माझे शेल्फ
युगंधर
श्रीकृष्ण...... भारतीय मनांवर गेली तब्बल पाच हजार वर्षे आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक अन सांस्कृतीक राज्य करणारा एक महतज्ञानी. आपल्या अस्तित्वाने जगभरातील मानव जातीला आत्मिक सुखाचं परमोच्च सुख देणारा युगपुरुष. आपल्या कर्तुत्वाने नारायणपदाला पोहोचलेल्या या नारायणाची जीवनगाथा शब्दांत मांडणे म्हणजे सूर्यभास्कराला कवेत घेण्याचा प्रकार, ज्यात कर्ता भस्मसात व्हावयाचा. पण तरीही महाभारत कालीन व्यक्तिचित्रणात सर्वात उच्च स्थानी विराजमान असलेल्या या राजकुशल सेनानीची यशोगाथा सर्वसामान्य श्रीकृष्ण प्रेमींपुढे आणण्याचे महत्कार्य करणे गरजेचेच..... आपल्या वैविध्यपूर्ण कादंबरीमय लेखनाने वाचन प्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या शब्दगंधर्व श्री शिवाजी सावंत सरांनी उभा केलेला श्रीकृष्ण शब्दांच्या दुनियेतील कसदार सोनं म्हणावं इतके लाघवी...... इतरांच्या घरामधल्या शिंकाळ्यातील तूप लोणी चोरून खाऊन गोपिकांच्या मागे त्यांची थट्टा करत कृष्णलीला करणारा माधव तर आपल्या मस्तिष्कात आहेच. पण हाती सुदर्शन घेऊन समरांगणात उतरलेला विरोत्तम श्रीकृष्ण मात्र काहीसा बाजुलाच राहिला. शंभर अपराध माफ़ करून एकशे एक अपराध होताच शिशुपालचा वध करणारा कठोर श्रीकृष्ण आपण केव्हा आत्मसात केलाच नाही. या द्वाराकाधिशाला आठ पत्नी, ऐंशी पुत्र, चार कन्या अन नरकासुराच्या कैदेतून सोडवलेल्या सोळा सहस्त्र अबलांचं स्वामित्व पत्करलेल्या हा पालनकर्त्याला समजून घ्यायचे असेल तर समग्र श्रीकृष्ण चरित्राचा अभ्यासास पर्याय नाही........ शिवाजी सावंत सरांनी कादंबरी स्वरुपात उभारलेला आणि प्रचंड संदर्भाची रास ओतून साकारलेला सर्वव्यापी श्रीकृष्ण म्हणूनच आपल्याला अधिक जवळचा वाटतो. तसे तर या प्रातःचरणी वंदनीय व्यक्तिमत्वाचं चरित्र आजन्म अभ्यासले तरीही न संपणारे. पण सावंत सरांनी आपल्या शब्दप्रभुत्वाच्या जोरावर हजारभर पानांत आपल्याला हा नायक मोठ्या खुबीने समजावून दिला आहे...... प्रत्येकाने वाचावी अन संग्रही ठेवावी अशी एक अजोड़ कलाकृती........
जीवन म्हणजे काय हे कळलेले , निर्णयक्षम , अवघड परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणारे , जीवनात वासनेला अती महत्त्व न देता , धैर्याच्या मार्गाने चालणारे , संयमी , विचारी , प्रेमाचा वेगळा अर्थ उमजलेले , समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श असणारे , अशा व्यक्तींचा कच हा प्रतिनिधी आहे. भरकटलेले , जीवन सीमित समजणारे , कर्तृत्ववान परंतु चुकीच्या मार्गाला लागलेले. शरीराचे गुलाम झालेले , कामवासना हीच उच्च प्रकारचे सुख आहे असं समजणारे , दृष्टी अशुद्ध झालेले , बिघडलेले , मोहाला बळी पडलेले ,अशा प्रकारच्या व्यक्तींचा ययाति हा प्रतिनिधी आहे. दुर्दैवाने आजच्या काळात ये ययातिच जास्त आहेत. कच कमी ! ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्या सारखं होईल. कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी ! खांडेकरांच्या लेखणीला सलाम !