतात. गरीब माणसं. चोरी करणंच शक्य नाही. त्यांना जामीनावर सोडा...`` -आणि नीलांबरी म्हणते.``लछमी? शी इज नो मोअर. मी मारलं तिला. नाऊ मिस्टर जगताप, अॅरेस्ट मी.`` अशी नाट्यपूर्ण तरीही भावस्पर्शी कथानकाची गुंफण करण्यात कथाकार माधवी देसाई तरबेज आहेत. हवालदार महत्त्वाकांक्षी बाप, त्याची तशीच अधिकार गाजविणारी लाडकी लेक, पोलिसी खाक्याचा अभिमान, अहंकार, स्त्री म्हणून सहकाऱ्याने डिवचणे, त्याचा राग गरीब आदिवासी स्त्रीवर काढणे, मारहाणीनं त्या स्त्रीचा मृत्यू घडणे. त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याची असिस्टंटची सूचना धुडकावून लावणे, आणि ते आदिवासी कुटुंब नेमके त्या परिचीत सहकारी पोलीस इन्स्पेक्टरच्या आऊटहाऊसमध्ये राहणारे निघणे आणि त्यानेच जामीनासाठी नीलांबरीकडे येणे -असे सगळे आदर्शवादी धागेदोरे गुंफत आपल्या मेलोड्रामिक कथावस्तूची रंगत वाढवत नेणे ही माधवी देसाई यांची हातोटी वाचकांच्या परिचयाची आहे. घराण्याचा अभिमान आणि कलावंताचे उत्तरदायित्व यांच्यातील संघर्ष शुक्रचांदणी या कथेत दिसतो. राजगढचे राजगायक रहेमखां आपल्या तिन्ही मुलांना गायनवादनाचे धडे देतात. त्यातल्या अमिनकडे ते भावी राजगायक म्हणून बघत असतात. अठरा वर्षांच्या प्रदीर्घ तपश्यर्येनंतर रहेमखां या मुलाला सांगतात,``बेटा, माझ्या गुरूनं मला दिलेला संगीताचा खजिना तुझ्या हाती देऊन आज मी गुरु ऋणातून मुक्त झालोय. ही उत्तरेच्या संगीताची कावड तू दक्षिणेत पसरू दे. या घराण्याचा वारसा टिकवेल असा एखादा शागीर्द तयार कर.`` अमिनखां मुंबईत येऊन संगीतक्षेत्रात आपले बस्तान बसवण्यासाठी खूप परिश्रम घेतात. शिकवण्या घेतात. छोट्यामोठ्या बैठकी करतात. त्यांची कन्या गुलबदन जेव्हा त्यांच्याच गायकीची झलक दाखवते तेव्हा मात्र ते संतापतात,``खबरदार, पुन्हा तानपुऱ्याला हात लावशील तर...तानपुरा खांद्यावर ठेवून गायला तू कोणा कोठीवालीची मुलगी नाहीस. या घरच्या मुलींनी असं गाताना कुणी ऐकलंय? तो रिवाज नाही या घरचा`` ते तिचं लग्न आपला आवडता शिष्य दिलावर याच्याशी लावून देतात...काही वर्षे जातात. दिलावर कात्यायनीच्या कोठीवर दिवसेंदिवस राहू लागतो; गुलबदनशी प्रतारणा, गुरूशी प्रतारणा, गाण्याशी प्रतारणा -अमिनखां संतप्त होतात. आपल्या घराण्याच्या गायकीचा वारस कोण या प्रश्नाने अस्वस्थ होतात; आणि एक दिवस कन्या गुलबदनला म्हणतात, ``ये बेटी बैस, तो तानपुरा घेऊन षड्ज लाव...

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद