माझे शेल्फ
वलय
माणसाला चमत्कृतीची एक उपजतच आवड असते. वाचकाला, तशीच लेखकालाही ती असल्यास नवल नाही. व. पु. काळ्यांना ती तशी आहे. नुसती आहे नाही, विशेष आहे. ‘वलय’ हा त्यांचा नवा कथासंग्रह याचाच आणखी एक पुरावा. कुठल्याही लेखकाचा मूळ उद्देश अखेरमाणसं शोधायचा असतो. ही माणसं जगाच्या अवाढव्य पसाऱ्यांत, व्यापात हरवलेली असतात, त्यांतली काही लपून बसलेली असतात. त्यांना शोधताना तो कथानकाचा आधार घेतो. म्हणजे कथानक जुळवणं आलं. हे कथानक जुळविण्यासाठी काळे बहुश: चमत्कृतींचा आधार घेतात. ही माणसंही काहीशी तशीच चमत्कारिक. जगातलीच असूनही जगावेगळी. शहाणी, मूर्ख, व्यवहारी, स्वप्नवेडी–अनेक तऱ्हेची माणसं. अशी माणसं असतात का? याचं उत्तर फक्त ‘असू शकतात’एवढंच द्यावं लागेल. त्यांना समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवांतून जायला हवं. हे अनुभव म्हणजेच या बारा कथा. ऑफिसला न जाता नेहमीच ऑफिसच्या वेळी बाहेर पडून संध्याकाळी परतणारी, सदैव ऑफिसच्याच गप्पा मारणारी मृणालिनी म्हणायची की ‘स्वप्न वेडी?’ ते वेडच खरं पण त्याची छटा चटका लावणारी. टी. बी. झालेल्या मुलीशी लग्न करून तिच्यासाठी आपलं जीवन वाहून टाकणारा, पण ती आजारी आहे म्हणून फक्त तिच्या गालाचंच चुंबन घेणारा दिना काही सामान्य मनुष्य नाही. ‘अर्ध्यावर विरलेलं’ हे गीत म्हणूनच न संपणारं ठरतं. ‘सुख विकणे आहे’ ही अशीच आणखी एक चमत्कृतीजन्य कथा. सुख विकण्याचं दुकान ही कल्पनाच जगावेगळी. इतरांना सुखाचा शोध देताना स्वत:चं सुख न समजलेल्या, किंवा गमावून बसलेल्या माणसांची ही कथा शेवटी मेलोड्रॅमॅटिक असली तरी त्याही मागचं तत्त्वज्ञान काही काळ विचार करायला लावील. ‘लाट’ची नायिका, तिची विभूतीपूजा, भक्ती सारंच काही नवलाईचं. व्यक्तिरेखेची उंची हीमालयापेक्षाही वाढविणारं! आधुनिक वातावरणात स्त्री-पुरुष अनेक क्षेत्रांत एकत्र येतात. त्यांच्यात नसलेले संबंध जोडले जातात. कुत्सित नवरा नाही ते अर्थ काढतात. अशाच एका नाटकात काम करणाऱ्या एका स्त्रीच्या पतीला तिच्याविषयी इषारा देण्याचा उच्च (?) हेतूनं भेटतो. त्या पतीनं दाखविलेली तटस्थता, धुडकावून लावलेली त्याची सूचना ऐकून प्रथम धक्काच बसतोच पण पति-पत्नीमधील नात्याचा विश्वास, त्या नात्याचा अर्थ कळल्यावर ती व्यक्तिरेखा प्रभावी ठरते. त्याला शहाणपण सांगायला गेलेला गृहस्थ म्हणजे पर्यायायानं तुम्ही-आम्हीच कोता ठरतो. ‘नर-मादी’ मधील वकीलसाहेब मोठे ठरतात. त्या मानानं ‘हातमोजा’, ‘शेखर वर्गात बसला आहे’ या कथा या संग्रहात न बसणाऱ्या वाटतात. ‘हातमोजा’वर मानसशास्त्राची थोडी झाक असली तरी तो एक रहस्यकथेचाच प्रकार वाटतो. त्यातही चमत्कृती आहेच. ‘शेखर वर्गात बसला आहे’ ही कथा एखाद्या स्त्रियांच्या मासिकात शोभून दिसणारी, ‘वलय’ कथासंग्रहातली ती तशी नव्हे. लांब, पल्लेदार वाक्यांनी भाषेला जसा जोर येतो, तसा छोट्या, तुटक वाक्यांनीही आणता येतो. काळ्यांची भाषा दुसऱ्या प्रकारची. वर्णनावर त्यांचा भर नाही. संवादांतून निवेदनावर अधिक भर. तत्त्वज्ञानही ते कमीत कमी शब्दांत सांगतात. वाचकांनही बरंच समजून घ्यायचं असतं. ते काम काळे वाचकांवरच सोपवतात. वाचकाला म्हणूनच भरपूर खाद्य मिळतं नि त्यांच्या कथा वाचकांच्या डोक्यात सदैव घोळत राहतात.