- Log in to post comments
मजकूर
'नवीन काय वाचताय?' बराच लांबलाय, तो वाचायला त्रास होतोय, म्हणून हा नवा धागा.
सध्या मी वाचतेय -
स्थलकाल - अरुण टिकेकर
जुन्या मुंबई इलाख्यातल्या निरनिराळ्या स्थळांच्या भूतकाळाचा - नेपथ्य आणि संस्कृती यांचा - मागोवा. फार सुंदर फोटो आणि एकुणात देखणं पुस्तक.
इट्स नॉट अबाउट बाइक - लान्स आर्मस्ट्राँग
अनुवाद कुणी केलाय आठवत नाहीये. पण चांगला केलाय. लान्स आर्मस्ट्रॉंग या जागतिक दर्ज्याच्या सायकलपटूचं आत्मचरित्रात्मक पुस्तक. तो गरिबीशी झगडून वयाच्या पंचविशीत खेळाडू म्हणून एका स्थानावर पोचला आणि नेमकी तेव्हाच त्याला वृषणाचा कॅन्सर झाल्याची (तोही तिसर्या टप्प्यापर्यंत, म्हणजे फुफ्फुसांपर्यंत पोचलेला) वाईट बातमी त्याला मिळाली. मग त्यातून बरा होऊन 'तूर दे फ्रान्स' जिंकण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या पुस्तकात आहे. एकदा वाचलंच पाहिजे.
चर्चा प्रकार
अभिप्राय
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 05:34 · उत्तर
"....या विधानाशी मात्र १००% असहमत आहे. नवरा त्यांच्यासोबत होता, ते फक्त त्या अमेरिकेला जाईपर्यंत. त्यानंतर सगळ्यात जास्त मनस्ताप त्यानेच दिला."
~ तुझ्या या १०० टक्क्याच्या दाव्याला मी देखील १०० टक्केच विरोध करणार, मके ! माझ्यावर कुठे कोर्टात केस घातलीस तरीही !
मला सांग, या पुण्यशील सांप्रत महाराष्ट्र देशी किती नवरे आपल्या बायकोला कडेवर घेऊन हररोज लक्ष्मी रोडवर फिरतात? कितीही प्रेमाची बाहुली असली तरी त्यांच्यात वाद होत नसतील का? अगदी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यातील मजनु आपल्या लैला ला मनःस्ताप देत नसेल का? किंवा व्हाईस व्हर्सा? स्त्री-पुरुष संबंधातील हे नाते तर अगदी अॅडमपासून चालू आहे. त्याने शिव्या दिल्या नाहीत का ईव्ह ला...? कशासाठी मोहात पाडलेस म्हणून?
मुळात आनंदीबाईचे आयुष्यच उणेपुरे २१ वर्षाचे. ८ व्या की ९ व्या वर्षी वय, १४ व्या वर्षी अपयशी मातृत्व ! केवळ दहा दिवस जगलेल्या त्या अपत्याच्या वियोगाने दु:खी झालेले ती मुलगी (होय....मी तिला मुलगीच म्हणणार....१४ वर्षाच्या व्यक्तीला 'बाई' म्हणवतच नाही) समजून चुकते की योग्य ते औषधोपचार न मिळाल्यानेच आपण अपत्य गमावले; मग ती निर्धाराने (तशी वेळ अन्य महिलेवर येऊ नये म्हणून...) वैद्यकिय शिक्षण मिळविण्याचा यत्न करते....आणि ते शक्य होणार असते गोपाळरावांच्या सक्रीय सहकार्यानेच. इथे मी जाणीवपूर्वक 'सक्रीय' संज्ञेचे योजन करीत आहे. कारण त्या काळात पोस्टात कारकुनी करीत असलेल्या जोशीबुवांचे वेतन ते काय असणार...अन् त्यात प्रपंचाचा गाडा रेटायचा कसा.. निभावून न्यायचे कसे, यासारख्या विवंचना कायमपणे समोर असताना पत्नीला घरच्या घरी प्रथम इंग्रजी शिकवितो, नंतर अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा तो ध्यास घेतो....हे सर्व अकालनीय तर आहेच....पण जिद्दीचे एक उत्कृष्ट उदाहारण आहे...कारण इच्छा कितीही प्रबळ असली तरी आर्थिक सोंग कधीच आणता येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य जर आज २०१० मध्ये आहे तर ते १८८० मध्ये तर फार तीव्रतेने असणारच. अशा सर्वस्वी विरोधी वातावरणात नैराश्य अजिबात न आणू देता जर गोपाळराव जोशी आपल्या पत्नीला शेवटी अमेरिकेला जाणार्या बोटीत बसवितातच.....तर दॅट वॉज, शुअरली, नॉट अ मीन अचिव्हमेन्ट, एम.के. !....अॅण्ड देअरफोर ड्यू क्रेडिट मस्ट गोज टु हिज अकाऊंट ओन्ली.
आयुष्यात करायचे तर काहीच नाही...पण धर्मजातीकुटुंबाने दिली आहे हक्काची एक पत्नी म्हणून तिच्यावर जणू काही घटनेत तरतूद असल्याप्रमाणे दिवसरात्र अत्याचार करणारे बिनकिमतीचे डझनावरी नवरोबा आपण पाहतोच ना? आणि तसल्या अपमानस्पद जिंदगीतदेखील सुख माननार्या सिंधू संख्येने इथे कमी नाहीत. मग अशा समाजाने स्वीकारलेला प्रवाहात एखादा गोपाळराव आपल्या आनंदीबाईला एक आगळीवेगळी स्त्री म्हणून उभी करत असताना त्याच्याकडून झालेल्या काही (सो कॉल्ड छ्ळ...) प्रमादाकडे पाहताना त्याच्यातील गुणांकडे दुर्लक्ष होऊ नये इतकेच. ज्या आनंदीबाईचे 'एम.डी.' पदवी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाने अभिनंदन केले....आणि जी भारतातील पहिली एम.डी. स्त्री ठरली....तिच्या यशाचे श्रेय गोपाळरावांचेच ना?
इन युवर ओन वर्ड...ओव्हर टु यू मदामोसिएल !
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 1 Nov 2010 - 08:02 · उत्तर
गोपाळरावांचे महत्व तर आहेच. कदाचित माझा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला गेला. त्या शिकायला जाईपर्यंत त्या माणसाने जंग जंग पछाडले. जे जे करता येईल ते ते सर्व केले. पण त्यानंतर तेही इतरांना सामील झाले. मला म्हणायचे इतकेच आहे, की जितके दु:ख परक्यांनी दिलेल्या त्रासाचे होत नाही, त्याहून अधिक दु:ख स्वकीयांनी दिलेल्या त्रासाचे होते. त्यामुळे रखमाबाईंच्या तुलनेने हे त्रास आनंदीबाईंना जास्त झाले. घरचे, दारचे आणि हिंदुस्थानातले गोरे-परकीय अशांचा सगळा त्रास त्यांना झाला. त्यात त्यांनी स्वतःवर घालून घेतलेली बंधने, अमेरिकेतले प्रतिकूल वातावरण या सगळ्याचा परिणाम त्यांची प्रकृती तोळामासा होण्यात झाला.
तू म्हणतोस तसे त्यांना अल्पायुष लाभले. पणं त्यातही अजाणत्या वयात झालेली मानहानी व जाणत्या वयात झालेला अपमान, मानसिक त्रास यांत फरक तो आहेच. नेमका हाच त्या १६ वर्षांच्या असताना अमेरिकेला गेल्या तेव्हापासून जास्त झाला आणि सगळ्यात हक्काचे असे एकुलते छत्रही बोचायला लागले.
जाता जाता: रखमाबाईंचे सावत्र वडिल हे 'द सर्जन टू व्हाईसरॉय' असल्याने रखमाबाईंना मुंबईच्या गव्हर्नरच्या बायकोने आयोजित केलेल्या सभांस व त्यांच्या जनाना कार्यक्रमास खास आमंत्रण असे. त्या इंग्लंडला शिकायला गेल्या तेव्हा त्यांचे पालकही अतिश्रीमंत असून त्या होस्टेलला राहायला जाईपर्यंत आलिशान बग्गीतून कॉलेजला जात. यात रखमाबाईंच्या कार्याला कमी लेखण्याचा जराही हेतू नाही. त्यांनी त्याकाळी एकटीने जे केले, ते सर्व आताही कुणाला जमेल की नाही शंकाच आहे. त्या खर्या अर्थाने पुरोगामी व खंबीर होत्या. फक्त इथे हालापेष्टा जास्त कुणी सोसल्या हा मुद्दा आहे. बाकी कार्याच्या बाबतीत म्हटले तर आनंदीबाईंना ती संधीच मिळाली नाही. जरी त्या जगल्या असत्या, तरी त्या कोल्हापूर संस्थानच्या नोकरीत राहून रखमाबाईंइतके बहुआयामी काम करू शकल्या नसत्या असे माझे व्यक्तिगत मत आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेणं आणि तो काटेकोरपणे व प्रसंगी कठोरतेने अंमलात आणणं हे रखमाबाईंना जास्त चांगले जमले असावे असे वाटते.
ज्योति कामत
ज्योति कामत · Sun, 31 Oct 2010 - 14:38
जी ए कुलकर्णींचं "डोहकाळिमा". खूप वर्षांपूर्वी जी एं चं सांजशकुन, निळासावळा आणि एक दोन पुस्तकं वाचली होती. तेव्हा वय लहान असल्यामुळे असेल कदाचित, त्यातील दु:खांची जातकुळी कळली नव्हती फारशी. आता वाचताना अशी अवस्था आहे की एका वेळेला फक्त एकच कथा वाचू शकते. अतिशय आर्त, शोकात्म अशा या कथा आहेत.
यातील सगळ्या कथा जी एं च्या सुरुवातीच्या ४ पुस्तकातील आहेत. पुस्तक म द हातकणंगलेकर यानी संपादित केलंय. त्यांची प्रस्तावनासुद्धा अत्यंत वाचनीय आहे.
कथातील उतारे इथे द्यायचा मोह आवरते विस्तारभयाने. शिवाय बहुतेकानी त्या सगळ्या कथा वाचल्या असतीलच. मराठी वाचणार्या प्रत्येकाच्या वाटेत जी ए नावाचा एक आयनेमहाल कधी ना कधीतरी येतोच!
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 31 Oct 2010 - 17:24
ज्योति...."पुस्तकविश्व" वर तुझे मनापासून स्वागत......! यातही एक ज्यादाचा स्वागताचा लाडू एवढ्यासाठी की तू इथले पहिले लिखाण 'जी.ए.कुलकर्णी' यांच्यापासून सुरू केल्याबद्दल....जीए हा माझ्याच नव्हे तर इथल्या अनेकांच्या मनातील एक हळवा कोपरा आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या भारून टाकणार्या शब्दजादूचे अनेकविध आरसे इथे आपण आणू या... जेणेकरून त्या महालात वावरताना आपण हरवून तर जाऊच पण साथ साथ इतरांनाही त्यात गुंगवून टाकण्याचा यत्न करू.
खूप आनंद होतोय मला...तू इथे आलीस ते.
इन्द्रा
ज्योति कामत
ज्योति कामत · Sun, 31 Oct 2010 - 18:38 · उत्तर
देवदास म्हणाला "हमें कलकत्ता जानाही पडेगा" तसं कधी तरी इकडे यायचंच होतं.नाहीतर मिपावरची लिंक एवढे दिवस फक्त बघत होते....
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 1 Nov 2010 - 18:12
कालच शाम मनोहरांची "खेकसत म्हणने आय लव्ह यु" ही कादंबरी संपवली.
साधीशी कथा पण वापरलेला फॉर्मेट आवडला.
त्या आधी प्रभाकर पेंढारकरांनी लिहिलेले "एका स्टुडिओचे आत्मचरित्र" वाचुन संपवले.
आता पेंढारकरांचेच चक्रीवादळ हातात घ्यायचा विचारात आहे.
आरागॉर्न
आरागॉर्न · गुरुवार, 4 Nov 2010 - 06:21
सध्या ही दोन वाचतो आहे.
द टिपिंग पॉइंट - माल्कम ग्लॅडवेल
अवेकन द जायन्ट विदइन - अँथनी रॉबिन्स
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sat, 6 Nov 2010 - 08:33
टण्या, मी रागदरबारी आणलंय लायब्ररीतून. आता वाचून कळवते कसं वाटतंय ते.